वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस – सत्र : अधिवक्‍त्‍यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष

जनहित याचिकेच्‍या माध्‍यातून आपण समाज आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे पुष्‍कळ मोठे कार्य करू शकतो ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष

विद्याधिराज सभागृह – दसरा, दिवाळी, गणेशोत्‍सव इत्‍यादी उत्‍सवांमध्‍ये अनेके गैरप्रकार आढळून येतात. या कार्यक्रमांमध्‍ये ‘डिजे सिस्‍टम’ (मोठी ध्‍वनीक्षेपक यंत्रणा) आणि ‘एल्‌ईडी लाईट्‍स’ (प्रकाशयोजना) यांचा सर्‍हास वापर केला जातो. गेल्‍या १० ते १२  वर्षांपासून ‘डिजे सिस्‍टम’ आणि ‘एल्‌ईडी लाईट्‍स’ यांमध्‍ये अतिशय वाढ झाली आहे. याचा दुष्‍परिणाम वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला आणि रुग्‍ण यांना भोगावा लागतो. अनेक जण हृदयविकाराचा झटका येऊन मृत्‍यूमुखी पडले आहेत. ‘एल्‌ईडी लाईट्‍स’मुळे अनेकांना डोळ्‍यांची समस्‍या निर्माण झाली आहे. या सर्व गैरप्रकारांच्‍या विरोधात आणि ध्‍वनीप्रदूषणाच्‍या विरोधात आम्‍ही न्‍यायालयात जनहित याचिका प्रविष्‍ट केल्‍या. त्‍याची नोंद घेऊन न्‍यायालयाने हे गैरप्रकार रोखण्‍याचे आदेश प्रशासनाला दिले. त्‍यामुळे समाज आणि धर्म यांची होणारी हानी रोखण्‍यात आपण यशस्‍वी ठरलो. ‘ऑपरेशन डिजे’च्‍या शिर्षकाखाली आम्‍ही ही मोहीम राबवली. जनहित याचिकेच्‍या माध्‍यातून आपण समाज आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे पुष्‍कळ मोठे कार्य करू शकतो. गुरूंचा आशीर्वाद असल्‍याने हे कार्य यशस्‍वी होत आहे. समाज आणि राष्‍ट्र यांच्‍या हिताचे हे कार्य आपण निर्भिडपणे केले पाहिजे. यासाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श आपल्‍या समोर ठेवला पाहिजे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे अधिवक्‍त्‍यांचेही मुकुटमणी आहेत, असे उद़्‍गार हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष अधिवक्‍ता अमृतेश एन.पी. यांनी येथे बोलतांना काढले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या सहाव्‍या दिवशी ‘जनहित याचिकांच्‍या माध्‍यमातून समाज आणि राष्‍ट्र यांच्‍या रक्षणाचे कार्य कसे करायचे ?’, या विषयावर ते बोलत होते.

अधिवक्‍ता अमृतेश पुढे म्‍हणाले की, जनहित याचिकेच्‍या माध्‍यमातून बेंगळुरू आणि मुंबई यांसारख्‍या मोठ्या शहरांत रस्‍त्‍यांच्‍या बाजूला लावलेले ‘एल्‌ईडी होर्डिंग’ यांच्‍या विरोधातही आम्‍ही न्‍यायालयीन लढा चालू केला आहे. गुरूंच्‍या आशीर्वादाने  समाज आणि धर्म यांसाठी कार्य करण्‍याची प्रेरणा मिळत आहे.


स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर, संपादिका, मानुषी, देहली

प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर

विद्याधिराज सभागृह – कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्‍ता याचा अपलाभ उठवून निष्‍पाप हिंदूंना फसवण्‍याचे काम करत आहेत. स्‍त्रीवादी स्‍वयंसेवी संघटनांनी समाजसेवेचे मुखवटे घालून आपल्‍याला हवे तसे कायदे संमत करून घेतले. प्रसारमाध्‍यमे, न्‍यायव्‍यवस्‍था, नोकरशाही हे सर्व या स्‍त्रीवादी म्‍हणवणार्‍यांच्‍या हातचे बाहुले झाले आहेत. या स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरण, गरिबांना शिक्षण, अनुसूचित जाती/जमातींना न्‍याय यांच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली, असे उद़्‍गार देहली येथील ‘मानुषी’ नियतकालिकाच्‍या संपादिका प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर यांनी बोलतांना काढले. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या सहाव्‍या दिवशी ‘स्‍त्रीवाद्यांद्वारे कायद्यांचा वापर करून हिंदु समाज तोडण्‍याचा प्रयत्न’ या विषयावर त्‍या बोलत होत्‍या.

