तेल्हारा (अकोला) येथील श्री बालाजी संस्थानच्या भूमीचा गैरव्यवहार उघडकीस !

  • महाराष्ट्र मंदिर महासंघाची पत्रकार परिषद

  • विश्‍वस्त आणि महसूल अधिकार्‍यांमधील संगनमत उघड !

  • मंदिराची ३० कोटी रुपयांची भूमी १० सहस्र रुपयांना विकली !

  • न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाची आंदोलनाची चेतावणी

डावीकडून सर्वश्री दयाराम शिरसाट, उदयजी महा, विनीत पाखोडे, अधिवक्ता अनुप जयस्वाल आणि श्रीकांत पिसोळकर

अकोला – जिल्ह्यातील तेल्हारा येथील श्री बालाजी मंदिर संस्थानच्या मालकीची ३० कोटी रुपये किमतीची शेतभूमी विश्‍वस्तांनी महसूल विभागाच्या तत्कालीन अधिकार्‍यांच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाने पत्रकार परिषदेत दिली आहे. या परिषदेला दयाराम शिरसाट, उदयजी महा; अमरावती येथील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, महासंघाचे राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी अधिवक्ता अनुप जयस्वाल, महासंघाचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, मौजे तेल्हारा बु. (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील या भूमीचे मूल्यांकन सुमारे ३० कोटी रुपये आहे; परंतु १० सहस्र रुपयांत ही भूमी विश्‍वस्त सुरेश दायमा, कांताप्रसाद दायमा आणि हेमंत दायमा यांनी महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने स्वतःच्या नावे करून घेतली. (अशांकडून त्यांनी हडप केलेले पैसे वसूल करून घ्यायला हवेत ! – संपादक) सर्वोच्च न्यायालयाच्या ए.ए. गोपालकृष्णन् विरुद्ध कोचीन देवस्वम् बोर्ड या प्रकरणातील निर्णयानुसार, धार्मिक स्थळांच्या भूमीचे संरक्षण करण्याचे दायित्व शासन, न्यायालय आणि मंदिर विश्‍वस्त यांचे आहे. श्री बालाजी संस्थानच्या भूमीच्या संदर्भात हा नियम पाळण्यात आला नाही.

गैरव्यवहाराचा तपशील

१. कायद्याच्या प्रावधानांचे उल्लंघन !

अ. कुळ शेतभूमी खरेदी आदेश देण्यापूर्वीच अकोटचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आर्.एन्. घेवंदे यांच्याकडून विश्‍वस्तांनाच शेतभूमी विक्रीची अनुमती दिली गेली.

आ. शेतभूमी नगर परिषद हद्दीत असतांना नगरपरिषद हद्दीतील शेतभूमींना कुळ कायदा लागू नसतांनाही बेकायदेशीररित्या शेत विश्‍वस्तांनाच खरेदी करण्याचे आदेश दिले गेले.

इ. तेल्हाराचे तत्कालीन तहसीलदार राजेंद्र खंदारे यांनी प्रकरणाचा तपशील न पडताळता भूमी खरेदी करण्याचा आदेश दिला.

ई. तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांनीही कुळ खरेदी कागदपत्रांविनाच सातबारामध्ये फेरफार केले.

२. विश्‍वस्तांकडून केला गेला विश्‍वासघात

अ. संस्थानच्या भूमीचा वापर शेतीसाठी नव्हे, तर अन्य कार्यासाठी केला जात असून त्यासाठी अनुमती घेतली गेली नाही.

आ. मंदिराच्या भूमीचे संरक्षण न करता विश्‍वस्तांनीच ती हडप केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाची कारवाईची मागणी !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल आणि जिल्हा संयोजक श्री. विनीत पाखोडे यांनी या प्रकरणातील बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट केल्या. अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित महसूल अधिकार्‍यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयात तक्रार प्रविष्ट करून दोषी मंदिर विश्‍वस्तांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

संस्थानचे भक्त सर्वश्री कैलास रत्नपारखी, दयाराम विरघट, मनोहर मिरगे, सेवकराम भारसाकळे, सुधाकर गावंडे, श्रीराम अस्वार यांनी विश्‍वस्तांना निलंबित करण्याचीही मागणी केली.

संपादकीय भूमिका

धार्मिक स्थळांच्या भूमींच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त केली पाहिजेत !