कोप्पळ (कर्नाटक) येथील घटना
कोप्पळ (कर्नाटक) – अंगणवाडी मुलांना दिली जाणारी अंडी त्यांच्या ताटातून काढून घेण्याचा प्रकार कोप्पळ जिल्ह्यातील गुंडूरू गावात घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर संबंधित दोघा अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्यात आले आहे.
अंगणवाडीत मुलांना रांगेत बसवून ताटात आधी अंडी ठेवली जातात. त्यानंतर मुलांकडून प्रार्थना करून घेतली जाते. प्रार्थना संपल्यावर मुले ताटातील अंडी खाणार इतक्यात अंगणवाडी सेविका येऊन मुलांच्या ताटातील अंडी उचलून नेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. एका मुलाने हातात घेतलेले अंडेसुद्धा सेविकेने हिसकावून नेले. या वेळी साहाय्यक सेविका शायनाजा बेगम भ्रमणभाषवर व्हिडिओ बनवत होती. हा व्हिडिओ नंतर सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर लक्ष्मी आणि शायनाजा बेगम नावाच्या सेविका यांना निलंबित करण्यात आले आहे.