कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील ‘म्‍यानमार केमिकल’ आस्‍थापनातून विषारी वायूगळतीने २ महिलांचा मृत्‍यू !

अनेक नागरिक घायाळ, ९ जणांची प्रकृती चिंताजनक !

सांगली, २२ नोव्‍हेंबर (वार्ता.) – जिल्‍ह्यातील कडेगाव तालुक्‍यातील शाळगाव बोंबाळेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील (एम्.आय.डी.सी.) म्‍यानमार केमिकल आस्‍थापनातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायूगळती झाल्‍याने २ महिलांचा मृत्‍यू झाला असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्‍या १० जणांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे. ९ नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाने घटनास्‍थळी तात्‍काळ धाव घेत वायूगळती थांबवली आहे.

१. बोंबाळेवाडी औद्योगिक वसाहतीमध्‍ये म्‍यानमार हे रासायनिक खते सिद्ध करणारे आस्‍थापन आहे. २१ नोव्‍हेंबरच्‍या सायंकाळी गळतीमुळे विषारी वायू औद्योगिक वसाहतीचा परिसर आणि शेजारच्‍या वस्‍तीवर पसरला.

२. कामगारांना श्‍वास घेतांना अडचण, डोळ्‍यांत जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागला. गळतीमुळे आस्‍थापतील कर्मचार्‍यांसमवेतच परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला. परिसरातील लोकांत घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन धावू लागले.

३. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पृथ्‍वीराज देशमुख, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी घटनास्‍थळाची पहाणी केली.

४. त्‍यानंतर संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्‍यात आल्‍या. गळती झालेला वायू कोणता होता ? याविषयी माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात तज्ञांच्‍या साहाय्‍याने अन्‍वेषण चालू करण्‍यात आले आहे.

५. वायूगळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरांतील नागरिकांना त्रास झाल्‍याचे समजते. नागरिकांनी दक्षतेचा उपाय म्‍हणून ‘मास्‍क’चा वापर केला.