सभागृहात विरोधी पक्षांकडून गदारोळ
नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ५ डिसेंबरला राज्यसभेत काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या जागेवर नोटांचे बंडल सापडले, अशी माहिती सभापती जगदीप धनखड यांनी ६ डिसेंबरला दिली. सुरक्षारक्षकांनी ही माहिती त्यांना दिल्याने धनखड यांनी सांगितले. ‘या प्रकरणाचे अन्वेषण नियमानुसार व्हायला हवे आणि तेही केले जात आहे’, असेही धनखड यांनी सांगितले. यानंतर सभागृहात गदारोळ झाला. आरोपांवर सिंघवी म्हणाले की, मी राज्यसभेत जातो, तेव्हा केवळ ५०० रुपयांची नोट माझ्याकडे असते.
काँग्रेसे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि घटनेची सत्यता सिद्ध होईपर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव घेऊ नये, अशी माझी विनंती आहे. अशी चिखलफेक करून देशाची अपकीर्ती केली जात आहे.
गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित
लोकसभेचे कामकाज प्रारंभ होताच विरोधी पक्षाच्या खासदारांकडून घोषणाबाजी चालू झाली. यावर अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, ‘तुम्हाला लोकसभेचे कामकाज चालवायचे नाही का ? प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवायचा नाही का ?’ यानंतर विरोधी खासदारांनी वाद घातला. त्यामुळे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केले. (अशांकडून सभागृह चालवण्यासाठी होणारा खर्च कधी वसूल केला जाणार कि असा प्रकार वर्षानुवर्षे चालूच रहाणार ? लोकशाही वाचवण्याचा कथित आव आणणारे लोकशाहीची प्रतिदिन अशा प्रकारचे थट्टा करत असतांना त्यांना कोणतीही शिक्षा न होणे जनतेला अपेक्षित नाही ! – संपादक)