आमदार सुधीर गाडगीळ आज उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार !

भाजपमधील इच्छुक उमेदवार अप्रसन्न !

सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ हे २४ ऑक्टोबर या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर त्यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार आहेत. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. भाजपमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असतांनाही पक्षाने विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर विश्वास दाखवत पहिल्या सूचीतच त्यांचे नाव घोषित केले. असे असले, तरी भाजपमधील अनेक इच्छुक उमेदवार यामुळे अप्रसन्न झाले आहेत.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या बळावरच सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. महायुतीच्या योजना मतदारांपर्यंत पोचवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चिराग पासवान यांसह अनेक मान्यवरांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. भाजपचे नेते शेखर इनामदार विधानसभेसाठी इच्छुक होते; मात्र पक्षाने आमदार गाडगीळ यांनाच उमेदवारी दिल्याने ते अप्रसन्न आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माझे मत मांडणार आहे. त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.

भाजपने सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी घोषित केल्याने पक्षातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील २५ ऑक्टोबर या दिवशी सांगली येथे येणार आहेत. ते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, शिवाजी डोंगरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.