हिंदु ही संपूर्ण जगात केवळ एकच सभ्यता अशी आहे, जी १ सहस्र ४०० वर्षांपासून निरंतर आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करतांना कोट्यवधी हिंदूंनी हिंदु धर्म आणि पवित्र धरतीमाता यांच्यासाठी वर्षानुवर्षे बलीदान दिले आहे. हा हिंदूंचा देश आहे, येथील धर्म, संस्कृती, विचारसरणी आणि परंपरा सनातनी हिंदु आहेत. आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्मांड किंवा सृष्टी यांचा खोलवर अभ्यास करून दायित्वाच्या रूपात आपल्याला परंपरा सोपवल्या आहेत. त्यांचे रक्षण करणे आपले दायित्व आहे. या परंपरांचा भाग आपली वैदिक शेती होती. ती पूर्वी संपन्न होती. त्याउलट आज ‘हरित क्रांती’ आली आहे. त्यामुळे आपल्या शेतीची प्रचंड हानी झाली आहे. आपल्याकडे वनशेती होती, वैदिक अर्थव्यवस्था होती आणि पाणी साठवण्याची व्यवस्था होती. अशा प्रकारे प्रत्येक विषयाची व्यवस्था होती. आज सौर उर्जेचे (सोलर एनर्जीचे) भूत सर्वांच्या मानगुटीवर बसले आहे. प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी आपण आपल्या मूळ चालत आलेल्या गोष्टींवर खोलवर विचार केला पाहिजे.
२० ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पर्यावरणाचे रक्षण हाच आपला धर्म आणि आपले आचरण, पर्यावरणाच्या द़ृष्टीने चिमण्यांचे महत्त्व अन् भारत जगातील ‘सर्वांत मोठा गोमांस निर्यातदार देश’ असणे दुर्दैवी’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
उत्तरार्ध
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/846144.html
६. सनातन परंपरा सोडल्याने समाजाची अपरिमित हानी
पूर्वी केवळ महिलांच्या हक्काविषयी बोलले जात होते. आज लिंगपालट आणि यंत्रमानवाचे (रोबोटस्चे) अधिकार यांची गोष्ट होत आहे. आपल्याकडे झाडांनाही अधिकार दिले आहेत. आपल्या शास्त्रामध्ये तर झुडपाचाही अधिकार आहे.
माऽनुशोकं कुरुष्व त्वं स्थानत्यागं च मा कुरु ।
देवतापूजनार्थाय प्रार्थयामि वनस्पते ॥
अर्थ : हे वनस्पती, तू शोक करू नकोस, तसेच स्थानत्यागही करू नको. देवता पूजनासाठी मी तुला (फुले देण्याची) प्रार्थना (विनंती) करतो.
आपण एका फुलाच्या झुडपाकडे प्रभुचरणी अर्पण होण्यासाठी फुले तोडण्याची अनुमती मागतो. त्याला हात जोडून प्रार्थना केल्याविना तुम्ही त्याची फुले तोडू शकत नाही. या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. किमान या सर्व गोष्टी आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. आपण सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ हा श्लोक म्हणतो. भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी ‘समुद्र वसने देवी…’ असा श्लोक म्हणतो. बाहेर जाऊन आकाशातील सूर्याला नमस्कार करतो. लेखणी उचलतांना सरस्वतीदेवीचे स्मरण केले जाते. ही सर्व आपली परंपरा आहे. हे आपण सर्व सोडले आणि पुष्कळ काही गमावले आहे.
