थोडक्यात पण महत्वाचे : शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !…. कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !

शिळफाटा येथे खड्ड्यामुळे अपघात !

कल्याण – शिळफाटा रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. या दुचाकीला भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने गंभीर घायाळ झालेल्या कामोठे येथील सागर मिसाळ याचा मृत्यू झाला. चारचाकी चालकाविरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

तरुणाचा मृत्यू


कांदिवली परिसरात सोनेरी कोल्हा आढळला !

 मुंबई – कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी रंगाच्या कोल्ह्याचे (गोल्डन जॅकेल) दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकारी यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. मागील अनेक वर्षांपासून विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी रंगाचा कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.


पावसाने १५० लोकलगाड्या रहित !

मुंबई – २४ जुलैला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि २५ जुलै या दिवशी १५० लोकलगाड्या रहित करण्यात आल्या. मोटरमनना लोकलगाडीचा वेग न्यून करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकल सेवा मंदावली.


‘स्पा’मध्ये हत्या केलेल्या इसमाच्या हातावर शत्रूंची नावे

मुंबई – वरळीतील एका ५२ वर्षीय इसमाची ‘स्पा’मध्ये भीषण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. तो आपल्या २१ वर्षीय मैत्रिणीसमवेत स्पामध्ये गेला होता. तेव्हा २ लोक आले. त्याच्या मैत्रिणीला दुसर्‍या खोलीत नेले आणि त्या इसमाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्याच्या शरीरावर २२ जणांच्या नावाचे टॅटू होते. ‘हे सर्व त्याचे शत्रू आहेत’, असे त्याचे म्हणणे होते. त्यात स्पा मालक संतोष शेरेकर याचेही नाव होते.


‘महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती’चा मोर्चा

सांगली, २६ जुलै (वार्ता.) – विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने २५ जुलै या दिवशी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.


मुंबईतील शीव पूल १ ऑगस्टपासून बंद !

मुंबई – शीव स्थानकातील ११० वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहतूक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या काळात हा पूल बंद असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआटी), मुंबई यांनी त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाला धोकादायक म्हणून घोषित केले होते. लवकरच पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून शीव ओव्हर ब्रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडून एल्.बी.एस्. मार्ग किंवा संत रोहिदास रस्त्याकडून वाहने वळवली जातील.