जेथे धर्म आहे तेथे विजय आहे ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, सहसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता
रामनाथी (गोवा) – बंगालमधील संत पंडित उपेंद्र मोहन यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. विवाहानंतर पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी चंडीपाठ केला. ‘जे चंडीपाठ करतील त्यांची सर्व प्रकारची दु:खे मी दूर करते’, असे चंडीपाठामध्ये देवीने म्हटले आहे. त्याची प्रचीती घेण्यासाठी त्यांनी चंडीपाठ चालू ठेवला. एका वर्षानंतर त्यांना त्याविषयी अनुभूती आली. त्यांची अडलेली बरीच कामे झाली. त्यांनी चंडीपाठाचे पठण अखंड चालू ठेवले.
अडीच वर्षांनंतर प्रत्यक्ष भगवान त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना म्हणाले,
‘‘माझ्यासोबत चल, मी तुम्हाला न्यायला आलो आहे.’’ त्यांनी देवासोबत जाण्यास नकार दर्शवला. ते देवाला म्हणाले ‘तुम्ही एवढे दयाळू आहात, हे इतरांना सांगितल्याविना मी तुमच्यासोबत येणार नाही. जग देवाला विसरले आहे. त्याविषयी देवाच्या मनात वेदना आहेत. देवाच्या या वेदना दूर केल्याविना मी येणार नाही.’’ पंडित उपेंद्र मोहनजी यांच्या जीवनातील हा प्रसंग कोलकाता, बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे सहसचिव पू. डॉ. शिबनारायण सेन यांनी येथे बोलतांना सांगितला. ‘पंडित उपेंद्र मोहनजी यांचे हिंदु राष्ट्रासंबंधी विचार’ या विषयावर बोलतांना त्यांनी पंडितजींचा जीवनपट उघड केला. ‘धर्म आहे तेथे विजय आहे’, यावर त्यांची श्रद्धा होती, असे पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी सांगितले.
पू. डॉ. सेन म्हणाले की,
पंडित उपेंद्र मोहनजी म्हणायचे ५०० वर्षे मुसलमानांनी भारताला लुटले, मंदिरे तोडली; मात्र हिंदूंचा विश्वास ते तोडू शकले नाहीत. आक्रमकांनी भारताला मोठ्या प्रमाणात लुटले, तरी त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती जगात भक्कम होती. ब्रिटिशांनी वर्ष १९३६ मध्ये देशात संस्कृत शिकवण्यास बंदी घातली. पंडित उपेंद्र मोहनजी यांनी त्याला विरोध करतांना ‘संस्कृतद्रोह हे पाप आहे’, असे ब्रिटीशांना सुनावले. पंडित उपेंद्र मोहनजी जिल्हाधिकारी बनले. या सरकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि नीतीमूल्ये जपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचे त्यागपत्र दिले. जर्मनीने केलेल्या जनसंहाराचा त्यांनी निषेध केला. जर्मनी आणि जपान यांनी केलेल्या अधर्माचे फळ त्यांना भोगावे लागेल, असे ते म्हणाले होते आणि पुढे तसेच घडले, असे पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी शेवटी सांगितले.