सौ. मीनाक्षी शरण यांचा परिचय
‘सौ. मीनाक्षी शरण या ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी संस्कृत आणि इतिहास या विषयांमध्ये संशोधन केले आहे. वेद आणि विविध शास्त्रे यांमध्ये त्यांनी ‘सरस्वती सभ्यता आणि पवित्र नदी सरस्वतीचे महत्त्व’, या विषयावर संशोधन कार्य केले आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहाराची भीषणता त्या सर्वांसमोर मांडतात, तसेच नरसंहार झालेल्या हिंदूंसाठी त्या सामूहिक तर्पणाचे आयोजनही करतात. व्यावहारिक जीवनात व्यस्त असूनही धर्माप्रती श्रद्धा आणि तळमळ असल्यामुळे त्या नियमितपणे अध्ययन करून लोकांमध्ये हिंदु धर्म अन् संस्कृती यांविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
लोकसंख्या प्रतिदिन प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्वांना रस्ते आणि डोक्यावरून जाणारे पूल पाहिजेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. आपल्याला सहस्रो झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात येते. कोण पहायला गेले किती वृक्ष लावली आणि किती मोठी झाली ? जे वृक्ष धरतीच्या खाली जाऊन मुळे पकडून आहेत, त्यांना पुनर्स्थापित कसे करणार ? कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणतात, ‘त्या वृक्षांचे स्थलांतर करणार.’ येथे महत्त्वाचे, म्हणजे वृक्षाचे स्थलांतर करायचे झाले, तर झाड काही चालू शकत नाही. काही मोजक्याच प्रकारच्या झाडांचे स्थलांतर होऊ शकते. आपल्याला शास्त्राने पिंपळाचे १, चिंचाची १०, फणसाची ३, बेलाचे १, आवळ्याची ३, आंब्याची ५ आणि काही अन्य झाडे लावणे अनिवार्य केले आहे. परंपरा आणि मी यांमध्ये कोणताही भेद नसतो. आपल्यासाठी पर्यावरणाचे रक्षण हाच आपला धर्म आणि आपले आचरण आहे. याविषयी आपल्या मुलांवर आतापासून संस्कार करणे चालू करा; कारण वेळ फार अल्प आहे. पर्यावरण आपल्या शास्त्राच्या प्रत्येक ओळीत आणि पेशीपेशींत भरलेले आहे. ओझोनच्या स्तराला भोक पडल्याने अतीनील किरणे पृथ्वीवर पडतात. त्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे, हे कळायला वर्ष १९८२ लागले. वर्ष १९८४ मध्ये जागतिक तापमानवृद्धीविषयी पहिली समिती सिद्ध झाली.
७. हरित क्रांतीमुळे उच्च प्रथिनेयुक्त धान्याच्या पारंपरिक प्रजाती नष्ट !
वर्ष १९६० मध्ये हरित क्रांती आली. भारताने ‘रॉक फाऊंडेशन’ आणि ‘फोर्ड फाऊंडेशन’ यांना साहाय्य केले अन् आपली पारंपरिक शेतीची व्यवस्था नष्ट केली. हेच हरित क्रांतीचे लोक सुधारित बीज आपल्याला विकत आहेत. त्यांनी किमान ७० टक्के प्रजातीचे बीज या जगातून नष्ट केले. बीज निर्मितीची एकाधिकारशाही केली. ४-५ आस्थापने सुधारित बीज करतात आणि एकाधिकारशाहीचे नियंत्रण ठेवतात. तेच तुम्हाला खत देतात. एका वर्षी शेतीमध्ये चांगले पीक येते. पुढील वेळी तेच खत किंवा कीटकनाशक काम करत नाही. त्यामुळे त्याहून अधिक जालीम (स्ट्राँग) असे कीटकनाशक वापरले जातात. जे कर्करोगाला निमंत्रण देते. हेच लोक आपल्यासाठी कर्करोगावरील औषधेही निर्माण करतात; कारण ते तुम्हाला कर्करोगही देतात. भारतात २० टक्के कीटकनाशके पंजाबमध्ये वापरली जातात. त्यामुळे तेथे कर्करोगाचे रुग्णही अधिक आहेत. ‘वेदनाही तेच देणार आणि तुम्हाला औषधही तेच देणार’, असे त्यांचे कार्य चालते.
आपल्या लोकांकडे १ लाख १० सहस्रांहून अधिक तांदुळाच्या जाती होत्या. त्यापैकी आज केवळ ८-१० शेष राहिल्या आहेत. उच्च प्रथिने आणि सुंदर प्रकारच्या जाती होत्या, त्या सर्व नष्ट झाल्या. भारतात संपूर्ण जगातील ३० टक्के भूमी आहे. ती पशूपालन आणि चारा उगवण्यासाठी होती. या तंबाखूच्या डब्यावर लिहिलेले असते, ‘तंबाखू हे आरोग्याला हानीकारक आहे.’ ते जाणतात की, तुम्हाला तंबाखूचे व्यसनही लागू शकते. त्यांना हेही ठाऊक आहे की, त्यामुळे तुम्हाला कर्करोगही होऊ शकतो; परंतु ते स्वार्थापायी त्याची विक्री करत रहातात. हेच औषधनिर्मिती आणि खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग उभारतात. एवढे प्रगत विज्ञानशास्त्र आहे, तर आजच्या काळात एवढे अधिक आजार का वाढले आहेत ?, अधिक प्रमाणात मधुमेही लोक का आहेत ?, एवढे अधिक हृदयरोगाचे रुग्ण का आहेत ? आपल्याकडे किमान ५७३ प्रकारचे आदिवासी लोक आहेत, जे जंगलात लपूनछपून रहातात. त्यांचे आपल्याशी काही देणे-घेणे नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी ३ सहस्रांहून अधिक वनस्पतींचे प्रकार टिकवून ठेवले आहेत. ३०० हून अधिक अन्नाचे प्रकार टिकवून ठेवले आहेत, ज्याचा वापर कीटकनाशक आणि खते यांप्रमाणे केला जातो.
