गोव्यात शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समाविष्ट करा !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मागणी

(इन्क्विझिशन म्हणजे धर्मच्छळ)

फोंडा (गोवा), २२ जून (वार्ता.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नालंदा येथे प्राचीन विश्‍वविद्यालयाच्या जवळ नवीन ‘कॅम्पस’चे उद्घाटन केले. ज्याप्रमाणे प्राचीन विश्‍वविद्यालयाचे एकप्रकारे पुनरुत्थान चालू आहे, त्याप्रमाणेच उत्तरप्रदेशातील विद्यमान योगी आदित्यनाथ सरकारने श्रीराममंदिराचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. तेथे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक विषयही मुलांना शिकवले जाणार आहेत. अशा प्रकारे उत्तरप्रदेशातील योगी सरकार निर्णय घेऊ शकते, तर गोव्यातील भव्य आणि प्राचीन मंदिरांचा इतिहास, पोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा विध्वंस, ‘इन्क्विझिशन’द्वारे झालेले अत्याचार, गोमंतकियांनी मंदिरे आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेला लढा, हा इतिहास का शिकवला जाऊ शकत नाही ?

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सत्यविजय नाईक, श्री. सुनील घनवट आणि अधिवक्ता शैलेंद्र नाईक

गोमंतकाचा सत्य इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जावा, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. या दृष्टीने गोव्यात २४ ते ३० जून या कालावधीत होणार्‍या १२ व्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. (बिदार) फोंडा येथील हॉटेल ‘पॅन अरोमा’ येथे २२ जून या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक आणि अधिवक्ता शैलेंद्र नाईक हे उपस्थित होते.

(क्लिक करा – ↑)

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त हिंदुत्वासंबंधी सर्वच विषयांवर होणार मंथन !

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील पहिले तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी असतील आणि यामध्ये हिंदुत्वावर होणारे आघात, उदा. सनातन धर्मावर होणारे आघात, गोरक्षण, लव्ह जिहाद, बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोर यांची समस्या यांवर चर्चा करून यासंबंधी पुढील दिशा ठरवली जाणार आहे. हिंदुत्वाच्या चळवळीला वैचारिक दिशा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील विद्वान मंडळींचे मार्गदर्शन या सत्राद्वारे हिंदूंना लाभेल. हिंदुत्वाच्या कार्यामध्ये मंदिरे ही ऊर्जा देणारी स्थाने आहेत. यासाठी यानंतर महोत्सवात पुढील दोन दिवस मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन करून मंदिर रक्षा मोहिमेवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिर परिसरात प्रवेश करतांना वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करणे, मंदिर परिसरात मद्यमांस खाण्यावर बंदी घालणे, महोत्सवाच्या दिवशी मंदिर परिसरात अहिंदूंना प्रवेशबंदी करणे आदी सूत्रांवर विचारमंथन होऊन पुढील दिशा ठरवली जाईल. यानंतर महोत्सवात शेवटचे दोन दिवस ‘अधिवक्ता अधिवेशन’ असणार आहे. यामध्ये हिंदुत्वाच्या कार्यामध्ये अधिवक्त्यांचे माहिती अधिकाराखाली अर्ज करणे, एखाद्या विषयावर याचिका प्रविष्ट करणे आदी विषयांवर सहकार्य घेण्यावर चर्चा करण्यात येईल.’’

या वेळी समितीचे श्री. सत्यविजय नाईक म्हणाले की, यंदा गोव्यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी श्रीदत्त पद्मनाभ पीठाधीश्‍वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्य संचालक श्री. राजन भोबे यांनाही महोत्सवाला निमंत्रण देण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना अधिवक्ता शैलेंद्र नाईक म्हणाले की, २९ आणि ३० जून या दिवशी ‘अधिवक्ता संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदु संघटना, तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात न्यायालयीन साहाय्य करणारे, विविध आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे देशभरातील अधिवक्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत. यातून कार्याची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

पत्रकार : ‘ऑनलाईन रमी’ गेमचा सामाजिक माध्यमांतून किंवा टी.व्ही. आदींद्वारे प्रचार केला जातो. हा विषय मागील हिंदु राष्ट्र अधिवेशनात मांडणार, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले होते. त्यासंबंधी पुढे काय झाले ?

