हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी !
सांगली, २३ जुलै (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी, तसेच शिवप्रेमी आणि निरपराध हिंदूंवरील अन्याय्य गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन २३ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित कोडग, रोहित पाटील, नितीन राक्षे, भगवान चव्हाण आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी सौ. खरात यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, १४ जुलै या दिवशी शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक झाल्यावर प्रशासनाने १५ जुलै या दिवशी अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. पोलिसांकडून शिवप्रेमी आणि निरपराध हिंदूंवर तत्परतेने गुन्हे नोंद करून कारवाई केली जात आहे; मात्र अतिक्रमण होण्यास आणि ती वेळेत न काढण्यास जे उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर त्याच न्यायाने कायदेशीर कारवाई का केली जात नाही ? शिवप्रेमींच्या उद्रेकाला पूर्णतः प्रशासन उत्तरदायी आहे. ही घटना प्रशासनाच्या बोटचेप्या आणि अन्यायकारक भूमिकेमुळेच घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निरपराध हिंदूंना तात्काळ मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.