गोव्यात मागील ४ वर्षांत चोरट्यांनी ५८ धार्मिक स्थळांना केले लक्ष्य !

पणजी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीत मंदिरे, चर्च आणि चॅपल (लहान स्वरूपातील चर्च) मिळून एकूण ५८ धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आहे आणि यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे. पोलिसांना ११ प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले; मात्र यामधील ५ प्रकरणांमध्ये संशयित आरोपीची निर्दाेष मुक्तता झाली. पोलिसांनी एकूण प्रकरणांमधील १८ प्रकरणांचे अन्वेषण थांबवले आहे, तर अन्य १२ प्रकरणांचे अन्वेषण अजूनही चालू आहे.

मागील ४ वर्षांत धार्मिक स्थळांची तोडफोड करण्याची एकूण १४ प्रकरणे उघडकीस

जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीत धार्मिक स्थळांमध्ये चोरीच्या घटनांबरोबरच धार्मिक स्थळांची तोडफोड करण्याची एकूण १४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. पोलिसांनी यांमधील ७ प्रकरणांचे अन्वेषण बंद केले आहे, तर अन्य ५ प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. यांमधील एका प्रकरणात संशयिताला कह्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

उत्तर गोवा पोलिसांच्या वतीने मंदिरांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना

उत्तर गोवा पोलिसांनी मंदिरांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, चोरीसंबंधी अलार्म (गजर) यंत्रणा बसवणे आणि मंदिर परिसरात पुरेशा प्रमाणात प्रकाशव्यवस्था उपलब्ध करणे यांवर भर देण्याची सूचना मंदिर विश्वस्तांना केली आहे.
मंदिरांतील चोर्‍यांसंबंधी सर्वांमध्ये जागृती करण्यासाठी उत्तर गोवा पोलिसांनी मागील १ महिन्यात आतापर्यंत अनेक मंदिरांच्या विश्वस्तांसमवेत बैठका घेतल्या आहेत. या सर्व बैठकांमध्ये सुमारे २५० हून अधिक मंदिर विश्वस्तांनी सहभाग घेतला आहे. पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात गस्त वाढवली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी पेडणे पोलिसांनी मंदिर समित्यांच्या सदस्यांचा एक व्हॉट्सॲप गट बनवून त्यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत.

डिचोली येथील मंदिरातील चोरीच्या प्रकरणी संशयित युवक पोलिसांच्या कह्यात

डिचोली – शहरातील वृंदावन अपार्टमेंटमधील श्री शिवलिंग मंदिरात १२ सप्टेंबर या दिवशी मध्यरात्री चोरी झाली होती. या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी डिचोली शहरातील बंदरवाडा येथे रहाणारा आकाश भीमाप्पा तालकेरी (वय २३ वर्षे) या संशयित युवकाला कह्यात घेतले आहे. गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अन्य मंदिरांतील चोरीच्या प्रकरणांमध्ये संशयित युवकाचा हात आहे कि नाही, याचा पोलीस तपास करत आहेत.