श्री. घनवट : ‘ऑनलाईन रमी’ हा एक प्रकारचा जुगार आहे आणि यावर सरकारने बंदी घातली पाहिजे. या प्रकारामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हा विषय गतवर्षी चर्चेला आला होता. तसेच ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला कोणतीही ‘सेन्सॉरशिप’ नाही. ‘ओटीटी’वर ‘सेन्सॉरशिप’ असावी यासाठीही आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत १८ ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म, १९ संकेतस्थळे, १० ‘अ‍ॅप’ आणि ५७ सामाजिक माध्यमांतील खाती यांवर कारवाई झाली आहे. ही कारवाई नगण्य आहे; कारण अजूनही अनुमाने ७०० ‘ओटीटी’ आस्थापने चालू आहेत. भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सेव्ह भारत, सेव्ह कल्चर’ ही मोहीम हाती घेण्यात आली. उदय माहूरकर वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होणार आहेत. महोत्सवात अशा सर्व विषयांवर चर्चा होऊन पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे.

पत्रकार : हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अयोध्येतील श्रीराममंदिराची उभारणी हे पहिले पाऊल असे म्हटले जाते; मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशमध्ये भाजपला अल्प जागा मिळाल्या. यावर तुमचे मत काय ?

श्री. घनवट : वास्तविक अयोध्येत श्रीराममंदिर बांधले, त्या भागात भाजपचा पराजय झाला, असे चुकीचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ समाजात पसरवत आहे. फैजाबाद भागात अयोध्या हा लहानसा भाग आहे. अयोध्येत भाजपचा पराजय झालेला नाही. धर्माला अफूची गोळी म्हणणार्‍या कम्युनिस्टांच्या केरळ राज्यात भाजपचा एक खासदार निवडून आला आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये एम्.आय.एम्.चा खासदार निवडणूक हरला. या महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा का केली जात नाही ?

पत्रकार : दक्षिण गोव्यात पाद्रयांनी ‘ख्रिस्त्यांनी काँग्रेसला मतदान करावे’, असे सांगितले. यावर तुमचे मत काय आहे ?

श्री. घनवट : लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मशिदीतून फतवे काढण्यात आले. ‘व्होट जिहाद’ नावाचा नवीन प्रकार उदयास आला. गोव्यातही जाणीवपूर्वक धार्मिक एकत्रीकरण करण्यात आले. या घटनांना दुसरीही महत्त्वाची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारचे विरोधी पक्ष एकत्र येऊनही त्यांना सत्ता संपादन करण्यासाठी बहुमत मिळू शकलेले नाही, तर भाजप त्यांच्या विरोधात एकटाच लढून त्याला २४० हून अधिक जागा मिळाल्या. ‘भाजप जिंकूनही हरला’, असा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपला केवळ देशांतर्गत विरोध होता, असे नाही, तर काही विदेशी शक्तीही भाजपच्या विरोधात विविध षड्यंत्रे रचत होत्या. एवढे सर्व होऊनही नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी नियुक्त होणे ही पुष्कळ चांगली गोष्ट आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला अल्प जागा का मिळाल्या, यावर भाजप चिंतन करीलच; मात्र केंद्रात पुन्हा हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले आहे.

पत्रकार : गोव्यात ११ आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजप सरकार चालवत आहे. भाजप सरकारने ‘डायोसेशन’ यांच्या इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान चालूच ठेवून दिलेले आश्‍वासन मोडले (यू-टर्न घेतला). असे सरकार हिंदुत्वासंबंधी अभ्यासक्रम लागू करणार, असे तुम्हाला वाटते का ?

श्री. सत्यविजय नाईक : राज्यात भाजप किंवा काँग्रेस असे कुणाचेही सरकार असले, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडणार आहेत. आमच्या मागण्या धसास लागेपर्यंत त्यासाठी प्रयत्न चालूच ठेवणार आहोत.