१. चीन येथील कु. ली मुझी हिने ‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकणे आणि ते चीनमधील प्रेक्षकांसमोर सादर करणे
‘१६.८.२०२४ या दिवशीच्या एका वर्तमानपत्रात मी एक वृत्त वाचले. ‘चीन येथील १३ वर्षांची कु. ली मुझी हिने ‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकून चीनमधील अनेक प्रेक्षकांसमोर ‘अरंगेत्रम्’ (टीप १) सादर केले !’, असे त्या वृत्ताचे शीर्षक होते. तिच्या अरंगेत्रम्साठी सुप्रसिद्ध नृत्यगुरु लीला सॅमसन यांनी स्वतः ‘नट्टुवांगम्’ (टीप २) केले. चीनमध्ये असे अरंगेत्रम् प्रथमच झाले.
टीप १ – ‘अरंगेत्रम्’ म्हणजे काही वर्षे नृत्य शिकल्यानंतर नृत्यगुरूंसमोर रंगमंचावर प्रथमच त्याचे सादरीकरण करणे.
टीप २ – ‘नट्टुवांगम्’ म्हणजे नृत्यरचनेतील बोल ‘तालम्’ (टीप ३), या वाद्यावर वाजवणे.
टीप ३ – टाळासारखे एक वाद्य
२. कु. ली मुझी हिने ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकाराविषयी व्यक्त केलेले मनोगत !
१३ वर्षांची कु. ली मुझी तिच्या एका मुलाखतीत ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकाराविषयी मत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘मी या नृत्यावर प्रेम करते. मला याची आवड असून मी ते प्रतिदिन करते. ‘भरतनाट्यम्’ नृत्य ही माझ्यासाठी केवळ एक सुंदर कला आहे, असे नाही, तर ते भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप आहे. या कलेमुळे मला भारतीय संस्कृतीविषयी जाणून घेता येते.’’ (‘कु. ली मुझी हिच्या या बोलण्यातून तिची कलेवरील निष्ठा आणि प्रेम दिसून येते, तसेच तिचा भारतीय कलेप्रतीचा आदरही जाणवतो.’ – संकलक)
३. कुठे भारतीय कला शिकणारी चीनमधील कु. ली मुझी, तर कुठे पाश्चात्त्य संस्कृती आणि संगीत यांचे अंधानुकरण करणारे भारतीय !
‘१३ वर्षांच्या या अभारतीय मुलीने भारतीय शास्त्रीय नृत्याविषयी असे उद्गार काढणे’, हे भारतियांसाठी कौतुकास्पद आहेच; परंतु दुसर्या बाजूने विचार केला असता भारतातील आजची तरुण पिढी पाश्चात्त्य संस्कृती आणि संगीत यांचे अंधानुकरण करत आहे. शास्त्रीय शैलीला जपणारे लोक अल्प आहेत आणि भारतीय शास्त्रीय संगीतात पाश्चात्त्य पॉप संगीत घालून असात्त्विक संगीत निर्माण करणारे अन् विडंबनात्मक नृत्य करणारे यांचे प्रमाण वाढले आहे.
भारतातील मुलांना आपली संस्कृती आणि शिक्षक यांच्याविषयी आदर वाटत नाही. ५.९.२०२४ या दिवशी शिक्षकदिनानिमित्त सर्वत्र एक चलत्चित्र (‘व्हिडिओ’) प्रसारित झाले होते. त्यात सध्या आलेल्या ‘आज की रात…’ या अश्लील गाण्यावर लहान मुलींनी तोकडे कपडे घालून नाच केला आहे. आपल्या देशातील पालकांनी ‘आपले मूल कोणत्या गाण्यावर आणि कशा पद्धतीने नाच करत आहे ?’, याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. केवळ १३ वर्षांच्या एका परराष्ट्रीय मुलीला भारतीय कला आणि संस्कृती यांविषयी आदर आहे अन् ती त्यातील आनंद अनुभवत आहे. आपण भारतीय मात्र पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून स्वतःकडे असणार्या मौल्यवान ठेव्याला (भारतीय कलांना) गमावत आहोत.
४. भारतीय कला शिकणार्यांसमोर आदर्श ठेवणारी कु. ली मुझी !
कु. ली मुझी हिने भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य इत्यादी कला शिकणार्यांसमोर आदर्श ठेवला आहे. ‘आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी भारतीय संस्कृतीच्या आचरणातून आपल्याला आनंद मिळतो आणि हीच संस्कृती आपल्याला परिपूर्णत्वाकडे नेते’, हे कु. ली मुझी हिच्या उदाहरणातून अधोरेखित होते. आपणही तिचा आदर्श समोर ठेवून भारतीय कला जोपासण्याचा आणि त्या ‘साधना’ म्हणून सादर करण्याचा संकल्प करूया !’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.१०.२०२४)
‘भारतीय कलांमध्ये (गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादींमध्ये) मुळातच सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात आहे’, हे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विविध वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सिद्ध केले आहे. ‘सूक्ष्म स्तरावर कलेची अनुभूती कशा प्रकारे घेता येते ?’, याविषयीचे दिशादर्शनही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.१०.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |