‘विश्वस्तांचे अधिकार आणि कर्तव्य समजून घेण्यापूर्वी ‘विश्वस्त’ ही संकल्पना समजून घेणे अगत्याचे आहे.
१. विश्वस्त कसा असावा ?
‘महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम १९५०’चे कलम २ उपकलम १८ मध्ये ‘विश्वस्त’ या शब्दाची व्याख्या दिलेली आहे ती पुढीलप्रमाणे, ‘विश्वस्त म्हणजे एक व्यक्ती किंवा व्यक्तींचे मंडळ-गट-समूह.’, ज्यांच्याकडे न्यासाची मालमत्ता सांभाळण्याचे दायित्व असते.
‘विश्वस्त’ ही संकल्पना मूर्त स्वरूपात उभी करण्यासाठी आणखी काही संदर्भ देता येतील का ? याचा विचार करत असतांना ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी लिहिलेला ‘श्रीराम कथामृत’ या नावाचा ग्रंथ माझ्या वाचनात आला. त्यामध्ये ‘विश्वस्त’ ही संकल्पना सोदाहरण दिलेली आहे. तो उतारा वाचल्यानंतर ‘विश्वस्त’ म्हणजे काय ? तो कसा असावा ? त्याने कशा पद्धतीने कामकाज करावे ? याविषयी कुणाच्याही मनात संभ्रम रहाणार नाही. तो उतारा जसाचा तसा खाली उद्धृत केलेला आहे.
‘सिंहासनावर प्रभूंच्या पादुका आहेत. एक प्रश्न मनात उपस्थित होतो की, अयोध्या राज्यात भरताचे स्थान काय ? भरत स्वामी आहेत कि सेवक ? ते स्वतःला ‘स्वामी’ म्हणत नाहीत, आपण त्यांना ‘सेवक’ म्हणू शकत नाही; कारण अयोध्येत अंतिम निर्णय त्यांचा असतो. तेव्हा भरत स्वामीही नाहीत आणि सेवकही नाहीत; म्हणून आपल्याला एक तिसरा शब्द सूचला पाहिजे. श्री भरत अयोध्येचे ‘न्यासी’ (ट्रस्टी) झाले. न्यासी स्वामीही नसतो आणि सेवकही नसतो. एका दृष्टीने तो मालकच असतो; पण पुरता मालकही नसतो. आपण ज्या न्यासाचे न्यासी आहोत, त्याचा विकास करण्याचा अधिकार आपल्याला असतो; परंतु त्याचे नुकसान (हानी) करण्याचा किंवा हवा तसा उपयोग करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. मी जर मालक असेन, तर माझी वस्तू मी हवी तशी वापरीन; पण मी जर विश्वस्त असेन, तर न्यासाची वस्तू मला हवी तशी वापरता येणार नाही. मला त्याचा विकास करता येईल; पण त्याचा हवा तसा दुरूपयोग करता येणार नाही.’
२. विश्वस्तांचे अधिकार, कर्तव्य आणि मर्यादा
‘विश्वस्त’ या संकल्पनेची विस्तृत व्याख्या पाहिल्यानंतर आता विश्वस्तांचे अधिकार, कर्तव्य आणि मर्यादा पहाणे आवश्यक आहे. ‘विश्वस्त’ हे अधिकाराचे नाही, तर कर्तव्याचे पद आहे. न्यासाचे प्रशासन चालवण्याचा अधिकार विश्वस्तांना आहे; परंतु या अधिकाराला कर्तव्य आणि मर्यादा यांचे बंधन आहे.
अ. न्यासाचे प्रशासन, कामकाज अत्यंत काळजीपूर्वक अन् दायित्वाने पहाणे, हे विश्वस्तांचे कर्तव्य आहे. न्यासाचा पैसा, मिळकत ही न्यासाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरावी, असे बंधन विश्वस्तांवर आहे.
आ. न्यासाचे प्रशासन पहात असतांना न्यासाची परंपरा, नियमावली, प्रचलित कायदे, धर्मादाय आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेले कायदेशीर निर्देश यांचे काटेकोर पालन करणे, हे विश्वस्तांचे उत्तरदायित्व आहे.
इ. एक सूज्ञ व्यक्ती स्वतःचा पैसा किंवा मिळकतीची ज्या पद्धतीने काळजी घेईल, त्याच पद्धतीने न्यासाचा पैसा आणि मिळकतीची काळजी घेणे, हे विश्वस्तांचे कर्तव्य आहे.
ई. न्यासाच्या मिळकतीची विक्री करणे, गहाण ठेवणे, अदलाबदल करणे आणि बक्षीस देणे, न्यासासाठी कर्ज काढणे यांसाठी सहधर्मादाय आयुक्तांची अनुमती घेणे विश्वस्तांवर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे न्यासाची रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवण्यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, टपाल खाते किंवा शासनाने या कार्यासाठी मान्यता दिलेल्या सहकारी बँका यामध्येच न्यासाचे खाते उघडावे. इतर ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, तर सहधर्मादाय आयुक्त यांची अनुमती घ्यावी लागते.
उ. न्यासाच्या चल-अचल संपत्तीची नोंद ठेवणे, त्या नोंदी नियमितपणे पडताळणे आणि त्या अद्ययावत् करणे, हे विश्वस्तांचे कर्तव्य आहे.
ऊ. त्याचप्रमाणे न्यासाकडे येणारा आणि न्यासासाठी व्यय होणारा पैसा याची नियमितपणे नोंद ठेवणे, त्याचा वार्षिक ताळेबंद सिद्ध करणे, सनदी लेखापालाकडून त्याचे लेखापरीक्षण करणे आणि तो ताळेबंद प्रत्येक वर्षी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर करणे, हेही विश्वस्तांचे कर्तव्य आहे.
ए. विश्वस्तांचे त्यागपत्र, मृत्यू, विश्वस्त मंडळ बरखास्त (विसर्जित) करणे यांमुळे रिक्त झालेल्या पदांवर न्यासाच्या घटनेप्रमाणे (नियमावलीप्रमाणे) नवीन विश्वस्तांची नेमणूक करणे, न्यासाची मालमत्ता धर्मादाय आयुक्तांच्या अनुमतीने विक्री, गहाण, अदलाबदल किंवा बक्षीसपत्राद्वारे दिली, न्यासासाठी मिळकत खरेदी केली, या सर्व घटनांसाठी ‘बदल (पालट) अर्ज’ प्रविष्ट (दाखल) करणे, हेसुद्धा विश्वस्तांचे उत्तरदायित्व आहे.
ऐ. न्यासाचे सर्व अभिलेख (कागदपत्रे) अद्ययावत् करणे, ते पडताळणीसाठी उपलब्ध करून देणे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेले निरीक्षक वा धर्मादाय आयुक्त यांना न्यासाची पहाणी आणि अभिलेखाची पडताळणी करणे सुलभ व्हावे, यांसाठी योग्य ती उपाययोजना करणे. त्यांच्या निरीक्षणांमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करणे आणि धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या कायदेशीर निर्देशांची पूर्तता करणे, हेही विश्वस्तांचे कर्तव्य आहे.’ (१.१२.२०२४)
– श्री. दिलीप मा. देशमुख, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त, पुणे.