Haryana School Blast : विद्यार्थ्यांनी महिला शिक्षिकेच्या खुर्चीखाली रिमोटद्वारे केला फटाक्यांसारख्या बाँबचा स्फोट

  • भिवानी (हरियाणा) येथील घटना

  • शिक्षिका किरकोळ घायाळ

  • १३ विद्यार्थी निलंबित

भिवानी (हरियाणा) – येथील बोपारा गावातील एका सरकारी शाळेतील मुलांनी शाळेत महिला शिक्षिकेच्या खुर्चीखाली फटाक्यांसारखा बाँब ठेवून त्याचा रिमोटद्वारे स्फोट घडवला. यात शिक्षिका किरकोळ घायाळ झाल्या. याप्रकरणी शिक्षण विभागाने १३ आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी नरेश महता यांनी सांगितले की, वर्गातील १५ मुलांपैकी १३ मुलांचा या घटनेत सहभाग होता. एका मुलाने बाँब बनवला होता, दुसर्‍याने तो खुर्चीखाली ठेवला होता आणि तिसर्‍या मुलाने रिमोटद्वारे बाँबचा स्फोट घडवला. या मुलांना शाळेतून काढून टाकण्यावर चर्चा झाली; मात्र कुटुंबियांनी लेखी क्षमा मागितली आहे. महिला शिक्षिकेनेही मुलांना क्षमा केली आहे.

शिक्षिका म्हणाल्या की, जर या मुलांनी मॉडेल बनवून ते सादर केले असते, तर आम्ही त्यांचा सन्मान केला असता; मात्र आता हे सर्व प्रकरण मिटले आहे..

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा असा उपयोग होणे म्हणजे शाळेत त्यांच्यावर नैतिक मूल्यांचे शिक्षण अन् संस्कार झाले नसल्याचेच दर्शक आहे. असे शिक्षण काय कामाचे ?