प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर पुढे म्‍हणाल्‍या की, या स्‍त्रीवाद्यांनी खोटे आरोप करून हिंदूंना अपकीर्त करण्‍याचे षड्‌यंत्र रचले. या लोकांनी खोटी कथानके रचून जम्‍मूतील हिंदूंवर मोठे आघात केले. त्‍यांना तोंड उघडणे कठीण करून टाकले. त्‍यांनी हिंदूंमध्‍ये अपराधीपणाची भावना वाढीस लावली. मुसलमान लोक बुरहान वानी, दाऊद इब्राहिम यांसारख्‍या आतंकवाद्यांच्‍या समर्थनार्थ रस्‍त्‍यावर उतरले. याच्‍या उलट हिंदु समाज  बलात्‍काराच्‍या आरोपातून निर्दोष सुटका झाल्‍यानंतरही हिंदु संतांच्‍या समर्थनार्थ पुढे सरसावले नाहीत.

हिंदु समाजामध्‍ये महिलांवर अत्‍याचार होत असल्‍याची खोटी कथानके बनवून हिंदु धर्माला अपकीर्त केले गेले आणि हा अन्‍याय दूर करण्‍याच्‍या नावाखाली न्‍यायालयांकडून कायदे संमत करून घेतले गेले. हे कायदे पाश्‍चात्त्य देशांमध्‍ये आवश्‍यक होते; कारण तेथे चेटकीण आदी प्रकार अस्‍तित्‍वात होते. भारतीय संस्‍कृतीत स्‍त्रीशक्‍तीला दैवीशक्‍ती संबोधण्‍यात आले आहे, असे प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर यांनी सांगितले.


भारतासाठी क्रिकेट धर्म असला, तरी पाकिस्‍तानसाठी तो ‘क्रिकेट जिहादच आहे ! – अधिवक्‍ता विनीत जिंदाल, उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता विनीत जिंदाल

विद्याधिराज सभागृह : भारतात क्रिकेट एक खेळ म्‍हणून खेळला जातो; पण पाकिस्‍तान-भारत सामना हा पाकिस्‍तान्‍यांसाठी युद्धासारखा असतो. पाकिस्‍तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्‍हटले होते, ‘भारतासाठी क्रिकेट खेळ असेल; पण आमच्‍यासाठी तो जिहाद आहे.’ यावरून जगात ‘क्रिकेट जिहाद’ अस्‍तित्‍वात आहे, असे वक्‍तव्‍य उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विनीत जिंदाल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या सहाव्‍या दिवशी ‘क्रिकेट जिहादच्‍या विरोधात केलेले न्‍यायालयीन कार्य’, या विषयावर बोलतांना केले.

‘क्रिकेट जिहाद’ अधिक स्‍पष्‍ट करतांना अधिवक्‍ता विनीत जिंदाल म्‍हणाले, ‘‘वर्ष १९७८ मध्‍ये भारत-पाकिस्‍तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्‍ही हिंदूंना हरवले’, असे म्‍हटले होते. नुकतेच पाकिस्‍तानच्‍या एका फलंदाजाने त्‍याचे शतक पॅलेस्‍टाईनला समर्पित केले होते. तसेच पूर्वी वेस्‍ट इंडिजचे लोकप्रिय फलंदाज ब्रायन लारा यांना पाकिस्‍तानच्‍या खेळाडूने इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास सांगितले होते. अशा प्रकारे पाकिस्‍तानकडून सतत क्रिकेट जिहादला प्रोत्‍साहन दिले जात आहे. क्रिकेटचे इतके व्‍यवहारीकरण झाले आहे की, या जिहादकडे जागतिक क्रिकेट संघटना पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. हा जिहाद थांबवण्‍यासाठी मी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ आणि जागतिक क्रिकेट संघटना यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला आहे.’’

वर्ष २०२३ मध्‍ये विश्‍वचषकाच्‍या सामन्‍यासाठी पाकिस्‍तानी सूत्रसंचालिका झैनब अब्‍बास भारतात आली होती. त्‍या वेळी तिने हिंदूंच्‍या देवता आणि सचिन तेंडुलकर यांच्‍या विरोधात अवमानजनक टिपणी केली होती. त्‍याविरोधात मी देहलीमध्‍ये सायबर तक्रार नोंदवली. त्‍यानंतर झैनब घाबरून दुबईला पळाली. त्‍या वेळी एका क्रिकेट खेळाडूने मैदानात नमाज पठण केले होते. जोडे घालून नमाजपठण करणे इस्‍लामविरोधी असतांनाही त्‍याकडे त्‍यांच्‍या लोकांनी दुर्लक्ष केले. यावरून मैदानात नमाजपठण करण्‍यामागे इस्‍लामचा प्रचार करणे, हे कारण आहे, असे अधिवक्‍ता विनीत जिंदाल म्‍हणाले.


सरकारी भूमीवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

अधिवक्‍ता खुश खंडेलवाल

विद्याधिराज सभागृह – सर्व जिहादमधील सर्वांत धोकादायक ‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) आहे, तसेच या जिहादशी सर्व जिहाद संबंधित आहेत. याअंतर्गत ते अधिकांश सरकारी भूमी कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करतात. तेथे प्रारंभी एक मजार (मुसलमानाचे थडगे) बांधतात. त्‍यानंतर तेथे दर्गा (थडग्‍याच्‍या ठिकाणी केलेले बांधकाम) बांधतात आणि हळुहळू त्‍याचे रूपांतर एका भव्‍य मशिदीत होते. कालांतराने तेथे पर्यटनाच्‍या नावाने अनेक धर्मांध येतात. त्‍यांना तेथे वसवले जाते. असे करत करत तेथील ५ किलोमीटचे क्षेत्र मुसलमानबहुल बनते. त्‍यानंतर तेथील अतिक्रमण थांबवणे कठीण होते. त्‍यामुळे ते प्रारंभीच थांबवणे आवश्‍यक आहे, असे वक्‍तव्‍य ‘हिंदु टास्‍क फोर्स’चे संस्‍थापक अधिवक्‍ता खुश खंडेलवाल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या सहाव्‍या दिवशी केले. ते सरकारी भूमीवर बांधण्‍यात आलेल्‍या दर्ग्‍यांच्‍या विरोधात दिलेला न्‍यायालयीन लढा’ या विषयावर बोलत होते.

अधिवक्‍ता खंडेलवाल म्‍हणाले, ‘‘मुंबईला लागून असलेल्‍या भाईंदर भागातील उत्तन डोंगरी येथे बालेशाह पीर दर्गा सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्‍यात आला. या दर्ग्‍याच्‍या विरोधात तक्रार केली. त्‍यानंतर तहसीलदाराने केलेल्‍या सर्वेक्षणाच्‍या आधारे विश्‍वस्‍ताच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. हा विषय महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेतही गाजला. या दर्ग्‍याविषयी सर्कल अधिकार्‍याने खोटा अहवाल बनवून हा दर्गा वर्ष १९९५ मध्‍ये बांधला असल्‍याचे दाखवले. मी हा भ्रष्‍टाचार प्रसारमाध्‍यमांच्‍या माध्‍यमातून उघड केला. यासंदर्भात उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली. न्‍यायालयाने सांगितल्‍यानुसार राज्‍य सरकार, जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्‍यानंतर तेथील दुकानदारांनी दर्ग्‍याला लागून असलेली अतिक्रमित दुकाने स्‍वत:हून काढली. यापुढे जाऊन आपल्‍याला ही भूमी अतिक्रमणमुक्‍त करायची आहे. मला खात्री आहे की, यासंदर्भात लवकरच न्‍यायालयाकडून निर्णय होईल. ’’

क्षणचित्र :

या प्रकरणाविषयी बोलतांना अधिवक्‍ता खुश खंडेलवाल यांनी अनुभव सांगितला. या प्रकरणातील सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्‍हाला पैसे घेऊन भ्रष्‍टाचार करण्‍याचा दबाव होता; पण आम्‍ही अधिवक्‍ता खंडेलवाल यांच्‍याकडे पाहून पैसे नाकारले.

भगवान श्रीकृष्‍णाचे कार्य समजून धर्मकार्य करावे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

काही जण मला ‘हे कार्य करतांना भीती वाटत नाही का?’, असे विचारतात. तेव्‍हा मला वाटते, ‘हे भगवान श्रीकृष्‍णाचे कार्य आहे. ते त्‍याच्‍याच इच्‍छेने पूर्ण होणार आहे. त्‍यामुळे हे कार्य थांबवण्‍याची शक्‍ती कुणामध्‍येही नाही.’ सनातन धर्मात जन्‍म घेणे, हे आपले सौभाग्‍य आहे. या सनातन धर्माचे ऋण धर्मरक्षण केल्‍यानेच आपण फेडू शकतो. आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्‍णाला केंद्रस्‍थानी ठेवून कार्य केले, तर आपला विजय निश्‍चित आहे.