दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !; ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !…

विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !

मुंबई – विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमीष दाखवून १५ लाखांचे विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुरुकुमार उपेंद्र सहानी आणि मृत्यूजंय विजयकुमार गर्ग अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका : आर्थिक फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?


‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !

मुंबई – सुधारित नियमावलीद्वारे गणेशमूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली आहे. या संदर्भातील नियमावलीची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करणार असल्याचे मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मुंबईतील गणेशोत्सवाचे व्यापक स्वरूप, मोठ्या गणेशमूर्तींचे आकर्षण आणि उत्सवावर अवलंबून असलेला अनेकांचा उदरनिर्वाह या दृष्टीने मंडळ टप्प्याटप्प्याने हा विचार करत आहे.


बलात्कारीत सावत्र पिता आणि काका अटकेत !

वसई – नालासोपारा येथे सावत्र पित्याने १५ वर्षीय मुलीवर मागील ३ महिन्यांपासून बलात्कार केला, तर नालासोपार्‍यात एकाने १७ वर्षीय पुतणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका : वासनांधतेमुळे नातेसंबंध संपुष्टात आल्याचे दर्शवणारी घटना !


दहीहंडी फोडतांना घायाळ झालेल्या गोविंदाचा मृत्यू !

जळगाव – दहीहंडी फोडतांना गंभीर घायाळ झालेल्या नितीन चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी थर लावतांना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारांच्या काळात त्यांचा मृत्य झाला. ते घरातील कर्ता व्यक्ती होते.


अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या तिघांना अटक !

संभाजीनगर – मुंबईतून छत्रपती संभाजीनगर येथे अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्याजवळ २६ पाकिटांमध्ये ११.५१ ग्रॅम एम्डी हा अमली पदार्थ आढळून आला आहे. दानिश मोबीन बागवान, नदीम सुलतान कुरेशी आणि बादल दीपक आहुजी अशी त्या तिघांची नावे आहेत.


सातारा येथे मुलाचा डेंग्यूने मृत्यू !

सातारा, २९ ऑगस्ट (वार्ता.) – येथील कु. शौर्य संदीप खामकर (वय १३ वर्षे) या शाळकरी मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.