मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी लवकरच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार ! – ज्ञानेश्वर मुळे, अध्यक्ष, अभिजात मराठी पाठपुरावा समिती

श्री. ज्ञानेश्वर मुळे

मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे. हा प्रश्न आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि साहित्य ॲकॅडमी यांच्याकडे प्रलंबित आहे. लवकरच पुन्हा अभिजात भाषेच्या दर्जासाठी लवकरच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार, अशी माहिती अभिजात मराठी पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी आतापर्यंत अभिजात मराठी पाठपुरावा समितीकडून केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची २ वेळा भेट घेण्यात आली असल्याचे या वेळी ज्ञानेश्वर मुळे यांनी म्हटले.

पाठपुरावा करण्यासाठी विमानाने जाण्याची अनुमती !

मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी अभिजात मराठी पाठपुरावा समितीमधील एका सदस्याला दर महिन्याला केंद्रीय सांस्कृतिक कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी देहली येथे जाण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. यासाठी राज्यशासनाकडून प्रवास भत्ता देण्यात येतो; मात्र यापूर्वी प्रवास विमानाने किंवा रेल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्गाच्या डब्यातून अनुज्ञेय नव्हता. १० सप्टेंबर या दिवशी मराठी भाषा विभागाकडून शासन आदेश काढून विमानाचा प्रवास आणि रेल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे.