|
मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटावर आधारित ‘मॅच फिक्सिंग – द नेशन अॅट स्टॅक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, हा काल्पनिक चित्रपट असून आम्ही त्यावर बंदी घालू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयाविषयी तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपिठाने या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने १५ नोव्हेंबरला चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती दिली.
पुरोहित यांच्या अधिवक्त्याने सांगितले की, चित्रपटात भगव्या आतंकवादावर चर्चा करण्यात आली आहे. या चित्रपटाने स्वतःची प्रतिमा डागाळल्याचे पुरोहित यांचे म्हणणे आहे.
चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले की, चित्रपटाच्या प्रारंभी ‘डिस्क्लेमर’ (अस्वीकरण) दाखवण्यात येईल की, हा चित्रपट काल्पनिक घटना आणि पात्र यांच्यावर आधारित आहे. त्याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
‘मॅच फिक्सिंग – द नेशन अॅट स्टॅक’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी गुर्जर यांनी केली असून चित्रपट केदार गायकवाड दिग्दर्शित आहे. या चित्रपटात विनीत कुमार सिंग, मनोज जोशी, किशोर कदम, राय अर्जुन इत्यादी कलाकार आहेत.