‘मला भक्तीगीते आणि भजने ऐकण्याची आवड आहे. त्यामुळे सेवा आणि साधना यांतून वेळ मिळाल्यावर मी भक्तीगीते अन् भजने ऐकून आनंद घेत असते. एकदा मला सध्याच्या एका प्रसिद्ध गायकांनी गायलेले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे कुसुमाग्रजांनी लिहिलेले गाणे ऐकायला मिळाले. हे मूळ गाणे पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले आहे. तेही मी ऐकले. या दोन गायकांनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर त्या संदर्भात माझा झालेला तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.
१. सध्याच्या एका प्रसिद्ध गायकांनी गायलेले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे गाणे ऐकल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. गायकाच्या आवाजात गोडवा जाणवत नव्हता.
आ. ते गायक गाणे गातांना पुष्कळ हातवारे करत होते आणि त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव पालटत होते.
इ. गायकाने गाण्याच्या मूळ चालीत पुष्कळ पालट केला होता. तो कृत्रिम वाटत होता.
ई. ‘मी काहीतरी वेगळे गात आहे’, असे ते दाखवत होते. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष गाण्यापेक्षा गायकाकडेच जात होते.
उ. गायकाने पुष्कळ वेळ आलाप (टीप १) घेतला आणि मग गाण्याला प्रारंभ केला. सगळा दिखाऊपणाच वाटत होता.
(टीप १ – आलाप : रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार, म्हणजेच ‘आलाप’ होय. ‘स्वरांचा उच्चार ‘आऽऽऽ’कारात करणे’, म्हणजे ‘आलाप’.)
ऊ. त्या गायकांचे गाणे ऐकतांना माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि ‘माझे मन बहिर्मुख झाले आहे’, असे मला वाटले.
ए. ‘त्यांच्या गाण्यापेक्षा ते तरुण आहेत आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व चांगले आहे; म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात आहेत’, असे मला वाटले. ‘लोकांना हेही कळत नाही’, हे आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
ऐ. मी रात्री साधारण ८ वाजता या गायकाचे गाणे ऐकले. दुसर्या दिवशी सकाळी माझे अंग जड झाले होते. तेव्हा ‘उठून वैयक्तिक आवरणे आणि खोलीची स्वच्छता करणे’, या कृती करण्याचाही मी आळस करत होते. सहसाधिकेच्या साहाय्याने मी त्यातून बाहेर पडले.
२. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’ या गीताचे मूळ गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे गाणे ऐकल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात मला ‘सुमधुरता’ आणि ‘भक्तीचा ओलावा’ जाणवला.
आ. त्यांनीच हे गाणे पहिल्यांदा गायले आहे. ‘ते संगीतशास्त्राच्या नियमांचे पालन करत गात आहेत’, असे मला जाणवले.
इ. त्यांनी गीतातून देवतेला केलेल्या प्रार्थनेतील आर्तता माझ्या लक्षात येत होती.
ई. त्यांचे गाणे ऐकतांना मला भगवान शिवाचे दर्शन झाले.
उ. माझ्या हृदयात मधुर भाव निर्माण झाला.
ऊ. मला गाणे ऐकण्याचा कंटाळा आला नाही.’
– सौ. राजश्री देशमुख, सोलापूर (२२.८.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘संगीताकडे केवळ ‘मनोरंजन’ म्हणून न पहाता ‘ईश्वराची आराधना’ म्हणून अभ्यासाच्या दृष्टीनेही कसे पहावे ?’, याचे दिशादर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करते’, हे साधिकेने केलेल्या वरील अभ्यासावरून आपल्या लक्षात येईल.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे), संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.८.२०२४)