|
रायपूर (छत्तीसगड) – कोरबा जिल्ह्यात कटघोराच्या पाली भागातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी राजकुमार ओगरे या शिक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी शिक्षकाने देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. ओगरे मुलांना हिंदी शिकवतो.
१. तक्रारीनुसार ओगरे याने विद्यार्थ्यांना म्हटले की, देवता पूजेच्या लायक नाहीत. मी एक शिक्षित व्यक्ती आहे. माझ्यापुढे नतमस्तक व्हा. यावर विद्यार्थ्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही; परंतु वर्ग संपल्यानंतर काही मुलांनी शाळा सुटतांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. शिक्षकाने त्यांचे म्हणणे ऐकले आणि २ विद्यार्थ्यांना मारहाण केली, असा आरोप आहे.
२. या प्रकरणाची माहिती मिळताच पालकांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘शिक्षकाने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच लोकांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे.’ पालकांसमोर शिक्षकाने क्षमा मागितली; पण ते शांत झाले नाहीत. ओगरे अनेकदा विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावनांना लक्ष्य करत असल्याचा पालकांचा आरोप आहे.
३. पालक आणि इतर रहिवासी यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे.
संपादकीय भूमिकाअशा मानसिकतेच्या शिक्षकांना नोकरीतून बडतर्फ करणेच आवश्यक आहे. छत्तीसगडमधील भाजप सरकारने सरकारी शाळेत अशा मानसिकतेचे किती शिक्षक आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे ! |