महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांत ७ महिन्यांत ५०० हून अधिक गरीब रुग्णांवर उपचार !

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाकडून योजनेचे नियंत्रण !

मुंबई, १६ जून (वार्ता.) – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांवर विनामूल्य उपचार, तर गरीब रुग्णांवर ५० टक्के सवलतीमध्ये उपचार केले जातात. यासाठी प्रत्येक धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन आणि गरीब रुग्ण यांसाठी प्रत्येकी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतात. जानेवारीपासून ते १५ जूनपर्यंत या शासकीय योजनेचा ५०० हून अधिक आर्थिक दुर्बल घटकांनी लाभ घेतला आहे. शासनाच्या विधी आणि न्याय विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण पाहिले जाते.

१.  यापूर्वी सरकारच्या आरोग्य, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागांच्या अंतर्गत ही योजना राबवली जात होते. या योजनेतून किती रुग्णांना उपचार झाले, याची नेमकी माहिती पुढे येत नव्हती.

२. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत ही योजना आणली, तसेच या योजनेच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्ष चालू केला.

३. सध्या मंत्रालयात हा कक्ष कार्यरत आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ४६८ धर्मादाय रुग्णालयांमध्ये १२ सहस्र खाटा निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

४. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत या योजनेतून ११ कोटी ७६ लाख रुपयांचे उपचार झाले आहेत, अशी माहिती या कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्‍वर नाईक यांनी दिली.

असे आहे योजनेचे स्वरूप !

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाच्या ‘[email protected]’ या मेल आयडीवर ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे किंवा मंत्रालयात प्रत्यक्षही या कार्यालयात अर्ज स्वीकारला जातो.

ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यरत होणार !

राज्यातील कोणत्या धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब किंवा निर्धन व्यक्तींसाठी किती खाटा शिल्लक आहेत, हे कळावे, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली जात आहे. यामुळे निर्धन आणि दुर्बल घटकांना खाटा उपलब्ध होण्यामध्ये पारदर्शकता येऊ शकेल. ही प्रणाली लवकरच कार्यरत होणार आहे, अशी माहिती रामेश्‍वर नाईक यांनी दिली.