मायेतील विवाह सोहळ्‍यातही उच्‍च आध्‍यात्मिक स्‍तरावरील अनुभूती देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘२१.१२.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आमचा विवाह झाला. ९.१२.२०२४ या दिवशी आमच्‍या विवाहाला तिथीनुसार १ वर्ष पूर्ण होत आहे. त्‍या निमित्ताने विवाहाच्‍या वेळी श्री गुरूंच्‍या कृपेने आम्‍हाला जे दैवी क्षण अनुभवायला मिळाले, त्‍यांचे अवलोकन करून ते कृतज्ञताभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. संतांच्‍या मार्गदर्शनामुळे भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न करण्‍याची दिशा मिळणे 

विवाहाच्‍या आदल्‍या दिवशी आमची पू. संदीप आळशी (सनातन संस्‍थेचे ११ वे समष्‍टी संत, वय ४९ वर्षे) यांच्‍याशी भेट झाली. त्‍या वेळी विवाहाच्‍या संदर्भात साधनेच्‍या प्रयत्नांविषयी आमची चर्चा झाली. पू. दादांनी आम्‍हाला आध्‍यात्मिक स्‍तरावरील काही सूत्रे सांगितली. त्‍यामुळे ‘विवाहाच्‍या दिवशी अधिकाधिक भावाच्‍या स्‍तरावर राहून विधींमधील चैतन्‍य अनुभवायचे,’ असे आम्‍ही दोघांनी ठरवले. त्‍याप्रमाणे आम्‍ही विवाहाच्‍या दिवशी सकाळी उठल्‍यापासून प्रयत्न चालू केले. आम्‍हाला भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न करून भगवंताचे अस्‍तित्‍व सतत अनुभवता येत होते. ‘मायेतील एखादा कार्यक्रम आहे’, असे न वाटता, तो आध्‍यात्मिक सोहळाच वाटत होता. त्‍यामुळे तेथे आम्‍हाला चैतन्‍य जाणवणे, भावजागृती होणे इत्‍यादी अनुभूती पदोपदी घेता आल्‍या.

श्री. अमोल बधाले

२. विवाहसोहळ्‍याच्‍या वेळी गुरुतत्त्वाचा लाभ होणे 

आमचा विवाहसोहळा साक्षात् नारायणस्‍वरूप गुरूंचे अस्‍तित्त्व असलेल्‍या रामनाथी आश्रमात संपन्‍न झाला. त्‍यासह विवाह झाला, तो वारही ‘गुरुवार’ म्‍हणजे गुरूंचाच वार ! त्‍यामुळे त्‍या दिवशी आम्‍हाला श्री गुरूंचे भरभरून आशीर्वादही लाभले.

३. विवाहातील विधींच्‍या वेळी आपोआप अनुभवलेली भावस्‍थिती !

३ अ. मंगलाष्‍टकांच्‍या वेळी देवता आणि गुरुदेव यांचे अस्‍तित्‍व अनुभवायला मिळणे : मंगलाष्‍टके चालू असेपर्यंत संपूर्ण वेळ आमच्‍या आजूबाजूला स्‍थुलातून अन्‍य कुणीच नसून, सूक्ष्मरूपाने देवता आणि सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे अस्‍तित्‍व अखंड अनुभवता येत होते.

३ आ. अंतरपाटावरील स्‍वस्‍तिकाकडे पहातांना गुरुदेवांचे दर्शन होणे ! : पुरोहितांनी आम्‍हाला अंतरपाटावरील स्‍वस्‍तिकाकडे पहायला सांगितले होते. तेव्‍हा त्‍या स्‍वस्‍तिकामध्‍ये आम्‍हाला सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन घडले. ‘ते आमच्‍याकडे पाहून मधुर हास्‍य करत आहेत’, असे आम्‍हाला जाणवले.

३ इ. एकमेकांना हार घालतांना शिव-पार्वती एकमेकांना हार घालत असल्‍याचे अनुभवणे : एकमेकांना हार घालतांना शिव-पार्वती यांच्‍या विवाहसोहळ्‍याचे स्‍मरण होऊन ‘आम्‍ही शिव-पार्वतीरूपातच एकमेकांना हार घालत आहोत’, असे आम्‍हाला जाणवले.

३ ई. विधींचा अर्थ समजून घेऊन विधी करणे ! : विधी चालू असतांना पुरोहित प्रत्‍येक विधीचे अर्थ सांगत होते, तसेच काही विधींचे अर्थ आम्‍ही स्‍वत: विचारून घेतल्‍यामुळे विधींशी आणि त्‍यांतील प्रत्‍येक कृतीशी एकरूप होऊन त्‍यांतील आनंद घेता आला. प्रत्‍येक विधी करतांना अंतरातील भावाचा स्‍तर वाढत गेल्‍याचे आम्‍हाला जाणवले. काही घंटे विधी चालू असूनही आम्‍हाला थकवा न जाणवता आनंदाची अनुभूती घेता आली.

सौ. वैष्णवी बधाले

४. विधींच्‍या वेळी शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या स्‍तरांवर अनुभवलेली स्‍थिती ! 

अ. शक्‍ती : सर्व विधी करण्‍यासाठी ऊर्जा आणि बळ मिळत होते.

आ. भाव : विधींतील प्रत्‍येक कृती आपोआपच भावाच्‍या स्‍तरावर होत होती.

