ऐन पावसात कॅबचालकांकडून अधिक दर आकारणी आणि बुकिंग रहित करण्यामुळे प्रवाशांना मनस्ताप !

पुणे – पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यातच कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांना कॅबचालकांच्या सरचार्ज (अधिक भार), तसेच अधिक दर आकारणीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. काही भागांत येण्यासाठी कॅबचालकांनी नकार दिल्याने प्रवाशांना रिक्शा आणि ‘पी.एम्.पी.’च्या बसवर अवलंबून रहावे लागले.

शहरातील सिंहगड रस्ता, नदीपात्र, धायरी, कल्याणीनगर, डेक्कन आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. शहरात कामानिमित्त येणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेकांनी कॅबचा पर्याय निवडला; मात्र अनेकांना कॅबचे बुकिंगही उपलब्ध होत नव्हते. रिक्शाचालकांनी ५० रुपये, तर कॅबचालकांनी ८० ते १०० रुपयांपर्यंत अधिकचे दर आकारल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसला. काही कॅबचालक प्रवासी येताच उडवाउडवीची उत्तरे देऊन आरक्षण रहित करण्याचा प्रयत्न करत होते. प्रवाशांना आवश्यकता असल्याने त्यांनी ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम दिल्यावर कॅबचालकांनी येण्याचे मान्य केले.

संपादकीय भूमिका

परिस्थितीचा अपलाभ घेत स्वार्थासाठी जनतेला लुटण्याची वृत्ती असणारी जनता देशात असणे संतापजनक ! आताच असे वागत असलेला समाज आपत्काळ आल्यानंतर एकमेकांना काय साहाय्य करणार ?