‘श्रीमती गीता प्रभु यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नीटनेटकी रहाणी
‘श्रीमती गीता प्रभुकाकूंना मी गत १२ वर्षांपासून ओळखते. त्यांची रहाणी अत्यंत नीटनेटकी आहे. काकू धान्याशी संबंधित सेवा करतात. त्यांच्या अंगावरील साडी कधीही चुरगळलेली नसते. त्या सकाळी ७ वाजता आश्रमात येतात. तेव्हापासून ते सायंकाळी ७.३० वाजता सेवा पूर्ण करून निवासस्थानी परत जाईपर्यंत त्यांच्या अंगावरील साडी जशीच्या तशी असते. काकू स्वतःच्या साड्या स्वतः इस्त्री करतात. काकूंचे साहित्य खोलीतही नीटनेटके ठेवलेले असते. त्या खोली नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवतात.
२. शारीरिक त्रास असतांनाही आश्रमाच्या स्वयंपाकघरातील विविध सेवा उत्साहाने करणे
काकू आश्रमाच्या स्वयंपाकघरातील विविध सेवा उत्साहाने करतात. खरेतर त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, तरीही त्या आश्रमाच्या भल्या मोठ्या स्वयंपाकघरात संतांसाठी करायच्या अल्पाहाराची पूर्वसिद्धता करणे आणि अल्पाहार बनवणे, अशा सेवा करतात. अशा सेवांची पूर्वसिद्धता करतांना साहित्य गोळा करण्यासाठी बरेच चालावे लागते; मात्र त्याविषयी काकूंचे कधी गार्हाणे नसते.
३. इतरांना तत्परतेने साहाय्य करणे
भोजनकक्षात एखाद्या साधकाला काही वाढून द्यायचे असल्यास किंवा अन्य काही हवे असल्यास काकू त्यांना तत्परतेने साहाय्य करतात. साधकाने काकूंना काही सांगायच्या आधीच त्याविषयी काकूंच्या लक्षात आलेले असते. काकू स्वतःहून त्या साधकाला साहाय्य करतात.
४. निर्भयता
काकूंच्या मेंदूमध्ये गाठ झाली होती. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागत असे. ती गाठ जाळून नष्ट करण्यासाठी ‘रेडिएशन’ (किरणोत्सर्ग उपचारपद्धती) करण्याचे ठरले. तेव्हा काकूंनी रुग्णालयात रहाण्यासाठी जातांना तेथे लागणारे साहित्य, कपडे इत्यादी स्वतःची पूर्ण सिद्धता केली. त्या स्वतःच रुग्णालयात भरती झाल्या आणि उपचार पूर्ण करून दोन दिवसांनी आश्रमात आल्या. हे सर्व करतांना काकूंच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवला नाही.
‘प्रभुकाकूंमधील या गुणांचा आम्हा साधकांना लाभ करून घेण्याची बुद्धी होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती अलका वाघमारे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२४)