इ. चैतन्‍य : संत आणि साधक यांचे अस्‍तित्‍व अन् धर्मशास्‍त्रानुसार आश्रमात करत असलेले विधी यांच्‍यामुळे वातावरणातील चैतन्‍य पुष्‍कळ वाढल्‍याचे आम्‍हाला जाणवले. त्‍यामुळे संपूर्ण वेळ आम्‍हाला वातावरणात उत्‍साह जाणवत होता आणि चैतन्‍याची अनुभूती घेता आली.

ई. आनंद : विधींच्‍या वेळी श्री गुरूंचे अस्‍तित्‍व सतत जाणवत असल्‍यामुळे आमच्‍या मनाला क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती येत होती.

उ. शांती (निर्गुण) : विवाहाचे विधी असलेल्‍या दोन्‍ही दिवशी आम्‍हाला मनाची निर्विचार अवस्‍था अधिक प्रमाणात अनुभवता आली, तसेच वातावरणातही निर्गुण तत्त्व आणि शीतलता जाणवत होती.

अशा प्रकारे विधींच्‍या वेळी आम्‍हाला अध्‍यात्‍मातील शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती अशा विविध स्‍तरांच्‍या अनुभूती केवळ श्री गुरुकृपेनेच घेता आल्‍या.

५. अक्षता टाकण्‍यासाठी व्‍यासपिठावर नातेवाइक, साधक आणि संत/सद़्‍गुरु आल्‍यानंतर जाणवलेले भेद !

अ. नातेवाइक : जेव्‍हा विवाहाच्‍या वेळी अक्षता टाकण्‍यासाठी व्‍यासपिठावर नातेवाइक येत होते, तेव्‍हा त्‍यांच्‍या ओळखी करून घेणे, त्‍यांच्‍याशी बोलणे यांत मायेतील प्रेम आणि आपुलकी जाणवत होती.

आ. साधक : नातेवाइकांनंतर साधक व्‍यासपिठावर येऊ लागले. तेव्‍हा मायेतील प्रेमाची जागा आध्‍यात्मिक प्रेमाने घेतली. प्रत्‍येक साधक अक्षता डोक्‍यावर टाकत असतांना ‘देव आमच्‍यावर चैतन्‍याचेच प्रक्षेपण करत आहे’, असे आम्‍हाला वाटत होते. ‘साधकांशी बोलतांना आमच्‍या अंतरातील भावाचा स्‍तर वाढत गेला’, असे आम्‍हाला जाणवले. साधकांना पाहून ‘गुरुदेवांनी त्‍यांच्‍या किती मोठ्या कुटुंबात (सनातन परिवारात) आपल्‍याला सामावून घेतले आहे ! साधकांच्‍या रूपाने ते आपल्‍यावर किती प्रेम करतात ! आपल्‍याला कसा आनंद देतात !’ या विचारांनी पुष्‍कळ भाव जागृत होऊ लागला.

इ. संत : संत ज्‍या वेळी आम्‍हाला भेटण्‍यासाठी व्‍यासपिठावर आले, त्‍या वेळी त्‍या संतांशी संवाद साधतांना शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव वाढत असल्‍याचे आम्‍हाला जाणवले. संतांकडून आम्‍हाला पुढील आध्‍यात्मिक वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद मिळत होते. ‘संतांच्‍या रूपाने गुरुदेवच आम्‍हाला आशीर्वाद देत आहेत’, असे आम्‍हाला जाणवले.

ई. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ : त्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु निलेश सिंगबाळ व्‍यासपिठावर आले. त्‍या वेळी वातावरण आणखीनच पालटले. त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वाने वातावरणामध्‍ये एक वेगळी चैतन्‍याची लाट आल्‍यासारखे आम्‍हाला जाणवले. त्‍यांच्‍यातील प्रेम पाहून असे वाटत होते, ‘त्‍यांच्‍याच मुलीचा विवाह आहे.’

६. विवाह सोहळ्‍यासंदर्भात नातेवाइक, साधक आणि संत यांचे उत्‍स्‍फूर्त बोल ! 

अ. नातेवाइक : आश्रमातील शिस्‍तबद्ध, नियोजनबद्ध, कोणतीही घाईगडबड नाही, असा आश्रमातील हा विवाहसोहळा त्‍यांच्‍या मनाला भावला.

आ. साधक : साधकांशी बोलतांनाही मायेतील कोणतेच बोलणे न होता आध्‍यात्मिक स्‍तरावरील बोलणे होत होते.

इ. संत : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘विवाहासाठी सभागृहात प्रवेश करतांना वातावरणात निर्गुण तत्त्व जाणवत होते. व्‍यासपिठावर तर पुष्‍कळ प्रमाणात निर्गुण तत्त्व असल्‍याचे जाणवले.’

‘विवाहासारख्‍या मायेतील कार्यक्रमांमध्‍येही अशाप्रकारे उच्‍च आध्‍यात्मिक अनुभूती येणे, हे केवळ अवतारी गुरुदेवांच्‍याच (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍याच) चरणांठायी होऊ शकते’, हे आम्‍ही पदोपदी अनुभवत होतो.

‘श्री गुरूंनीच आमच्‍या वैवाहिक जीवनाच्‍या आरंभी अशा उच्‍च स्‍तरावरील आध्‍यात्मिक अनुभूती देऊन आध्‍यात्मिक ध्‍येयप्राप्‍तीचा विचार आमच्‍या मनावर बिंबवला’, यासाठी श्री गुरूंच्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– श्री. अमोल बधाले आणि सौ. वैष्‍णवी अमोल बधाले (पूर्वाश्रमीची कु. वैष्‍णवी वेसणेकर, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी. (२६.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक