हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्माज चाईल्ड : द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज शोमॅन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. स्वत:च्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी सुभाष घई यांनी ‘हिंदी चित्रपट भारतीयत्वापासून दूर जात आहे’, अशी खंत व्यक्त केली. त्यांच्या चित्रपटांतील व्यक्तीरेखा भारतीयत्वाला धरून होत्या. त्यामुळे अशा व्यक्तीरेखा जनतेच्या मनात दीर्घकाळ राहिल्या, असे मतही या वेळी सुभाष घई यांनी व्यक्त केले. सुभाष घई यांचे हे मनोगत असले, तरी त्याचा दूरगामी परिणाम समाजावर उमटत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अग्रणी असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक यांमध्ये सुभाष घई यांचे नाव घेतले जाते. वर्ष १९८० नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत सुभाष घई यांनी निर्मितीच्या क्षेत्रात चांगला जम बसवला. त्यांनी ‘कर्मा’, ‘रामलखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेश’, ‘ताल’ आदी अनेक सर्वाेत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटांतील व्यक्तीरेखा भारतीयत्वाला धरून होत्या आणि सध्याचे चित्रपट भारतीयत्वापासून दूर जात आहेत, यातून नेमके सुभाष घई यांना काय म्हणायचे आहे, हे त्यांच्या चित्रपटांतून आपणाला सहज कळू शकेल. ‘कर्मा’ चित्रपटात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांशी एका पोलीस अधिकार्याने पैशांचा सौदा करून स्वत:च्या कुटुंबियांचा संहार करणार्या आणि राष्ट्रविरोधी कारवाया करणार्या आतंकवाद्यांना पकडण्यासाठी दिलेला लढा भारतियांमधील देशप्रेम जागृत करतो. या चित्रपटातील ‘मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू’, ‘दिल दिया है, जान भी देंगे है वतन तेरे लिए,’ ही गीते राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना जागृत करतात. ‘रामलखन’ या चित्रपटात आईने चांगले संस्कार केलेल्या दोन मुलांपैकी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी होणे आणि दुसरा गुंडांच्या संगतीने वाममार्गाला लागणे; मात्र शेवट वाममार्गाला लागलेला चित्रपटातील नायक सत्याच्या बाजूने उभा रहाणे, अशी कथा आहे. ‘सौदागर’ या चित्रपटात दोन मित्रांचे वैर आणि त्यांच्या २ पिढ्यांमधील संघर्ष त्यांच्या नातवंडांच्या प्रेमातून संपतो, हे दाखवणारी प्रेमकथा ! या सर्वच चित्रपटांच्या कथा आणि त्यांना अनुरूप गाणी यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळे सुभाष घई यांचे अनेक चित्रपट हिट (सुप्रसिद्ध) झाले आणि त्या चित्रपटांतील गाणीही प्रसिद्ध झाली. हे चित्रपट यशस्वी होण्यासाठी चित्रपटांमध्ये स्त्रियांचे अंगप्रदर्शन दाखवण्याची आवश्यकता भासली नाही. सध्याच्या व्यावसायिक जगतात चित्रपटांची निर्मितीही व्यावसायिक हेतूने होते. त्यामध्ये काही चुकीचे आहे, असे नाही; मात्र व्यवसाय असला, तरी तो सामाजिक आणि राष्ट्रीयत्व यांच्या भावनेच्या अंकित असायला हवा. सद्यःस्थितीत व्यभिचार विकून पैसे कमावणे याकडे चित्रपट झुकलेले पहायला मिळतात. सुभाष घई यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेमकथाही साकारल्या आहेत; मात्र त्यांना व्यभिचाराचा दर्प नसणे, हे त्यांच्या मनातील भारतीयत्व असावे, असे वाटते. चित्रपट पाहून युवा पिढी जशी केशरचना, कपडे घालण्याची पद्धत यांचा अंगीकार करते. त्याप्रमाणे चित्रपटातील जीवनपद्धतीचा प्रभावही युवा पिढीवर पडतो. चित्रपटातील नायक-नायिका यांना युवा पिढी प्रत्यक्ष जीवनातही आदर्श मानते. ‘चित्रपटांची निर्मिती करतांना समाजाला योग्य संदेश देण्याचे भान निर्मात्यांना असायला हवे. हे नसणे, म्हणजे त्यातील भारतीयत्वाचा अभाव’, असे सुभाष घई यांना वाटत असावे.
मनोरंजन नव्हे, समाज बिघडवणारी यंत्रणा !
काळानुसार आधुनिक जीवनपद्धतीचा ठसा चित्रपटांमध्ये उमटणे स्वाभाविक आहे; परंतु योग्य आणि अयोग्य काय, हे समाजावर बिंबवण्याचे काम चित्रपट निर्मात्यांनी ठेवायला हवे. आधुनिकतेचा ठसा चित्रपटेच्या कथेमध्ये असणे स्वाभाविक आहे; मात्र याचा अर्थ व्यभिचार दाखवणे, असा होत नाही. सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. बलात्कार, हत्या, भ्रष्टाचार, संशोधन आदी सत्य घटनांवर चित्रपटांची निर्मिती करतांना वाईट गोष्टींचे उदात्तीकरण होणार नाही, याची दक्षता चित्रपट निर्मात्यांनी घ्यायलाच हवी. त्याचे दायित्व खरेतर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे आहे. चित्रपटामध्ये कोणती आक्षेपार्ह दृश्ये असल्यास त्याला कात्री लावणार्या या मंडळाने ‘चित्रपटांतून समाजाप्रती भान राखले जावे’, यासाठीही पुढाकार घ्यायला हवा. दुर्दैवाने हे होतांना दिसत नाही. सध्या तर चित्रपटांमधील हिंसा, अश्लीलता, भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण हे चित्रपट आणि वेब सिरीज यांमधूनही दाखवले जात आहे अन् या सर्वांचाच प्रभाव सध्या फेसबुक, एक्स, इस्टाग्राम अशा विविध समाजमाध्यमांवरही दिसून येतो. परिणामी समाजात हिंसा, बलात्कार, भ्रष्टाचार आदी वाढतांना दिसत आहे. कौटुंबिक नात्यांवर आधारित मालिकांमध्येही व्यभिचार दाखवणे, हे सर्रास झाले आहे. अशा मालिका कुटुंबामध्ये पाहिल्या जातात. त्यामुळे चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांनी अनैतिकतेची पातळी कधीच ओलांडली असून समाज बिघडवण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. समाजव्यवस्थेच्या दृष्टीने ही अतिशय घातक गोष्ट आहे आणि हे सर्वपक्षीय सरकारे अन् चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांसारख्या यंत्रणांचे अपयश आहे.
काही मासांपूर्वी महाराष्ट्रातील महायुती शासनाने सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदी चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदानाची घोषणा केली आहे. हे चित्रपटक्षेत्रात सुधारणेचे एक पाऊल म्हणता येईल. आजही दाऊद आदी देशविघातक प्रवृत्तींचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा पांढरा करण्यासाठी चित्रपट निर्मितीकडे पाहिले जाते. अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या विळख्याच्या विरोधात केंद्रशासनाने मोहीम उघडली; मात्र कालांतराने ती थंडावली. यामध्ये अनेक कलाकारांच्या चौकशा झाल्या; मात्र त्यातून काय साध्य केले हे जनतेपुढे आलेच नाही. त्यापूर्वी चित्रपटसृष्टीमध्ये महिलांचे होणारे शोषण पुढे आले; मात्र त्यानंतर हे अनैतिक प्रकार थांबण्यासाठी कोणतेच धोरणात्मक पाऊल उचलले गेले नाही. त्याचा परिणाम या प्रकरणानंतरही अनेक महिलांच्या शोषणाची प्रकरणे बाहेर आली. थोडक्यात पडद्यावर दिसणार्या या आकर्षक जगतामागे ‘सेक्स स्कँडल’, अमली पदार्थांची तस्करी, महिलांचे शोषण आणि भ्रष्टाचाराच्या पैशाचा साठा दडलेला आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळासारखी यंत्रणा यामध्ये पालट करण्याऐवजी त्यातीलच एक भाग होऊन गेली आहे. त्यामुळे चित्रपट हे खरोखरच समाज घडवण्याचे माध्यम व्हावे, यासाठी भविष्यात सरकारला ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.
बलात्कार, हत्या, भ्रष्टाचार आदी सत्य घटनांवर चित्रपटांची निर्मिती करतांना अनैतिकतेचे उदात्तीकरण होणार नाही, याची दक्षता घेणे महत्वाचे ! |