वैद्यकीय क्षेत्रातील लुटारू !

प्रतिकात्मक छायाचित्र

एकदा मी रक्त-लघवी चाचणी केंद्रामध्ये गेलो होतो. त्या वेळी प्रमुख आधुनिक वैद्य कर्मचार्‍यांना सूचना देत होते. ते म्हणाले, ‘‘ही पाकिटे संबंधित आधुनिक वैद्यांना देऊन मगच घरी जा.’’ त्या पाकिटांमध्ये ‘कमिशन’ (दलालीचे पैसे) असल्याने ते देण्यासाठी त्या कर्मचार्‍यालाच जाऊन द्यावे लागणार होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, ज्या आधुनिक वैद्यांनी रुग्ण पाठवले, त्यांना हे कमिशन दिले जाते आणि त्याचे पैसे रुग्णांकडून वसूल केले जातात.

सध्या आधुनिक वैद्य एकमेकांकडे रुग्ण पडताळण्यासाठी किंवा त्यांच्या चाचण्या करण्यासाठी पाठवतात. यासाठीचे त्यांचे दरही आपापसांत ठरलेले असतात. प्रत्येक आधुनिक वैद्यांचे नोंदणी शुल्क वेगवेगळे आणि अवाच्या सव्वा असते, उदाहरणार्थ हे शुल्क काही वेळा २ ते ३ सहस्र रुपयांपर्यंतही आकारले जाते. ते शुल्क व्याधीच्या कालावधीनुसार पालटले जाते. स्वस्त आणि घाऊक खरेदी केलेल्या औषधांमधील काही औषधेही अधिक मूल्याने वितरित करणे, एकाच वेळी अधिक प्रकारची औषधे लिहून देणे, बर्‍या झालेल्या रुग्णालाही अधिक काळ रुग्णालयात ठेवणे, असे प्रकार वैद्यकीय क्षेत्रात सर्रासपणे केले जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

न्यासाच्या रुग्णालयांमध्येही रुपये ५० किंवा त्यापेक्षा अधिक नोंदणी शुल्क घेतले जाते. तेथे ज्येष्ठ आणि गरीब नागरिक यांना सवलत मिळत नाही. त्या रुग्णालयांमध्ये जवळच्या परिसरातील आधुनिक वैद्य ठराविक दिवशी काही घंट्यांसाठी विनामूल्य सेवा म्हणून येतात. अर्थातच विनामूल्य म्हटल्यावर त्यांचे खिसे भरले जात नाहीत. त्यामुळे पुन्हा स्वार्थी मानसिकतेपोटी ते रुग्णांना त्यांच्या चिकित्सालयाचा पत्ता देऊन तेथे बोलावून नको असलेले शल्यकर्मही करण्यास सांगतात. औषधांच्या खोक्यांवर किरकोळ किमान विक्री मूल्य किती छापावे, याचे स्पष्ट धोरण नाही. त्यामुळे उत्पादन व्यय म्हणून अधिक लाभाची रक्कम मिळण्यासाठी ८ ते १० पट अधिक मूल्य छापले जाते. काही औषधांचा तुटवडा दाखवून अधिक मूल्य वसूल करून विकली जातात. रुग्ण नडलेला असतो. त्याला अधिक मूल्य देऊन ते औषध खरेदी करावे लागते.

सरकारचे यावर नियंत्रण नसल्याने यात सामान्य लोकांची पिळवणूक होत आहे. हे टाळण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून वैद्यकीय क्षेत्रातील लुटारूंवर आवर घालावा !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.