स्वराज्य घडवणार्‍या महाराजांचा महाराष्ट्र आता जातीपातींमध्ये वाटला गेला आहे ! – राज ठाकरे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पुणे – महाराष्ट्र यापुढे कोणत्या दिशेने जाणार आहे ? हे सांगणारी ही निवडणूक आहे. सध्या सगळ्या गोष्टी जातीपातींमध्ये बघण्यास चालू झाले आहे. महाराष्ट्राची घाण करून ठेवली आहे. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य घडवणार्‍या महाराजांचा महाराष्ट्र आता जातीपातींमध्ये वाटला गेला आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांनी पुण्यामध्ये कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघांतील मनसे उमेदवारांसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी आरक्षण आणि जातीच्या राजकारणाच्या सूत्राला हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, स्वतःच्या जातीविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे; मात्र दुसर्‍याच्या जातीविषयी द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर चालू झाला आहे. पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण चढाओढ लावून दिली. आता मराठा आणि ओबीसी लावून दिली, तसेच जेम्स लेनचे पुस्तक आले. हे आधी ‘बॅन’ करा, हे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. नंतर ‘भांडारकर इन्स्टिट्यूट’ फोडली. हे सगळे शरद पवारांचे राजकारण आहे. सगळे जातीचे राजकारण शरद पवारांचे आहे. यांनी केवळ मतभेद नाही, तर मनभेद पण करून टाकले.