मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर-राजकीय षड्यंत्र उलथवून टाकणार्या गृहमंत्र्यांची आत्मकथा’ ही स्वत:ची आत्मकथा पुस्तकरूपात प्रसिद्ध केली आहे. या आत्मकथेमध्ये त्यांनी स्वत: गृहमंत्री असतांना तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे मुंबईतील बार-हुक्का मालकांकडून हप्ते वसूल करत असल्याचे मान्य केले आहे; मात्र हे सर्व प्रकार मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या सांगण्यावरून चालू असल्याचे सांगत स्वत: त्यामध्ये सहभागी नसल्याचे म्हटले आहे. परमवीर सिंह यांना मोहरा बनवून अन्वेषण यंत्रणेच्या साहाय्याने भाजपने या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी आत्मचरित्रात केला आहे.
‘आत्मकथा’ म्हटली की, साधारण संबंधित व्यक्तीचा संपूर्ण जीवनपट उलगडणारी असते; मात्र अनिल देशमुख यांची आत्मकथा अंबानी विस्फोट प्रकरणापासूनच चालू झाली आहे आणि ‘मनसुख हत्याप्रकरण’, ‘त्यांच्यावरील १०० कोटी रुपये वसूलीचे आरोप’ आणि त्यांची अटक’ यांच्यापुरतीच संबंधित आहे. त्यामुळे ही आत्मकथा विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून लिहिण्यात आली का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न !
अनिल देशमुख गृहमंत्री असतांना दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्यावर खोटे आरोप करायला सांगितल्याचे यापूर्वी केलेले आरोप अनिल देशमुख यांनी स्वत:च्या आत्मचरित्रातही केले आहेत. असे करण्यास नकार दिल्यामुळेच अन्वेषण यंत्रणांनी त्यांना पैसे वसुलीच्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी पुस्तकात केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी आत्मचरित्रात केला आहे.
अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह !
गंभीर प्रकार म्हणजे निलंबित करण्यात आलेल्या सचिन वाझे याची कोरोनाच्या काळात पुर्ननियुक्ती झाल्यावर त्याचे ‘रिर्पाेटींग’ त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना न देता थेट परमवीर सिंह यांना देण्यात येत होते. पैसे वसुलीही त्याच्याद्वारेच होत होती; मात्र त्याविषयी त्यांना काहीच माहिती नसल्याचे अनिल देशमुख यांनी लिहिले आहे.
मनसुख हिरेन यांच्या केलेल्या निर्घृण हत्येचा पुस्तकातील तपशील मुंबई पोलिसांची इभ्रत वेशीवर टांगणारा आहे. यातून पोलिसांचे झालेले गुन्हेगारीकरण तर उघड झालेच आहे; मात्र यातून अनिल देशमुख यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबानी स्फोटके प्रकरणातील स्वत:चा सहभाग उघड होऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी या प्रकणातील महत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरेन यांची हत्या घडवून आणली; मात्र अंबानी स्फोटके प्रकरण सचिन वाझे यांनी का घडवून आणले ? याचा उलगडा या पुस्तकातूनही झालेला नाही. अनिल देशमुख यांनी आत्मचरित्रात दिलेली ‘अंबानी स्फोटक प्रकरण’, ‘मनसुख हिरेन प्रकरण’, ‘हप्ते वसुली प्रकरण’ आदी सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यात कोण दोषी आणि कोण निर्दाेष आहे ? हे सत्य पुढे येईल न येईल, हे आताच सांगता येणार नाही; मात्र या पुस्तकातून पुढे आलेले पोलिसांचे गुन्हेगारीकरण समाजाच्या दृष्टीने चिंता वाढवणारे आहे.