नेहमी इतर देशांवर सत्ता गाजवून त्यांना कायम मुठीत ठेवणार्या अमेरिकेत १३ जुलै या दिवशी निवडणूक फेरीच्या वेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ट्रम्प हे किरकोळ घायाळ झाले आहेत. ट्रम्प यांच्या फेरीवर गोळीबार करणारा संशयित आरोपी २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रूक्स याला सिक्रेट सर्व्हिस स्नायपर्सनी जागीच ठार केले. थॉमसने हे आक्रमण का केले ? याचे उत्तर सुरक्षायंत्रणांना मिळालेले नाही. थॉमसने ए.आर्.१५ सेमी-ऑटोमॅटिक रायफलमधून हे आक्रमण केले. तथापि ट्रम्प यांच्यावरील या आक्रमणाने आधीच विभागलेले अमेरिकेतील जनमत चिघळले आहे. देशातील विभाजित राजकीय वातावरण अधिक चिघळत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील बंदूक संस्कृती आणि वाढत्या राजकीय कटुतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे, तसेच या आक्रमणाने पुन्हा एकदा अमेरिकेच्या बंदूक संस्कृतीविषयी चिंता निर्माण केली आहे. ट्रम्प यांच्यावरील आक्रमणाचे गांभीर्य पुष्कळ वाढते. याचा ‘अमेरिकेतील सर्वसामान्यांच्या विचारसरणीवर, तेथील राजकारणावर आणि निवडणुकांवर काय परिणाम होतो ?’, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अमेरिकेची राज्यघटना जितकी जुनी आहे, तितकाच त्या देशातील बंदूक संस्कृतीचा इतिहास जुना आहे. वर्ष १७९१ मध्ये अमेरिकेच्या घटनेत दुसरी घटनादुरुस्ती करून अमेरिकेतील नागरिकांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. भारतात बंदूक बाळगण्यासाठी सरकारकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. अमेरिकेत असा कोणताही परवाना घेण्याची आवश्यकता नाही. भारतात विनापरवाना बंदूक बाळगणे गंभीर गुन्हा समजला जातो.
राष्ट्राध्यक्षांवरील आक्रमणांचा इतिहास !
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांवर आक्रमणे होण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. तेथे अशा आक्रमणांचा मोठा इतिहास आहे. आतापर्यंत अशा आक्रमणांमध्ये ४ राष्ट्रपती आणि एक अध्यक्षपदाचा उमेदवार यांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या ४-५ दशकांविषयी बोलायचे झाले, तर रोनाल्ड रिगन, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांसारखे प्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष आक्रमणाचे लक्ष्य बनले आहेत. जनमत २ गटांमध्ये विभागले गेले, तरीही ट्रम्पवरील या आक्रमणाची तुलना मागील घटनांशी होऊ शकत नाही. अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीचे निकाल उलथवण्यासाठी दंगली भडकावणे किंवा निवडणूक निकाल स्वीकारण्यास सतत नकार देणे, यासारख्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. असे असूनही ट्रम्प लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे दिसते.
अमेरिकेतील एक तृतीयांश लोकांकडे बंदूक !
अमेरिकेत बंदूक किंवा रायफल बाळगणे सामान्य गोष्ट झाली आहे. या बंदुका अगदी लहान मुलांच्या हातांपर्यंतही पोचतात. मोठ्यांपासून लहानांपर्यंत अनेकांनी बंदुकांचा वापर करून केलेल्या हिंसाचाराच्या घटना तिथे वारंवार घडत असतात. मुख्य म्हणजे या बंदूक संस्कृतीला चाप लावावा, अशी मागणी काही जणांकडून होत असली, तरी ती दडपून टाकणारी यंत्रणाही प्रबळ आहे. ‘प्यू रिसर्चच्या डेटा’वरून असे दिसून आले आहे की, अनुमाने एक तृतीयांश अमेरिकी लोक म्हणतात की, त्यांच्याकडे बंदूक आहे. ही आकडेवारी अमेरिकेत बंदूक विकृती किती खोलवर रुजली आहे, याचा पुरावा आहे. ‘यू.एस्.ए. टुडे’च्या मते आणखी एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, वर्ष २०२४ च्या पहिल्या ४ मासांत देशात अनुमाने ५५ लाख शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात आली. देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले टेक्सास राज्य यामध्ये आघाडीवर आहे. बंदुकीशी संबंधित आत्महत्या २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्यात तरुणांच्या मृत्यूत ‘धक्कादायक वाढ’ झाली आहे. वर्ष २०१९ च्या अहवालानुसार संपूर्ण अमेरिकेचा विचार केला, तर देशभरात ६३ सहस्र बंदूक/शस्त्र विक्रेते आहेत. त्यांनी वर्ष २०१९ मध्ये तब्बल ८० सहस्र कोटी रुपयांच्या शस्त्रांची विक्री केली होती. ही रक्कम भारताच्या अर्थसंकल्पातील आरोग्यासाठीच्या प्रावधानाहून कितीतरी अधिक आहे.
शस्त्राच्या वापराद्वारे ४४ टक्के आत्महत्या !
अमेरिका सोडून जगभरात बंदुकीची मालकी असणार्या नागरिकांची संख्या ३९ कोटी ३० लाख आहे. जगातील शस्त्र बाळगणार्या नागरिकांचा विचार केला, तर त्यापैकी ४६ टक्के नागरिक हे अमेरिकी आहेत. वर्ष २०१९ मध्ये अमेरिकेतील १ लाख लोकसंख्येमागे ४ जण बंदुकीद्वारे झालेल्या हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. अमेरिकेत होणार्या आत्महत्यांपैकी ४४ टक्के आत्महत्या या शस्त्रांचा वापर करून होतात. अनुमाने ४४ टक्के अमेरिकी नागरिकांच्या घरात बंदूक असते.
हॉलिवूड चित्रपटांमुळे तरुण पिढीवर विकृत परिणाम !
अमेरिकेत प्रतिदिन सरासरी ३२१ जणांवर पिस्तूल आणि बंदूक यांनी आक्रमण केले जाते. त्यांपैकी १११ जण आक्रमणात मरण पावतात, २१० जण आक्रमणातून वाचतात, ९५ जणांवर कुणीतरी हेतूतः आक्रमण करतो आणि ते वाचतात, ४२ जणांची हत्या करण्यात येते. ६५ जण पिस्तुलाचा वापर करून आत्महत्या करतात. प्रतिदिन एकाचा कोणताही हेतू आणि कारण नसतांना बंदुकीच्या आक्रमणात मृत्यू होतो. विनाकारण आक्रमणे झालेल्यांपैकी ९० जण अशा आक्रमणांतून वाचतात. कायदेशीर हस्तक्षेपातील गोळीबारातून ४ जण वाचतात, तर एकाचा मृत्यू होतो. बंदुकीच्या आक्रमणातून प्रतिदिन सरासरी १२ जण वाचतात; पण त्यांच्यावरील आक्रमणाचे कारण समजत नाही.
अमेरिकेत बंदूक विकृती पुष्कळ फोफावली आहे. ‘हॉलिवूड’च्या चित्रपटांतून आणि ‘व्हिडिओ गेम्स’मधून सर्रास बंदुकींचा वापर करून हिंसाचार केल्याचे दाखवले जाते. बंदुकीच्या हिंसाचाराचा अमेरिकी समाजावर आणि बळींच्या कुटुंबियांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. दुर्दैवाने या हिंसाचारात अनेक निष्पाप जिवांचेही बळी जातात. तरीही गोळीबाराचे प्रकार अल्प होत नाहीत. समुहावर अंदाधुंद गोळीबार करण्याच्या घटना प्रतिवर्षी वाढत आहेत. वर्ष २०२० मध्ये अशा ६१० घटना घडल्या, तर वर्ष २०२१ मध्ये ही संख्या ६९२ वर पोचली. यामागील गांभीर्य लक्षात घेऊन असाल्ट रायफलवर बंदी घालणारे विधेयक अमेरिकेच्या काँग्रेसमधील (संसद) लोक प्रतिनिधीगृहाने संमत केले.
अमेरिकेतील बंदूक विकृतीमुळे होत असलेल्या मानवी हत्या आणि पसरलेला हिंसाचार यांविषयी जागतिक मानवाधिकार संघटना गप्प का ? |