‘कोचिंग सेंटर्स’ हा एक प्रकारचा मोठा धंदा झाला आहे !

उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची राज्यसभेत कठोर टीका

उपराष्ट्रपती जयदीप धनखड

(‘कोचिंग सेंटर्स’ म्हणजे खासगी शिकवणीवर्ग)

नवी देहली – कुठलेही वर्तमानपत्र उघडल्यावर त्यामध्ये ‘कोचिंग सेंटर्स’ची कित्येक विज्ञापने दिसतात. वर्तमानपत्रांमध्ये पानभर विज्ञापने दिली जातात. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या पानावर भली मोठी विज्ञापने दिसतात. या विज्ञापनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून ? ‘कोचिंग सेंटर्स’ हा एक प्रकारचा मोठा धंदा झाला आहे, अशा शब्दांत राज्यसभेचे सभापती असणारे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी राज्यसभेत टीका केली. देहलीतील ‘राव आय.ए.एस्. कोचिंग सेंटर’च्या तळघरात पावसाचे पाणी साचल्याने ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेवरील चर्चेच्या वेळी त्यांनी ही टीका केली.

राजधानीतील ‘कोचिंग सेंटर्स’ एखाद्या गॅस चेंबरपेक्षा अल्प नाहीत !

सभापती धनखड पुढे म्हणाले की, मी सभागृहातील सर्व सदस्यांकडे आग्रह करतो की, प्रत्येकाने यावर उपाय सुचवावा. भारताला कुशल तरुणांची आवश्यकता आहे; मात्र हे ‘कोचिंग सेंटर्स’वाले लोक तरुणांना एका मर्यादित साच्यात अडकवत आहेत. राजधानीतील ‘कोचिंग सेंटर्स’ एखाद्या गॅस चेंबरपेक्षा अल्प नाहीत.

संपादकीय भूमिका

हे देशातील राज्य सरकारांना आतापर्यंत का लक्षात आले नाही ? त्यांनी अशा ‘कोचिंग सेंटर्स’वर कारवाई का केली नाही ? आताही ते याविषयी काही करणार आहेत का ?