Trudeau ‘Will Be Gone’ : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे पुढील निवडणुकीत पतन होणार ! – इलॉन मस्क

‘एक्स’चे मालक असलेले इलॉन मस्क यांचे भविष्य !

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या डॉनल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय तथा या निवडणुकीत ट्रम्प समर्थक राहिलेले टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय पतनाचा अंदाज वर्तवला आहे. ‘एक्स’चेही मालक असलेले मस्क यांनी ‘एक्स’वर लिहिले की, जस्टिन ट्रुडो यांना यावर्षी कॅनडामध्ये होणार्‍या निवडणुकीत मतदार घरची वाट दाखवणार आहेत. ट्रुडो आगामी निवडणुकीत बाहेर पडतील.

१. वर्ष २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेल्या ट्रुडो यांना सध्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कॅनडामध्ये अल्पमतातील सरकार चालवणार्‍या ट्रुडो यांच्यावर दबाव वाढत आहे.

२. सध्या कॅनडाच्या संसदेतील ३३८ सदस्यांपैकी ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाकडे १५३ सदस्य आहेत. खलिस्तानसमर्थक जगमीत सिंह यांच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ने (एन्.डी.पी.ने) अलीकडेच ट्रुडो यांना दिलेले समर्थन काढून घेतले आहे.

३. पुढील निवडणुकीत कॅनडाच्या पंतप्रधानांना मुख्य विरोधी पक्ष असलेल्या ‘कंझर्व्हेटिव्ह पार्टी’ आणि ‘एन्.डी.पी.’ यांच्याशी लढावे लागेल. बहुतांश सर्वेक्षणांमध्ये ट्रुडो यांचा लिबरल पक्ष पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

४. गेल्या महिन्यातच पक्षाच्या २४ खासदारांच्या गटाने ट्रुडो यांच्या त्यागपत्राची मागणी केली होती आणि त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.