‘माझ्या हातात सत्ता दिल्यास ४८ घंट्यांच्या आत मशिदींवरील सर्व भोंगे उतरवीन’, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील प्रचारसभेत केली होती. ते म्हणाले, ‘‘कुराणाच्या कोणत्याही पानावर लिहिलेले नाही की, मशिदीवर भोंगे लावावेत. जेव्हा कुराण लिहिले गेले, तेव्हा हे भोंगे (लाऊडस्पीकर) नव्हते. तुम्हाला नमाज पढायचा असेल, तर गजर लावा. बोंबलून इतरांना कशाला त्रास देता ?’’ मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे आणि त्यावर दिवसातून ५ वेळा मोठ्या आवाजात दिली जाणारी अजान हा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्यात दोन वेळा सत्तांतर होऊनही सुटलेला नाही. गणेशोत्सव असो किंवा कीर्तन-प्रवचन असो, रात्री १० नंतर वाजणारे भोंगे बंद करण्यासाठी तत्परतेने धाव घेणारे पोलीस मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी धाव का घेत नाहीत ? मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलीस त्यासाठी धाडस करत नाहीत. राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे मशिदींवरील भोंगे ही धार्मिक गोष्ट नव्हे, मग कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो ? समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीसयंत्रणेचे आहे, त्यावर कुणी बाधा आणू पहात असेल, तर त्याला दंडित करण्याचे अधिकारही पोलीस प्रशासनाला आहेत, मग यावर कारवाई करण्यास पोलिसांची इच्छाशक्ती नाही कि त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ?
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करणे जर उत्तरप्रदेश सरकारला जमू शकते, तर मग महाराष्ट्र सरकारला का जमत नाही ? विधानसभा प्रचारातही आमचेच हिंदुत्व कसे खरे आहे, हे सांगतांना ते निरनिराळे दाखले दिले जातात; मात्र यांपैकी कोणत्याही पक्षाने त्याच्या घोषणापत्रात मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आश्वासन नागरिकांना दिलेले नाही. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हे धार्मिक सूत्रच नाही. त्याचा त्रास केवळ हिंदूंनाच नव्हे, तर समस्त नागरिकांनाही होतो. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांसारख्या शांतता क्षेत्रांतही दिवसातून ५ वेळा अजान दिली जाते. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळातही ही अजान थांबवली जात नाही, तरीही अन्य राजकीय पक्षांना ही नागरी समस्या का वाटत नाही ? राज ठाकरे यांनी दिलेली घोषणा राज्यातील एकातरी पक्षाने दिली असती, तर काही मतदात्यांचे मन वळवण्यात त्यांना नक्कीच यश मिळाले असते !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.