अमरनाथ यात्रा आणि तीर्थक्षेत्रे यांवर हिंदूंच्‍या नियंत्रणाची आवश्‍यकता !

तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य जपण्‍यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्‍यासह मंदिरे भक्‍त असलेल्‍या हिंदूंच्‍या स्‍वाधीन द्या !

मी नुकतीच अमरनाथ यात्रा करून परतलो. मला यात्रेच्‍या काळात आलेले बरे-वाईट अनुभव शब्‍दबद्ध केले आहेत. या यात्रेच्‍या अनुभवावरून हिंदूंची मंदिरे आणि व्‍यवस्‍था भाविकांच्‍या हातात का असावी ?, याचे महत्त्व पटते. २ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘अमरनाथ यात्रेची पार्श्‍वभूमी, अमरनाथ यात्रेसाठी ‘श्री अमरनाथ श्राईन बोर्डा’ची स्‍थापना, यात्रेमागील पौराणिक कथा आणि अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय सैन्‍याची अभूतपूर्व सुरक्षा व्‍यवस्‍था’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/820540.html

८. यात्रामार्गावरील विविध ठिकाणी मुसलमानांचा वावर

पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्‍काम करावा लागतो. यातील प्रत्‍येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत. प्रत्‍येक ‘बेस कँप’च्‍या ठिकाणी देशातील विविध राज्‍यांतून भंडार्‍यांचे आयोजन केले जाते. त्‍या माध्‍यमातून यात्रेकरूंना चहा-पाणी, नाश्‍ता आणि भोजन पुरवले जाते. भंडार्‍याचे सेवेकरी आग्रहाने यात्रेकरूंना प्रसादासाठी बोलावत असतात. प्रत्‍येक ठिकाणी यात्रेकरूंना रहाण्‍यासाठी तंबूंची सोय केलेली आहे. बहुतेक करून ‘कँप’चे संचालक हे मुसलमान आहेत. श्राईन बोर्डाने प्रत्‍येक कँपमधील तंबूंसाठी रक्‍कम निश्‍चित केली आहे, तरीही मुसलमान ठेकेदार यात्रेकरूंकडून अधिकचे पैसे आकारण्‍याचा प्रयत्न करत असतात.

प्रत्‍येक ‘बेस कँप’वरून गुहेकडे जाण्‍यासाठी घोडेवाले, हमाल आणि पालखीवाले यांचेही दर बोर्डाने निश्‍चित केले आहेत. ही कामे करणारे बहुतेक सगळे मुसलमान समाजातीलच आहेत. तेही ‘बक्षिसी’च्‍या स्‍वरूपात हिंदु यात्रेकरूंकडून अधिकचे पैसे उकळण्‍याचा प्रयत्न करतात.

श्री. अनिकेत विलास शेटे

९. निवासी कँपमधील सुविधांचा अभाव

अ. प्रत्‍येक कँपमध्‍ये पुरेशी शौचालये उभारणे, पाण्‍याची सोय करून ती स्‍वच्‍छ ठवणे, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करणे, प्रत्‍येक तंबूत पुरेसे अंथरूण-पांघरूण, विद्युत् व्‍यवस्‍था यांची सोय करून तंबू स्‍वछ ठेवणे, ही त्‍या कँप संचालकाचे दायित्‍व असते. तंबूंच्‍या स्‍वच्‍छतेकडे फार गंभीरपणे पाहिले जात नाही. एकदा तंबू लावला, उशा आणि पांघरूणे आणून ठेवली की, यात्रा संपेपर्यंत ती तिथेच असतात. प्रतिदिन रात्री येणारे नवीन यात्रेकरू  तीच पांघरूणे आणि उशा वापरतात. यात उशिरा येणार्‍या यात्रेकरूंना तंबूमध्‍ये अस्‍वछता अधिक सहन करावी लागते.

