धर्मप्रसारासाठी अधिकाधिक संत निर्माण होणे आवश्यक ! – बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा चौथा दिवस (२७ जून) : ग्रामीण क्षेत्रांमध्ये धर्माविषयी जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न

श्री. बाल सुब्रह्मण्यम्

विद्याधिराज सभागृह – पूर्वी मंदिरांतून हिंदूंना संस्कार मिळत होते. आता सरकारी धोरणांमुळे ते बंद झाले आहे. त्यामुळे हे संस्कार आश्रमात मिळू शकतात. आश्रमात असलेल्या संत-महात्म्यांमुळे लोकांच्या धार्मिक प्रश्नांना उत्तरे मिळतात, तसेच गावामध्ये संत किंवा महात्मा आल्यामुळे वातावरणात चांगला पालट होतो. त्यामुळे समाजात धर्मप्रसार होण्यासाठी अधिकाधिक संत निर्माण झाले पाहिजेत. त्यामुळे हिंदु संस्कार जिवंत रहातील, असे प्रतिपादन ‘मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट’चे संचालक श्री. बाल सुब्रह्मण्यम् यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी केले.

श्री. बाल सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘वेद, पुराणे, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांमध्ये एकही शब्दाचा पालट न होता ते आपल्यापर्यंत पोचले आहेत. हे केवळ गुरु-शिष्य परंपरेमुळे झाले. त्यामुळे आपण गुरु-शिष्य परंपरेचा आदर केला पाहिजे. हे अनमोल ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे आपले दायित्व आहे. आपल्या धर्मातील ज्ञान ही आपली संस्कृती आहे. इंग्रजाचे शासन येण्यापूर्वी भारतात लक्षावधी गुरुकुल होते. त्यामुळे समाजाला धर्मशिक्षण आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण मिळत होते. आज लोकांना धर्मशिक्षण मिळत नाही; म्हणून धर्मांतर होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘मुले शाळांमध्ये जात नसतील, तर शाळा त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत’, हे लक्षात घेऊन आम्ही ‘वनवासी लोकांना शिक्षण मिळावे’, यासाठी गावांमध्ये ‘एकल विद्यालये’ चालू केली. त्या माध्यमातून नैसर्गिक वातावरणात गावातील मुलांना मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते. अशा प्रकारे देशभरात ७० सहस्र एकल शाळा चालू आहेत.’’