Dawood Shaikh Arrested : यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या करणारा दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक !

दाऊद शेख अटक

उरण (जिल्‍हा रायगड) – येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या करणारा आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक येथून कह्यात घेऊन अटक केली आहे. त्‍याच्‍या समवेत मोहसीन नावाच्‍या आणखी एका तरुणालाही कह्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलिसांची ७ पथके दाऊदच्‍या शोधात होती. यशश्रीची हत्‍या झाल्‍यापासूनच दाऊद शेख पसार होता. तो सतत त्‍याचा ठावठिकाणा पालटत होता.

यशश्री शिंदे हिची हत्‍या होण्‍याआधीचे सीसीटीव्‍हीचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. त्‍यात यशश्री शिंदे हातात काळी छत्री घेऊन जातांना दिसत आहे. तिच्‍या पाठोपाठ अवघ्‍या १० मिनिटांतच दाऊद शेख जातांना दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

यशश्रीची निर्दयीपणे केली हत्‍या !

यशश्री शिंदे हिचा प्राथमिक शवविच्‍छेदन अहवाल समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्‍या या अहवालानुसार तिचा चाकूने वार करून खुन करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होते. दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्‍यावर वार केले. तिच्‍या गुप्‍तांगावर वार करण्‍यात आले, तसेच तिचे स्‍तन कापण्‍यात आले.


एकतर्फी प्रेमातून दाऊदने यशश्रीची हत्‍या केल्‍याची पोलिसांची माहिती !

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्‍या वृत्तात पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार ‘‘दाऊद आणि यशश्री यांच्‍यात आधी प्रेमसंबंध होते; परंतु यशश्री नंतर दुसर्‍या मुलाच्‍या संपर्कात आल्‍याने दाऊदला त्‍याचा राग आला होता. यामुळे त्‍याने तिची हत्‍या केली.’’ गुन्‍हे शाखेच्‍या एका अधिकार्‍याने सांगितले, ‘‘दाऊद शेख २२ जुलै या दिवशी उरणला आला आणि २५ जुलैपासून त्‍याचा फोन बंद झाला.’’ पोलिसांनी सांगितले, ‘‘त्‍याच्‍या सामाजिक माध्‍यमांवरूनही तो निराश असल्‍याचे सिद्ध होत आहे.’’

‘दाऊद शेख हा अनेक दिवस उरण येथे वास्‍तव्‍य करत होता. कोरोना महामारीच्‍या काळात तो कर्नाटकमध्‍ये वास्‍तव्‍य करत होता. तिथे तो चालक म्‍हणून काम करत होता. त्‍याने १-२ ठिकाणी नोकरी पालटली. त्‍याच्‍याविषयीची इतर माहितीही आम्‍ही गोळा करत आहोत’, असेही पोलीस म्‍हणाले.