आ. प्रत्‍येक कँपमध्‍ये अनुमाने २५० ते ३५० तंबू असतात. याखेरीज भंडारावाल्‍यांचे तंबू वेगळे. १५० ते २०० शौचालये, १०० ते १२० न्‍हाणीघरे असतात. एवढ्या मोठ्या परिसरात नातेवाइकांपासून दूर गेल्‍याने अनेक यात्रेकरू हरवतात. त्‍यासंदर्भात उद़्‍घोषणा करण्‍यासाठी सर्व कँपमध्‍ये ऐकू जाईल, अशी ध्‍वनीप्रक्षेपण योजना उपलब्‍ध नाही.

इ. यासर्व यात्रेच्‍या मार्गात कुठल्‍याच भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ नाही. त्‍यामुळे प्रत्‍येक कँपमध्‍ये एक सार्वजनिक दूरध्‍वनी असणे आवश्‍यक आहे, तसेच प्रत्‍येक कँपच्‍या प्रवेशद्वाराजळ आणि आतमध्‍ये अत्‍यावश्‍यक सोयी कुठल्‍या दिशेला आहेत, त्‍याचे दिशादर्शक फलक लावणे आवश्‍यक आहे.

ई. यात्रेकरू एखाद्या कँपमध्‍ये येतो, तेव्‍हा तो दमलेला असतो. त्‍याला स्‍वच्‍छता करून भंडार्‍यात जेवायला जाणे आणि सकाळी पुढल्‍या प्रवासासाठी लवकर उठण्‍यासाठी लवकर झोपायचे असते. अशा वेळी शेकडो घोडेवाले, पालखीवाले, हमाल यात्रेकरूंना गाठून किंवा त्‍यांच्‍या तंबूत जाऊन पुढच्‍या प्रवासाठी सेवा हव्‍या आहेत का ? हे विचारून भंडावून सोडतात. कँपचे संचालक आणि ठेकेदार मुसलमान असल्‍यामुळे घोडेवाले, हमाल अन् पालखीवाले यांच्‍या कँपमधील मुक्‍त संचाराला कसलाच धरबंद नाही. वास्‍तविक या लोकांना कँपमध्‍ये येण्‍याची अनुमती देऊ नये. कँपच्‍या बाहेर दुसर्‍या दिवशी सकाळी उभे राहून ते त्‍यांच्‍या सेवा देऊ शकतात.

१०. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य न जपणारे हिंदू !

अ. जम्‍मू येथे भगवतीनगर ‘बेस कँप’मध्‍ये सुरक्षा पडताळणी करतांना गुटखा, मावा आणि सिगारेट आहे का, हे पाहून त्‍या कह्यात घेतल्‍या जातात. काही पुरुष या गोष्‍टी त्‍यांच्‍या समवेत असलेल्‍या महिलांकडे ठेवायला देतात. त्‍यामुळे महिलांचीही कसून तपासणी केली जाते. एकदा भगवतीनगर कँपमधून पहलगाम मार्गाने चंदनवाडीला यात्रा चालू झाली की, पुढे कसलीही पडताळणी होत नाही. त्‍यामुळे मुसलमान तरुण हिंदूंना या गोष्‍टी विकतात. त्‍यामुळे वाटेत ते थुंकतात आणि कचरा करतात. धर्मशिक्षण नसल्‍यामुळे हिंदूंना यात्रेचे महत्त्व आणि पावित्र्य कसे जपावे, याचे भान नाही. याचाच अपलाभ घेऊन मुसलमान समाज त्‍यांचे अर्थकारण पोसत आहे.

आ. संपूर्ण यात्रेत प्‍लास्‍टिकचा अनिर्बंध वापर होतो. त्‍याचा वापर टाळण्‍याविषयी जागोजागी संदेश फलक आहेत; पण ते थांबवण्‍यासाठी काहीही योजना नाहीत. संपूर्ण यात्रामार्गाचे सौंदर्य या फेकलेल्‍या प्‍लास्‍टिकमुळे गेली आहे.

इ. यात्रेकरूंना यात्रा करतांना लहान-मोठे ध्‍वनीक्षेपक समवेत नेण्‍याची अनुमती दिली जाते. तळहातावर मावतील एवढ्या आकारापासून ढोलकीच्‍या आकाराएवढे ध्‍वनीक्षेपक यात्रेकरू समवेत आणतात आणि पूर्ण यात्रामार्गावर त्‍यावर मोठ्याने गाणी लावतात. आपण तीर्थस्‍थळी भेट द्यायला आलो आहे आणि तेथील नैसर्गिक वातावरण बिघडवत आहोत, याचे त्‍यांना भान नसते.

ई. यात्रेच्‍या काळात हिंदूंची यात्रा चांगली व्‍हावी आणि त्‍यांना अल्‍प त्रास होऊन या यात्रेचा आध्‍यात्‍मिक आनंद मिळावा, यासाठी कुठलेही प्रयत्न दिसले नाहीत. याउलट हिंदूंकडून अधिकाधिक पैसे कसे उकळता येतील, यात्रेच्‍या कालावधीत मूलभूत आवश्‍यकता पुरवतांनाही हिंदूंना त्रास कसा होईल, याची अधिक काळजी घेतली जाते.

११. भंडारे आणि सैनिक यांच्‍यामुळे यात्रेकरूंना दिलासा

देशभरातून विविध भंडारे येथे सेवा पुरवतात. ते नसते, तर येथे हिंदूंना किती रुपयांत जेवण घ्‍यावे लागले असते, याचा विचार न केलेला बरा ! भारतीय सैन्‍यामुळे सद्यःस्‍थितीत हिंदू ही यात्रा करू शकत आहेत. वेळप्रसंगी सैनिक हे घोडेवाले, पालखीवाले आणि यात्रेकरू यांच्‍यातील वाद सोडवतात. स्‍थानिक लोकांना सैन्‍याची भीती आहे. त्‍यामुळे त्‍यांना यात्रेकरूंची सरसकट लूट करता येत नाही. यावरून हिंदूंची मंदिरे, यात्रा मार्ग आणि तेथे व्‍यवसाय करण्‍याची अनुमती देणे आदी सर्व हिंदूंच्‍या हातात असणे किती आवश्‍यक आहे, हे जाणवले.

१२. शिवलिंग ६ व्‍या दिवशीच अंतर्धान पावले !

यावर्षी श्राईन बोर्डाकडून प्रतिदिन १० सहस्र यात्रेकरूंना दर्शन घेण्‍याची सुविधा देण्‍यात आली आहे. याउलट प्रतिदिन सरासरी २० सहस्र यात्रेकरूंनी दर्शन घेतले. कोटा पद्धत ठरवली गेली, तरी श्राईन बोर्डाकडून प्रतिदिवसाची यात्रेकरूंची मर्यादा पाळली गेली नाही, असे दिसून येते. अनियंत्रित गर्दीमुळे तेथील निसर्ग, यात्रेकरू आणि मानवनिर्मित स्रोत यांना धोका निर्माण होतो. प्रतिवर्षी गुहेत शिवलिंग किती दिवस असेल, हे गृहीत धरून बोर्डाकडून यात्रेचा काळ निश्‍चित केला जातो. या वर्षी २९ जून ते १९ ऑगस्‍ट अशी यात्रेची समयमर्यादा निश्‍चित केली गेली; पण या वर्षी यात्रा चालू होऊन ६ व्‍या दिवशीच (५ जून या दिवशी) शिवलिंग अंतर्धान पावले. याला ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमान वाढ), यात्रेकरूंची वाढलेली गर्दी, प्रतिदिन २ वेळा आरतीसाठी गुहेत जमणारी गर्दी, सुविधेच्‍या नावाखाली गाडी गुहेपर्यंत नेण्‍यासाठी रस्‍तानिर्मितीचे होत असलेले प्रयत्न आणि त्‍यासाठी गुहेभोवती वाढलेला मनुष्‍याचा वावर, या सगळ्‍याचा एकत्रित परिणाम म्‍हणून या वर्षी शिवलिंग लवकर अंतर्धान पावले, असे कारण असू शकते. यावर वेळीच उपाययोजना न काढल्‍यास अमरनाथ गुहेत शिवलिंग प्रगटणे बंद होऊन सहस्रो वर्षे चालू असलेली ही यात्रा बंद पडेल कि काय ? अशी भीती वाटते. प्रत्‍येक हिंदूने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.’

(समाप्‍त)

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ।