अखेर धर्माचा विजय !
कोल्हापूर शहरात १२ सप्टेंबरला घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये शहरातील पंचगंगा घाटावर महापालिकेकडून उभारलेल्या ‘बॅरिकेड्स’ला गणेशभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठामपणे विरोध केला आणि ‘वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणार’, अशी भूमिका ठेवली. या भूमिकेवर ठाम रहात गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे विसर्जन ‘बॅरिकेड्स’ हटवून वहात्या पाण्यातच केले. हिंदुत्वनिष्ठांनी घेतलेल्या ठाम भूमिकेविषयी अनेक गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आणि ‘यामुळेच आम्ही शास्त्रानुसार वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जित करू शकलो’, असे मत व्यक्त केले. या संदर्भात काही वर्षांपूर्वीची स्थिती आणि आतापर्यंत झालेल्या घडामोडी यांवर प्रकाश टाकणारा हा लेखप्रपंच !
– श्री. किरण दुसे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.
१. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यास भाग पाडणे
वर्ष २०१५ मध्ये पंचगंगा नदीच्या घाटावर गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी सगळीकडे मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात आले होते. कृत्रिम कुंडात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी उद्घोषणा करणे, तसेच ठिकठिकाणी मूर्तीदान घेणारे स्वयंसेवक, असे चित्र असे. अनेक गणेशभक्त, भाविक महापालिका प्रशासनाच्या फसव्या आवाहनाला, अपप्रचाराला फसून त्यांच्या मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित करायचे. पंचगंगा घाटावर एकत्र जमा झालेल्या या मूर्ती महापालिकेच्या डंपर किंवा ट्रक वा ट्रॉली यांच्या माध्यमातून इराणी खाणीत विसर्जित केल्या जायच्या. त्या वेळी काही मोजकेच श्री गणेशभक्त ज्यांना वहात्या पाण्यात विसर्जित करण्याचे शास्त्र माहिती होते, ते या प्रलोभनाला न भूलता वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जित करायचे.
त्या वेळी दुसरीकडे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते पंचगंगा नदीवरच भाविकांचे प्रबोधन करणारे फलक घेऊन गणेशभक्तांच्या वाटेवर उभे राहून भक्तांचे प्रबोधन करायचे. वर्ष २०१९ पर्यंत हे असेच चालू होते. या काळात अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांना, तसेच काही राजकीय पक्षांनासुद्धा मूर्ती विसर्जन कृत्रिम कुंडात करणे सयुक्तिक वाटत असे; कारण त्या वेळी ‘पंचगंगेत वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्या, तर नदीचे प्रदूषण होईल’, असा एक संभ्रम सर्वांच्या मनात त्या वेळेस होणार्या अपप्रचारामुळे निर्माण झाला होता. या काळात पत्रकारही मूर्ती कुंडात विसर्जन करण्याच्या दृष्टीनेच वृत्त प्रसिद्ध करत आणि समितीच्या भूमिकेशी सहमत नव्हते.
२. विसर्जनाला मज्जाव करण्यासाठी ‘बॅरिकेड्स’ची उभारणी
वर्ष २०२० नंतर कोरोना महामारी संसर्गाच्या काळात प्रशासनाने कडक निर्बंध घातले आणि मूर्ती विसर्जन होऊ नये म्हणून पंचगंगा घाटावर ‘बॅरिकेड्स’ची उभारणी केली. दळणवळण बंदी आणि आपत्कालीन स्थिती म्हणून गणेशभक्तांनी कृत्रिम कुंडांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या. कोरोनाचा काळ संपल्यावरही वर्ष २०२२ मध्ये महापालिकेने हे ‘बॅरिकेड्स’ तसेच ठेवले आणि भाविकांवर बळजोरी करत कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करायला लावल्या.
३. वर्ष २०२३ मध्ये उभारलेले आंदोलन आणि मिळालेले यश !
वर्ष २०२३ च्या गणेशोत्सवात कोल्हापूरमधील हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समिती हे सर्व एकवटले अन् धर्मशास्त्रानुसार कृती करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि आंदोलनाला प्रारंभ झाला. यात सर्वांत प्रथम कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना आणि नंतर जिल्हाधिकार्यांकडे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले; पण त्यांनी निवेदनातील मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
अशा परिस्थितीत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची ठाम भूमिका पत्रकारांपुढे मांडली. यानंतर परत एकदा के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन परखड शब्दांत भूमिका मांडली. एवढे होऊनही प्रशासन पंचगंगा नदीच्या काठावर असलेले ‘बॅरिकेड्स’ काढण्यास सिद्ध नव्हते. अखेर घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांनी ‘बॅरिकेड्स’ हटवले आणि शास्त्रानुसार पंचगंगेतच मूर्ती विसर्जन केले. यामुळे गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले, तसेच पत्रकारांनी प्रथमच हिंदुत्वनिष्ठांची भूमिका योग्य असल्याचे मान्य केले. पत्रकारांनी एक पाऊल पुढे येत सकारात्मक वृत्ते, म्हणजेच गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करण्याची वृत्ते प्रसिद्ध केली.
४. यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासनाचा पुन्हा आडमुठेपणा आणि गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त कृती !
वर्ष २०२४ मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि स्वत:ची ठाम भूमिका स्पष्ट केली. तरीही महापालिकेच्या वतीने घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी ‘बॅरिकेड्स’ लावण्यात आले. ११ सप्टेंबर या दिवशी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी-कार्यकर्ते नदीघाटावर जमा झाले आणि त्यांनी पत्रकारांपुढे ‘बॅरिकेड्स’ काढून गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जित करणार’, अशी ठाम भूमिका घेतली. या प्रसंगी त्यांनी गणेशभक्तांना १२ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता नदीघाटावर एकत्र येण्याचे आवाहन केले. हिंदुत्वनिष्ठांनी गेली २ वर्षे केलेले प्रबोधन आणि श्री गणेशाची कृपा यांमुळे यावर्षी दुपारी दीड वाजताच गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन ‘बॅरिकेड्स’ काढले अन् गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन, तसेच अनेक गणेशभक्तांनी येऊन ही कृती पूर्ण केली आणि गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात करायला प्रारंभ केला. यानंतर मोठ्या प्रमाणात पंचगंगेच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
यात पत्रकारांनीही सकारात्मक भूमिका बजावली आणि ‘हिंदुत्वनिष्ठांची योग्य भूमिका आहे’, हे समाजापर्यंत पोचवले. यावर्षीचे वैशिष्ट्य, म्हणजे कोल्हापूरमध्ये वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्याविषयी उठलेल्या या आवाजाचा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रतिसाद पहायला मिळाला. गाव आणि तालुका स्तरांवरही स्थानिक हिंदुत्वनिष्ठ यासाठी एकवटले अन् त्यांनी प्रशासनाकडे त्यांची भूमिका स्पष्ट केली. परिणामी विसर्जनाच्या दिवशी वहात्या पाण्यातच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सामाजिक माध्यमांद्वारेही ही मोहीम हिंदूंनी उचलून धरली आणि सगळीकडे ‘गणेशभक्त वहात्या पाण्यातच मूर्ती विसर्जन करणार’, असे वातावरण सिद्ध झाले.
गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेच्या पालटलेल्या स्वरूपाविषयी लक्षात आलेली सूत्रे !
१. धर्मशास्त्राप्रमाणे ‘गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य आहे’, या धर्मवचनावर ‘श्रद्धा ठेवून आणि चिकाटीने प्रयत्न करत कृती केल्यामुळे ईश्वर निश्चितच यश देतो’, हे लक्षात आले. यासाठी भलेही अधिक कालावधी लागेल; पण निश्चितपणे धर्माचा विजय होतो, हे लक्षात आले.
२. प्रारंभीच्या टप्प्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आरंभलेली ही मोहीम हळूहळू श्री गणेश आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभी हिंदुत्वनिष्ठ अन् नंतर गणेशभक्त यांच्या अंतर्मनापर्यंत पोचली. त्याच्याच फलस्वरूपात यंदाचे गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये झाले.
३. धर्मरक्षणाची एखादी मोहीम चालू करून टप्प्याटप्प्याने ती पुढे कशी न्यायची ? त्यामध्ये अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य हिंदू यांना सहभागी करून ती मोहीम व्यापक कशी करायची ? हेसुद्धा यातून शिकायला मिळाले.
– श्री. किरण दुसे
५. पुढील दिशा
कोल्हापूर शहरात काही ठिकाणी कृत्रिम कुंडाचा वापर होत असून त्यात मूर्ती विसर्जित होत आहेत, असे लक्षात आले. ‘येणार्या काळात हिंदुत्वनिष्ठ हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवतील आणि तेही मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करतील’, असेच आशादायी वातावरण या वर्षी अनुभवायला मिळाले. (१३.९.२०२४)