Om Certification : हिंदूंच्या धार्मिक स्थळी प्रसाद विक्री करणार्‍या दुकानांना दिले जाणार ‘ओम प्रमाणपत्र’ !

१४ जूनपासून होणार चळवळीला प्रारंभ !

मुंबई – हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळी बनावट तूप, गायीची चरबी यांसह अन्य वर्ज्य पदार्थांचा वापर असलेला प्रसाद दिला जाऊ नये, प्रसादाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘ओम प्रमाणपत्र’ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाचे आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्या पुढाकाराने ही चळवळ चालू करण्यात येत आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून याला पाठिंबा दर्शवण्यात येणार आहे.

१.  १४ जूनपासून या चळवळीला प्रारंभ होणार आहे. ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने हे प्रमाणपत्र देण्यात येणार असून या संस्थेमध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

२. समस्त महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये काही महिन्यांपूर्वी निकृष्ट दर्जाच्या तेलाचा उपयोग करून बनवलेले लाडू प्रसाद म्हणून देण्यात येत असल्याचा प्रकार मागील वर्षी उघड झाला. हा प्रकार लक्षात आल्यावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने प्रसाद बनवणार्‍या ठेकेदाराचा ठेका रहित केला. ओम प्रमाणपत्रामुळे असे प्रकार टाळता येतील.

३. प्रसादामध्ये भेसळयुक्त आणि धार्मिकदृष्ट्या वर्ज्य पदार्थ नाहीत ना, याची निश्‍चिती करूनच ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ज्या दुकानदारांकडे ‘ओम प्रमाणपत्र’ आहे, त्यांच्याकडूनच भाविकांनी प्रसाद घ्यावा, याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून जागृती केली जाणार आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथून प्रमाणपत्र वितरणाला होणार प्रारंभ ! 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिक येथील तीर्थक्षेत्र श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या येथून हे प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. देश-विदेशातून येणार्‍या सहस्रावधी भाविकांची संख्या लक्षात येऊन श्री त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून घेण्यात आला आहे.