१. भाषेवर भावाचा परिणाम होऊन भाषा सात्त्विक होणे
‘भावाला भाषेचे बंधन नसते’, असे म्हणतात. साधकाच्या मनात देव किंवा श्रीगुरु यांच्या प्रती भाव असल्यास त्याला भाषेचे बंधन नसते. भावपूर्णरित्या कोणत्याही भाषेत लिहिले, बोलले किंवा वाचले, तरी भावातील सात्त्विकतेचा परिणाम भाषेतील अक्षरे, शब्द आणि वाक्य यांवर होऊन भाषेतून सकारात्मक स्पदंने प्रक्षेपित होऊ लागतात. यावरून ‘अध्यात्मात भाषेपेक्षा भावाला किती महत्त्व आहे’, हे लक्षात येते.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांनी सूक्ष्मातून किंवा स्वप्नात कोणत्याही भाषेत आत्मनिवेदन केल्यावर साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने ईश्वराने मार्गदर्शन करणे : अनेक साधकांना हिंदी किंवा इंग्रजी भाषा व्यवस्थित कळत नसूनही साधक स्वप्न पहात असतांना किंवा ते जागृत अवस्थेत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून कोणत्याही भाषेत आत्मनिवेदन केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित समजते. ही अनुभूती ईश्वरच साधकांना देतो; कारण ईश्वराला सर्व भाषा कळतात. त्यामुळे साधकांनी कोणत्याही भाषेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील ईश्वर साधकांना त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देतो. ईश्वर भावाचा भुकेला असल्यामुळे तो साधकांवर कृपावंत होऊन साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात वरीलप्रमाणे अनुभूती देतो.
१ आ. पू. सदानंद भस्मे महाराज यांनी काही भजने आणि त्यांचा अर्थ कन्नड भाषेत सांगितल्यावर कन्नड भाषा न कळणार्या साधकांचीही भावजागृती होणे : रामपूर, कर्नाटक येथील संत-कीर्तनकार पू. सदानंद भस्मे महाराज सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्यांनी कीर्तन सादर करतांना काही भजने मराठीत म्हटली, तर काही भजने कन्नड भाषेतून म्हणून त्यांचा अर्थ कन्नड भाषेत सांगितला. मला कन्नड भाषा कळत नसूनही त्यांनी कन्नड भाषेत म्हटलेली भजने आणि त्यांनी भजनांचा सांगितलेले अर्थ ऐकून माझी भावजागृती झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असणार्या कन्नड भाषिक साधकांप्रमाणे काही मराठी भाषिक साधकांचाही भाव जागृत झाला होता.
१ इ. पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी श्री गुरूंवरील श्लोक तमिळ भाषेत म्हटल्यावर त्याचा अर्थ न कळताही साधिकेची भावजागृती होणे : वर्ष २०१६ मध्ये जेव्हा पू. (सौ.) उमा रविचंद्रन सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी मराठीतील ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे …’ हा श्री गुरूंवरील श्लोक तमिळ भाषेत म्हणून दाखवला. तेव्हाही माझी भाव जागृती झाली.
वरील दोन्ही प्रसंगांमध्ये मला संबंधित भाषांचे ज्ञान नसूनही माझी भावजागृती झाली. याचा अर्थ भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. संतांमध्ये देवता आणि गुरु यांच्याविषयी इतका भाव असतो की, त्यांनी आपल्याला न कळणार्या भाषेत जरी अभंग किंवा श्लोक म्हटला, तरी साधकांची भावजागृती होते. यावरून ‘भावाला भाषेेचे बंधन नसते’, हे सूत्र शिकायला मिळते.
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी, त्रिगुणांपैकी व्यक्तीमध्ये कार्यरत गुण, व्यक्तीमध्ये कार्यरत घटक, भाषा आणि व्यक्ती यांचा एकमेकांवर परिणाम होणे ? अन् परिणामांचे स्वरूप
२. आध्यात्मिक पातळी वाढल्यावर भाषेवर चैतन्याचा परिणाम होऊन भाषा सात्त्विक होणे
२० ते ५९ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत भाषेचा व्यक्तींवर अधिक परिणाम होतो. ६० ते ६९ टक्के पातळीपर्यंत व्यक्तींमध्ये भाव वाढू लागतो. त्यामुळे व्यक्तींतील भावाचा परिणाम भाषेवर होऊन भाषा सात्त्विक होऊ लागते. त्याप्रमाणे ७१ टक्के पातळीनंतर साधक संत झाल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा परिणाम भाषेवर होऊन भाषा चैतन्यदायी होऊ लागते. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतील साधकांनी सात्त्विक भाषा शिकून ती बोलण्यावर भर द्यावा, तर पुढच्या म्हणजे, ५१ टक्के पातळी नंतरच्या साधकांनी सात्त्विक भाषा शिकून घ्यावी; परंतु अधिक लक्ष स्वत:ची साधना वाढवण्याकडे द्यावे. ७१ टक्के पातळीनंतर भाषा पालटण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. याची तीन उदाहरणे पुढे देत आहे.
तमिळनाडूतील सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन या तमिळ भाषिक असून त्यांची मातृभाषा तमिळ आहे. त्या तमिळ भाषेत स्थानिक साधकांशी बोलतात आणि तमिळ भाषेतच धर्म अन् अध्यात्म यांचा प्रसार करतात. त्या जेव्हा तमिळ भाषेत बोलतात, तेव्हा साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना त्यांच्या संदर्भात अनेक चांगल्या अनुभूती येतात, उदा. भाव जागृत होणे, चैतन्य आणि आनंद जाणवणे इत्यादी. अशीच अनुभूती कन्नड भाषा बोलणारे आणि कन्नड भाषेत कर्नाटक राज्यात धर्म अन् अध्यात्म यांचा प्रसार करणारे सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्या संदर्भात साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना येतात. यावरून ‘चैतन्याचा भाषेवर कशा प्रकारे परिणाम होतो’, हे सूत्र शिकायला मिळते.
कृतज्ञता
‘देवाच्या कृपेमुळे आम्हाला विविध भाषांचा आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासता आला’, यासाठी भगवंताच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |