विद्यार्थी नेत्यांनी नियोजन करून आंदोलन केल्याची दिली माहिती !
न्यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशात शेख हसीना यांचा सरकार उलथवून लावण्यामागे कट होता, अशी स्वीकृती स्वतः बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस यांनी येथे दिली. प्रा. युनूस यांच्या भाषणाच्या वेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन त्यांच्या शेजारी उपस्थित होते. अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह’च्या सभेला संबोधित करतांना प्रा. युनूस यांनी ‘बांगलादेशातील आंदोलन अत्यंत सुनियोजित होते, ज्यामध्ये एकाही व्यक्तीला नेता बनवून अटक करण्यात आली नव्हती. यामुळे संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरणा मिळाली आणि ही चळवळ आणखीनच सशक्त झाली.
प्रा. युनूस पुढे म्हणाले की, जर तुम्ही आंदोलनाचे नेतृत्व करणार्या या विद्यार्थी नेत्यांचे चेहरे पाहिले, तर ते सामान्य तरुणांसारखे दिसतील; पण जेव्हा ते बोलू लागतात तेव्हा तुम्ही थरथरता. त्यांनी त्यांच्या भाषणाने आणि समर्पणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या संपूर्ण आंदोलनामागे माझा साहाय्यक महफूज याचा मेंदू होता. तो सतत हे नाकारत असतो; पण त्यामुळेच त्याला ओळख मिळाली. ही चळवळ अचानक चालू झालेली नाही. या चळवळीचे नेतृत्वही पूर्ण सिद्धतेने करण्यात आले होते.
जो बायडेन यांनी प्रा. युनूस यांना मिठी मारली !
प्रा. युनूस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली. बायडेन यांनी प्रा. युनूस यांना मिठी मारली. (बांगलादेशातील सत्तापालटामागे अमेरिका आहे, हे उघड झालेच आहे. अमेरिकेने हे मान्य केले नसले, तरी अमेरिकेत प्रा. युनूस यांचे झालेले स्वागत सर्व काही सांगत आहे. अमेरिकेने या काळात एकदाही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर एक शब्दही काढलेला नाही. एरव्ही भारतातील मुसलमानांवरील कथित अत्याचारांवर थयथयाट करणारी अमेरिका हिंदूंविषयी मात्र मौन बाळगते, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहे भारतीय गुप्तचरांना लक्षात आले होते का ? त्यांना हे लक्षात आले होते आणि त्यांनी शासनकर्त्यांना ही माहिती दिली होती, तर सरकारने सत्तापालट होण्याला रोखले का नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! बांगलादेशातील सत्तापालटामुळे भारताला होणारी हानी कशी भरून काढणार ? |