मुंबई : हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवण्यासाठी टाटा रुग्णालयाबाहेर मुसलमानांचा बनाव !

  • विनामूल्य भोजन घेतांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास मुसलमान महिलेने नकार दिल्याचे प्रकरण

  • ‘आम्ही भोजन देतो, पण कुणाला ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास लावत नाही’, असे सांगत अन्नदानाचा व्हिडिओ केला प्रसारित !

मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या बाहेर रुग्णाच्या नातेवाइकांना एक वृद्ध हिंदु गृहस्थ त्यांच्या सहकार्‍यांसह विनामूल्य भोजन वाटप करत होते. भोजन देतांना ते ‘जय श्रीराम’ म्हणून भोजन घेण्यास सांगत होते. या वेळी एका महिलेने ‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार देत घटनास्थळी वाद घातला. त्यानंतर काही मिनिटांमध्येच या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात पसरवून हिंदूंना धर्मांध आणि संकुचित ठरवण्यात आले; मात्र हा व्हिडिओ ठरवून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘सनातन प्रभात’च्या निदर्शनास आला. ‘सनातन प्रभात’च्या ‘एक्स’ खात्यावरून यासंदर्भात जनजागृती करणारी पोस्ट जगभरात ४ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचली.

व्हिडिओ चित्रीत करण्यासाठी ‘मुंबई टी.व्ही.’ या मुसलमानांच्या यू ट्यूब चॅनलचा एक मुसलमान पत्रकार आधीच घटनास्थळी छायाचित्रक लावून होता आणि त्यानंतर मुसलमान महिलेने येथे वाद घातला, जणूकाही सर्व पूर्वनियोजितच होते. या घटनेवरून एका तिसर्‍याच व्यक्तीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधीने याविषयी घटनास्थळी जाऊन आणि ज्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली, त्या भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली असता हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी हे षड्यंत्र करण्यात आल्याचे उघड झाले.

मुसलमान महिला आणि मुसलमान पत्रकार यांनी ठरवून व्हिडिओ बनवला !

या ठिकाणी वाद घालणार्‍या मुसलमान महिलेने आदल्या दिवशीही वृद्ध हिंदूशी वाद घातला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ‘मुंबई टी.व्ही.’च्या मुसलमान पत्रकाराशी संधान साधून हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला. व्हिडिओ चित्रीत करण्यापूर्वी स्वत:ची ओळख उघड होऊ नये, यासाठी महिलेने ओढणीने स्वत:चे तोंड झाकून घेतले आणि त्यानंतर वाद घातला. हा प्रकार झाल्यानंतर मुसलमान पत्रकाराने पुन्हा वाद घालणार्‍या महिलेला भेटून तिची प्रतिक्रिया प्रसारित केली.

पत्रकार आणि महिला यांनी वृद्ध हिंदूला उकसावले !

या वेळी महिलेने वाद घातल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने वृद्ध हिंदूला भोजन देतांना ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडिओ चित्रीत केला. वृद्धाने पत्रकाराला हुसकावल्यावर त्याने महिलेची प्रतिक्रिया घेतली.

मुसलमानांकडून अन्नदान चालू करून जाणीवपूर्वक व्हिडिओचे प्रसारण !

या प्रकारानंतर दुसर्‍या दिवशी काही मुसलमानांनी टाटा रुग्णालयाच्या बाहेर अन्नदान केले आणि याचे व्हिडिओ ‘मुंबई टी.व्ही.’ या यू ट्यूब चॅनलवरून जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आले. या व्हिडिओत भोजन वाटप करणारा टोपी घातलेला मुसलमान म्हणत आहे की, ‘आम्ही भोजन देतो, पण कुणाला ‘अल्लाहू अकबर’ म्हणण्यास लावत नाही !’

त्रयस्थ व्यक्तीद्वारे पोलिसांकडे तक्रार !

या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भेट घेतली. त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली असता वाद घालणारी महिला किंवा ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगणारा वृद्ध हिंदू यांपैकी कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नव्हती. तक्रार नोंदवणारी व्यक्ती त्रयस्थ आहे. त्यांची तक्रार नोंद करून घेण्यात आली, तसेच संबंधित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करून त्यांना समज देण्यात आली, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

गुन्हा नोंद झालेला नाही !

भोजन देणार्‍या वृद्ध हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगणे, हा काही गुन्हा ठरत नाही. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी भोजन न देण्याविषयी सांगण्यात आले आहे, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मांध ठरवण्यासाठी मुसलमान कशा क्लृप्त्या करतात, हे यावरून लक्षात येते. अशांवर मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का ?