८. पृथ्वी टिकवून ठेवण्यासाठी सनातन प्रथा आणि परंपरा यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक !
काँक्रीट उद्योगात वाळू मोठ्या प्रमाणात वापरली जाते. वाळू ही प्लास्टिकपेक्षा अधिक प्रदूषण करणारी गोष्ट आहे. जगातील किमान १० टक्के पाणी काँक्रीट इंडस्ट्री वापरते. आपल्या प्राचीन मंदिरांमध्ये काँक्रीट मुळीच वापरण्यात आले नाही, तरीही ती अनेक वर्षांपासून आजतागायत उभी आहेत. कितीतरी मंदिरे आक्रमण झाल्यानंतर उद़्ध्वस्त झाली आहेत. त्यापैकी काही अर्धवट तोडफोड केलेली आणि काही भग्नावस्थेत अजूनही उभी आहेत. याउलट आपण उभारलेल्या काँक्रीटच्या इमारती सहज पडत असतात. काँक्रीटमुळेही फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
आपले कपडे शुद्ध सुती किंवा रेशमी नसतील, तर त्यामध्ये ७० टक्के धागे प्लास्टिकचे घातलेले आहेत. त्यामुळे आपण फार मोठ्या प्रमाणात या भूमीचे आणि येणार्या पिढीची हानी करत आहोत; कारण की आपण हे कपडे काढून टाकले, तरी ते सहस्रो वर्ष पृथ्वीवरून नष्ट होऊ शकत नाहीत. भारतात पूर्वी सुती कपडे परिधान केले जात होते. खादीचे विविध प्रकारचे कपडे वापरले जात होते. त्याला कोणत्याही प्रकारे शिवण करावे लागत नाही आणि ते वायाही जात नाही. त्याच कापडाचा फेटा (पगडी) बांधतो, त्याच कापडाचे धोतर बांधतो. त्याचीच साडी नेसतो. त्यात कुठेही शिवणकाम इत्यादी काहीच करावे लागत नाही. त्या कापडाला कापून कापून त्याचेच तुकडे तुकडे करून त्यांचा उपयोग करतो. आपण त्या कापडाचा अधिकाधिक वापर करत होतो. ते वनस्पतीपासून निर्माण केले असल्याने शेवटी ते मातीत पूर्ण मिसळते आणि त्यापासून पुन्हा वनस्पती बनते.
त्यामुळे आपल्या प्रथांना आपल्या घरात आणि आपल्या मुलांमध्ये पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. मी स्वतःला अत्यंत धन्य समजते की, मी तसे माझ्या जीवनात करू शकले, माझ्या आचरणात आणू शकले आणि माझ्या मुलांनाही तसे आचरण करण्यासाठी प्रवृत्त करू शकले. कुठूनही कुणीही माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही की, माझे आचरण, माझे जीवन आणि माझे बोलणे यांत भेद आहे, तसेच ते कुठेही निसर्ग, धर्म किंवा देश यांच्याविरुद्ध होत आहे. येथून सनातन धर्माची जागृती चालू करायला पाहिजे. प्रत्येकाने आपले शास्त्र शिकून घेतले पाहिजे. सर्वांत मोठे आपले हिंदु धर्मशास्त्र आहे, आपले गुरु आहेत आणि आजही आपले शंकराचार्य आहेत. त्यांच्याखेरीज कुणालाही हिंदु धर्माविषयी बोलण्याचा अधिकार नाही.’
(समाप्त)
– सौ. मीनाक्षी शरण, संस्थापिका, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.