मुलांना साधनेत साहाय्य करणार्‍या मुंबई येथील श्रीमती स्मिता हरिश्चंद्र दळवी (वय ६९ वर्षे) !

मुंबई येथील श्रीमती स्मिता हरिश्चंद्र दळवी (वय ६९ वर्षे) यांची त्यांची मुलगी सौ. नंदिनी सुर्वे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.

श्रीमती स्मिता हरिश्चंद्र दळवी

१. वाचनाची आवड असणे

सौ. नंदिनी सुर्वे

‘आईला वाचनाची आवड आहे. तिने अनेक ग्रंथांचे वाचन केले आहे. आईचे लग्न झाल्यावर तिने जवळच्या ग्रंथालयातील बहुतेक सर्व पुस्तके वाचली. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमितपणे पूर्ण वाचते, तसेच तिने सनातनचे अनेक ग्रंथ वाचले आहेत.

२. मुलांवर चांगले संस्कार करणे

आईची लग्नानंतरची काही वर्षे पुष्कळ कठीण गेली. बाबा एका नामांकित आस्थापनात चाकरी करत होते. आईने नोकरी न करता घरी राहून मुलांचे योग्य ते संगोपन केले. त्यामुळे आम्हा मुलांवर योग्य संस्कार झाले. आम्हाला साधनेचा मार्ग मिळाला. आईने आम्हाला धर्माचरण आणि कर्तव्यपालन यांचे महत्त्व स्वत:च्या कृतीतून शिकवले. आमच्या शिक्षणात बर्‍याच अडचणी आल्या; पण आईने गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेच्या बळावर त्यांवर उपाय काढण्याचा प्रयत्न केला.

३. यजमानांचा विरोध न जुमानता मुलीला साधना करण्यासाठी साहाय्य करणे

माझा मोठा भाऊ (श्री. गोविंद हरिश्चंद्र दळवी) वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागला. मी (सौ. नंदिनी नरेंद्र सुर्वे, पूर्वाश्रमीची स्वाती हरिश्चंद्र दळवी) वर्ष १९९९ पासून साधना करू लागले. बाबांचा दादाला साधनेसाठी विरोध होता. मला त्याहून अधिक विरोध होता. आई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे आम्ही गुरुदेवांच्या छत्रछायेखाली साधनारत आहोत.

४. पतीची सेवा करणे

माझे वडील निवृत्त झाल्यावर त्यांनी मूळ गावी घर बांधले. बाबांना आध्यात्मिक त्रास होता. बाबा अंथरुणाला खिळून होते. त्यामुळे आईला बाबांची सर्व सेवा करावी लागत असे. घरात सून आणि नातवंडे यांना त्रास नको, म्हणून आई वडिलांसमवेत ५ वर्षे गावी राहिली. या ५ वर्षांत तिने अनेक यातना भोगल्या, तरीही तिची पूजा-अर्चा, सोमवारी नित्यनेमाने ग्रामदैवत श्री लिंगेश्वराचे दर्शन करणे इत्यादी चालू होते.

५. धार्मिक वृत्ती

आईचा जन्म धार्मिक कुटुंबात झाल्याने ती लहानपणापासून पूजा-अर्चा करणे, उपवास आणि कुलाचार पालन करणे इत्यादी नित्यनेमाने करत आहे. लहाणपणी आई देवाचा धावा करायची. कधी-कधी आईला शाळेतून येतांना भूक लागली, तर ती झाडाखाली बसून देवाला प्रार्थना करायची. तेव्हा अकस्मात् वारा येऊन आंबा किंवा काजू भूमीवर पडायचे. कोणताही प्रसंग आला, तरी देवाला सर्व आत्मनिवेदन करून योग्य कृती करण्याचा तिचा प्रयत्न असतो. ती प्रतिदिन नियमितपणे २ – ३ घंटे नामजप करते.

६. शक्य होईल तेवढी सेवा करणे

बाबांचे निधन झाल्यावर आई पुन्हा मुंबईला आली. त्यानंतर कोरोना काळात पुन्हा घरात घडलेल्या काही प्रसंगांत आई आणि दादा हतबल झाले. नंतर दादाने मुंबईचे घर विकून गोव्यात आम्ही जेथे रहातो, तेथे सदनिका घेतली. आई गोव्यात रहायला आली. आम्ही दोघीही आश्रमात सेवेला यायला लागलो. आईचे दोन्ही गुडघे निकामी झाले आहेत. असे असतांनाही साधना करण्यासाठी आईने आश्रमात येऊन शक्य तेवढी सेवा केली. आता आई दादाकडे परत मुंबई येथे रहात आहे.

७. मुलांना साधनेसाठी साहाय्य करणे

जून २००६ मध्ये श्री. नरेंद्र मधुकर सुर्वे यांच्याशी माझा विवाह झाला. तेव्हाही आई आणि दादा यांनी मला पुष्कळ आधार दिला. मला मूल झाल्यावर मी चाकरी सोडली. वर्ष २०१८ मध्ये आम्ही (मी, माझे यजमान आणि मुलगा कृष्ण नरेंद्र सुर्वे) पूर्णवेळ साधना करू लागलो. नंतर माझ्या मनात ‘आम्ही योग्य निर्णय  घेतला आहे का ?’, असे विचार यायचे; पण आई मला नेहमी म्हणते, ‘एकदा गुरूंच्या घरी गेलात की, मागे वळून पहायचे नाही. गुरु सर्व  काळजी घेतात. आपल्याला तर मोक्षगुरु लाभले आहेत.’

८. आईला आलेल्या अनुभूती

अ. आईने आम्हाला सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यासाठी पाठिंबा दिला. गुरुतत्त्व एकच असते, हे तिला ठाऊक आहे; पण गोव्याला आल्यावर सनातनच्या आश्रमात येऊन साधना करतांना ‘तिच्या पूर्वीच्या गुरूंनी सांगितलेली साधना सोडून आश्रमात येऊन सेवा केली, तर चालेल का ?’, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण  झाला होता. एके रात्री स्वप्नात ‘तिच्या पूर्वीच्या  गुरूंनी तिला या गुरूंकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) सोपवले आहे’, असा स्वप्नदृष्टांत झाला.

आ. अनेकदा तिला श्रीकृष्णाच्या जागी रांगणारा बाळकृष्ण दिसतो.

इ. एकदा ती रामनाथी आश्रमाच्या आवारात असलेल्या औदुंबराच्या झाडासमोर आसंदित बसली होती. तेव्हा तिला ‘सर्व  झाडे आश्रमाच्या दिशेने झुकली आहेत’, असे जाणवले.

ई. एकदा एका सत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे मार्गदर्शन  करत असतांना तिला त्यांच्या पाठीमागे पांढरा प्रकाश दिसला.

‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे मला साधनेत साहाय्य करणारी आई लाभली, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. आईची लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून तिची मुक्तता व्हावी, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– सौ. नंदिनी नरेंद्र सुर्वे, फोंडा, गोवा. (५.५.२०२४)