इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – शासनाने १३, १४ आणि १५ ऑगस्टला सर्व शासकीय अन् निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा आदेश दिला होता. असे असतांना हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे तलाठी कार्यालयात १३ आणि १४ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले नाही. ही गोष्ट निदर्शनास आल्यावर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य गाव चावडीजवळ पोचले. तेथे पहाणी करून सरपंच स्नेहल कांबळे यांनी तलाठी राहत शेख यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधला असता त्यांनी ‘वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आली नाही, प्रकृती ठीक नाही, गावात पूर आला आहे’, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना तलाठी राहत शेख यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. (असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
या संदर्भात सदरच्या ग्रामपंचायतीने निषेधाचाही फलक लावला होता. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच स्वाती कदम, संदीप कांबळे, संजय जिंदे, अतुल कांबळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता तलाठी राहत शेख यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही, असे कळाले.