साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांना क्षणोक्षणी साहाय्य करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘११.५.२०२४ या दिवशी एका सत्संगात माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर माझा साधनाप्रवास माझ्या डोळ्यांसमोर तरळला आणि प्रत्येक प्रसंगात प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला ‘कसे सांभाळले ? मार्गदर्शन केले ?’, त्याविषयी सर्व आठवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाहीर सभेत केलेले मार्गदर्शन !

वर्ष २००२ मध्ये मिरज येथील जाहीर सभेत प.पू. डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन केले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘मी आता जे सांगत आहे, त्याचे बीज तुमच्या अंतर्मनात जाईल. काही जण त्याचा आता लाभ करून घेतील. काही जण १० वर्षांनी, तर काही जण १० जन्मांनी लाभ करून घेतील; पण माझे बोलणे तुमच्या अंतर्मनात गेल्यामुळे तुम्हाला याचा कधी ना कधी लाभ निश्चितच होईल.’’

त्यांच्या या संकल्पामुळेच ज्या व्यक्ती प.पू. डॉक्टरांना भेटतात, प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेले ग्रंथ वाचतात, त्यांचे बीज त्या व्यक्तींच्या अंतर्मनात रूजते. आताही मला जे आठवत आहे, ही प.पू. डॉक्टरांचीच कृपा आहे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘तू हसतमुख आहेस’, ही तुझी साधनेतील पहिली पायरी आहे’, असे सांगणे आणि तिची आनंदाकडे वाटचाल होण्यासाठी सांगितलेले टप्पे 

सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी

वर्ष २००४ मध्ये मिरज आश्रमातील एका सत्संगात प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘रूपाली मिरज आश्रमातील स्वागतकक्षात सेवा करते. ती आश्रमात आलेल्या व्यक्तींचे हसतमुखाने स्वागत करते. ती नेहमी हसतमुख असते. तिला पाहून चांगले वाटते.’’

मी सत्संग संपल्यावर प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेले. त्या वेळी आमच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.

मी : प.पू. डॉक्टर, ‘मी हसतमुख आहे’, असे केवळ तुम्हाला वाटते. प्रत्यक्षात तसे नाही. माझा स्वभाव रागीट आहे. मी पुष्कळ प्रतिक्रियात्मक बोलते. त्यामुळे माझे कुणाशीही पटत नाही. तुमचा आणि माझा विशेष संपर्क नसल्यामुळे तुम्हाला तसे वाटत आहे. (त्या वेळी मला ‘संतांशी कसे बोलावे ?’, हे ठाऊक नव्हते.)

प.पू. डॉक्टर : अगं, तू हसतमुख आहेस, ही तुझी साधनेतील पहिली पायरी आहे. समाजातील लोकांकडे पाहिले आहेस का ? त्यांना किती ताण असतो. त्यांना हसण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. तू तर नेहमी हसत असतेस. साधनेतील पहिली पायरी, म्हणजे हसतमुख रहाणे. दुसरी पायरी, म्हणजे मनात प्रतिक्रिया आल्या, तर त्या व्यक्त न करणे. तिसरी पायरी, म्हणजे मनात प्रतिक्रिया येऊ न देता सर्वांवर प्रेम करणे. चौथी पायरी, म्हणजे आनंद. तू प्रयत्न कर आणि टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जा.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वभावदोष आणि अहं दूर होण्यासाठी प्रयत्न करायला सांगणे

बर्‍याच वर्षांपूर्वी अनेक साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात येत होते. त्या कालावधीत सेवेच्या निमित्ताने माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना काही न विचारता जणू माझ्या मनातील ओळखून ते मला म्हणाले, ‘‘या जन्मात तू ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठशील’, असा विचार करू नकोस. तुझे प्रारब्ध तीव्र आहे. तुला येत असलेली निराशा आध्यात्मिक त्रासामुळे नसून तुझ्यातील स्वभावदोषांमुळे आहे. कु. अनुराधा (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले की, त्यांना असलेली निराशा न्यून होते; कारण त्यांना येणारी निराशा आध्यात्मिक त्रासामुळे आहे. याउलट तू नामजपादी उपाय केलेस, तरीही तुझी निराशा न्यून होत नाही; कारण ती स्वभावदोषांमुळे आहे.

४. वर्ष २०२० मध्ये माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी काही सेकंदच भेट झाली. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘आता तुझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होऊ शकते. तू प्रयत्न कर.’’

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा

त्यानंतर एकदा प.पू. डॉक्टर अकस्मात् मला म्हणाले, ‘‘युद्धकाळ जवळ येण्याच्या आधीच तू चांगली आध्यात्मिक पातळी गाठून पुढे जाशील. ‘युद्धकाळात इतरांना साहाय्य करणे’, ही तुझी साधना असेल.’’

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला  ‘अहं अल्प करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत रहाणे महत्त्वाचे असते’, असे सांगणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुझ्यात अहं न्यून आहे.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘प.पू., फार पूर्वी अहं अधिक असणार्‍या साधकांत माझे नाव होते. माझ्यात तीव्र अहं आहे. माझ्यातील स्वभावदोषांमुळे अनेक वेळा उत्तरदायी साधकांना मला त्याची जाणीव करून द्यावी लागली.’’ त्या वेळी प.पू. म्हणाले, ‘‘त्या वेळी तुला तीव्र त्रास होता. तुझा अहं आणि तुला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीचा अहं अशी वर्गवारी केली नव्हती. आता तुझा त्रासही न्यून झाला आहे. तू इतकी वर्षे आश्रमात आहेस, साधना करत आहेस, म्हणजे तुझ्यात अहं न्यून आहे; मात्र साधना करतांना शेवटपर्यंत अहं अल्प करण्यासाठी प्रयत्न करत रहाणे महत्त्वाचे असते.’’

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेचे समाधान होईपर्यंत तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि साधिकेने अनुभवलेली त्यांची प्रीती

परात्पर गुरु डॉक्टरांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले किंवा एखादे शास्त्र सांगितले, तरीही माझ्या मनाला ते पटत नसे. मी माझ्या मनातील शंका त्यांना विचारत असे. ते प्रत्येक वेळी माझ्या प्रश्नांची उत्तरे देत असत. मी प्रश्न विचारला, म्हणून ‘ते मला रागावले किंवा माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही’, असे कधीच झाले नाही. याउलट ते मला ‘चांगला प्रश्न विचारलास’, असे सांगून प्रोत्साहन देत असत. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘प.पू. माझे चुकते का ? मी तुम्हाला नेहमी काही ना काही विचारत असते.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मीही माझ्या गुरूंना (प.पू. भक्तराज महाराज यांना) प्रश्न विचारत असे.’’

मी त्यांना माझे शंकानिरसन होईपर्यंत विचारत असल्याने मला त्यांनी सांगितलेले चांगल्या प्रकारे आकलन होत असे. ‘माझ्या विचारांची दिशा कशी असायला हवी ? अध्यात्मात कसे असते ? गुरूंची प्रीती कशी असते ?’, हे मला शिकायला मिळाले. ही केवळ प.पू. डॉक्टरांचीच कृपा आहे.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला इतरांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन

मला ‘अनावश्यक आणि मुद्देसूद न बोलणे, गप्पा मारणे’, या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले होते. मला ते पुष्कळच कठीण वाटले. फार पूर्वी प.पू. डॉक्टरांनी मला मार्गदर्शन केले होते. ते पुढे दिले आहे.

८ अ. बोलणे मानसिक स्तरावरचे असते आणि बोलण्याने केवळ सुख मिळते अन् आपल्याला आनंदप्राप्ती करायची आहे !

मी : प.पू. डॉक्टर, मला बोलायला आवडते. न बोलता रहाणे, माझ्यासाठी पुष्कळ कठीण आहे.

प.पू. डॉक्टर : बोलणे मानसिक स्तरावरचे आहे. बोलून केवळ सुख मिळते. आपल्याला आनंदाकडे जायचे आहे. ऋषिमुनी हिमालयात साधना करतात. त्यांच्याशी बोलायला कोण असते ? मी दिवसभर खोलीत एकटाच असतो. माझ्याशी दिवसभर बोलायला कोण असते ?, तरीही मी आनंदी असतो.

८ आ. साधनेत प्रगती झाल्यावर बोलण्याची आवश्यकता नसणे; मात्र साधनेत अडचण आल्यावर उन्नत साधकाशी बोलायला हवे !

मी : तुमची आध्यात्मिक पातळी अधिक आहे. ‘माझी आध्यात्मिक पातळी ५० टक्के असेल का ?’, हेही मला ठाऊक नाही.

प.पू. डॉक्टर : येथे पातळीचा विचार करायला नको, तर कृतीला महत्त्व द्यायला हवे. साधनेत पुढे गेल्यावर बोलायची आवश्यकताच रहात नाही. साधनेत अडचण आल्यावर मात्र अडचण सोडवण्यासाठी चांगल्या साधकाशी बोलायला हवे.

‘प.पू. डॉक्टर, केवळ आपल्या कृपेनेच मला आपल्याशी झालेले बोलणे आठवले. मी कितीही प्रयत्न केले, तरी तुमच्या भेटीची ओढ वाटत रहाते. ‘तुम्हाला स्थुलातून भेटावे’, असे मला वाटते. ‘मला तुम्हाला सूक्ष्मातून अनुभवता येऊ दे. तुम्ही मला सतत तुमच्या चरणांशी ठेवून तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या’, हीच या लेकराची आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.