महिला आयोगाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : कानपूरमध्ये एकता गुप्ता हत्याकांडानंतर उत्तरप्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेविषयी राज्य सरकारकडे नवे प्रस्ताव पाठवले आहेत. एका प्रस्तावानुसार शिवणकाम करणार्या पुरुषांना महिलांच्या कपड्यांचे मोजमाप करता येणार नाही. तसेच व्यायामशाळा आणि योगकेंद्र यांमध्ये महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करणे, प्रशिक्षण केंद्रांच्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’द्वारे देखरेख ठेवणे अनिवार्य करणे आणि अशा ठिकाणी शौचालयांची योग्य व्यवस्था करणे यांसाठीही प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. या प्रस्तावांना सरकारने मान्यता दिल्यानंतर हे नवे धोरण लागू होणार आहे.
१. अलीकडेच उत्तरप्रदेश राज्य महिला आयोगाची बैठक झाली होती. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सूत्रांवर चर्चा झाली आणि काही नवीन प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२. बैठकीत महिलांसाठी विशेष कपडे आणि उपकरणे विकणार्या दुकानांमध्ये ग्राहकांना साहाय्य करण्यासाठी महिला कर्मचारी नियुक्त करणे, शालेय आणि महाविद्यालयीन बसगाड्यांमध्ये महिला सुरक्षारक्षक अन् महिला शिक्षक असणे अनिवार्य करणे, नाट्यकला केंद्रांमध्ये महिला नृत्य शिक्षिकांची नेमणूक करणे आणि तेथे ‘डी.व्ही.आर्.’ (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) आणि ‘सी.सी.टी.व्ही.’ असणे अनिवार्य करणे, कपडे विक्री करणार्या दुकानांमध्ये (‘बुटीक’ केंद्रांवर) कपड्यांचे मोजमाप घेण्यासाठी शिवणकाम करणार्या महिलांची नेमणूक करणे इत्यादी प्रस्तावांचा समावेश आहे.