निवडणूक विशेष !
पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मतदानावर बहिष्कार !
अंबरनाथ – अंबरनाथ शहरात गेल्या ८ वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या असल्याने त्रस्त झालेल्या मतदारांनी ‘पाणी नाही, तर मत नाही’, अशी भूमिका घेत मतदानावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली आहे. तेथे मुबलक पाणी मिळत नाही, तसेच केवळ १० मिनिटेच पाणी येते. प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याची त्यांची समस्या आहे.
संपादकीयलोकशाहीत अशी वेळ येणे दुर्दैवी ! |
मनसेचे अखिल चित्रे ठाकरे गटात जाणार !
मुंबई – मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे मनसे पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामुळे मनसेला धक्का बसला आहे. चित्रे हे मनसेच्या टेलिकॉम सेनेचे कार्याध्यक्ष होते. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला.
निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा हिशोब द्यावा लागणार !
नाशिक – येथील उमेदवारांना प्रचारावर होणार्या खर्चाचा हिशोब द्यावा लागणार असून खर्च निरीक्षकांद्वारे ७ नोव्हेंबरपासून खर्चाच्या पडताळणीला प्रारंभ झाला. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना हा हिशेब द्यावा लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी प्रदान केलेल्या ओळखपत्रासह, अभिलेखे, खर्चाची नोंदवही, मूळ प्रमाणके, अद्ययावत बँक पासबुक/ स्टेटमेंट यांसह वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केले आहे.
साडेतीन कोटी रुपये नेणारे वाहन जप्त !
नालासोपारा – येथे साडेतीन कोटी रुपये घेऊन जाणारे वाहन स्थानिक भरारी पथकाने जप्त केले आहे. हे वाहन नालासोपारा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या रकमेचा नेमका हिशेब देण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.
आध्यात्मिक जयघोषाने निवडणूक प्रचार !
बेलापूर – ठाणे जिल्ह्यातील भाजपचे प्रभावी नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केल्यावर त्यांच्या समर्थकांनी ‘राम कृष्ण हरि…वाजवा तुतारी’चा जयघोष केला. आता भाजपच्या प्रचारकांनी ‘जय श्रीराम’ म्हणत गल्लोगल्ली प्रचार चालू केला आहे. मनसेचे कार्यकर्ते ‘यंदा गजाननाची वारी’ असे म्हणत प्रचार करत आहेत.