सोन्याचे भाव सातत्याने का वाढत असतात ?        

आपल्याकडे म्हणजेच भारतात हिंदूंमध्ये सोन्याचे दागिने लोकप्रिय आहेत. आपल्याकडे वयोवृद्ध सांगतात, ‘आमच्या वेळी सोने १०० रुपयांच्या आत तोळा (१० ग्रॅम) होते. आज सोन्याचे भाव ७० सहस्र रुपये प्रति तोळ्याच्या पुढे गेले आहेत.’ सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असली, तरी गत १० वर्षांत त्यात पुष्कळ वाढ झाली आहे. याचा मागोवा घेणारा लेख.

श्री. यज्ञेश सावंत, देवद, पनवेल

१. कशी वाढत गेली सोन्याची किंमत ?

वर्ष १९५५ मध्ये ७९ रुपये प्रतितोळा सोने होते. १ तोळा म्हणजे १० ग्रॅम. वर्ष १९५८ मध्ये ९५ रुपये, वर्ष १९५९ मध्ये १०२ रुपये, वर्ष १९६१ मध्ये ११९ रुपये, पुन्हा वर्ष १९६३ मध्ये न्यून होऊन ९७ रुपये, वर्ष १९७१ मध्ये १९३ रुपये, वर्ष १९८१ मध्ये १ सहस्र ८०० रुपये, वर्ष १९९१ मध्ये ३ सहस्र ४६६ रुपये, वर्ष २००१ मध्ये ४ सहस्र ३०० रुपये, त्यानंतर वर्ष २००७ पासून वाढते दर, म्हणजे १० सहस्र ८००, वर्ष २०११ मध्ये २६ सहस्र ४०० रुपये, वर्ष २०२१ मध्ये ४८ सहस्र ७०० रुपये प्रतितोळा.

२. सोन्याचे भाव कसे ठरतात ?

‘डिमांड अँड सप्लाय चेन’ (मागणी आणि पुरवठा साखळी) यानुसार जगात वस्तू आणि उत्पादने यांचे मूल्य ठरते. त्याचप्रमाणे सोन्याच्या मागणीनुसार सोन्याचे दर ठरतात. १ तोळा (म्हणजे १० ग्रॅम) सोन्याने सध्या ७१ सहस्र रुपयांचा आकडा ओलांडला आहे. यातून सोन्याचा दर किती वाढला आहे, याची कल्पना येऊ शकते. सोन्याला मागणी पुष्कळ आहे; मात्र होणारे उत्पादन ज्यामध्ये सोन्याची बिस्कीटे, कॉईन (नाणी) यांपासून ते सोन्याचे दागिने अल्प असेल, तर सोन्याचे दर वाढतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडमध्ये प्रतिदिन सोन्याचा दर ठरवला जातो. सोन्याचा दर ठरवण्याचे दायित्व हे ‘लंडन बुलियन माकर्ेट असोशिएशन’कडे (LBMA) आहे. यामध्ये मोठमोठे खाणमालक, उद्योगपती संघटनेचे सदस्य आहेत. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या साहाय्याने ही संस्था सोन्याचा दर ठरवते. हा दर प्रत्येक देशात वेगळा असतो. सोन्याचा हा दर दिवसातून २ वेळा, म्हणजेच लंडनच्या वेळेनुसार सकाळी १०.३० आणि दुपारी ३ वाजता निश्चित केला जातो. भारतात अशी एकमेव संस्था नसली, तरी ‘इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशन’ (IBJA) दैनंदिन देशांतर्गत सोन्याचे दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

३. सध्या भाव का वाढले ?

श्री. यज्ञेश सावंत

सध्या सोन्याचे भाव वाढण्यात अनेक कारणांपैकी भूराजकीय अस्थिरता ज्यामध्ये प्रामुख्याने रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्रायल युद्ध, इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेला तणाव यांमुळे अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना या स्थितीत सुरक्षित गुंतवणूक करण्याचे माध्यम म्हणजे सोने वाटते. यात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. केंद्रीय बँका म्हणजे भारतातील भारतीय रिझर्व्ह बँक, अमेरिकेतील फेडरल बँक, चीनची सेंट्रल बँक अशांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी चालू केली असल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

लोक अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. त्यामध्ये एक म्हणजे भूमी, घर आणि तिसरे महत्त्वाचे म्हणजे सोने. यामध्ये गुंतवणूक केली जाते; कारण व्यक्तीला निश्चिती असते की, त्यांचे भाव कधीच पडणार नाहीत. यापैकी सोन्याविषयी आपण अनुभवतो आहोत की, सोन्याचे भाव वाढतच जात आहेत. हिंदूंमध्ये सोन्याचे विशेष आकर्षण आहे. भारतात आणि विशेषतः हिंदू मध्ये सोन्याचे दागिने, सोन्याचे अलंकार यांचा वापर पुष्कळ होतो. त्यामुळे भारतात तर सोन्याची मागणी पुष्कळ आहे. नुकताच अक्षय्य तृतीया, त्यापूर्वी हिंदूंचे नववर्ष गुढीपाडवा या वेळी हिंदु समाज मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो. तरी हिंदु समाज प्रत्येक वेळी सोने खरेदी करत असला, तरी त्यात सातत्य असल्यामुळे नियमित वाढ जेवढी असते तेवढीच आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने सांगितले की, हिंदूंचे गुढीपाडवा आदी सणांच्या वेळी असलेली मागणी नेहमीनुसारच आहे. म्हणजेच हिंदूंची सोनेखरेदी सोन्याचे भाव वाढण्यासाठी कारणीभूत नाही.

‘मण्णपुरम गोल्ड लोन’ असे सोन्यावर कर्ज देणार्‍या वित्तीय संस्था ही भारतात पुष्कळ आहेत. भारतियांना गहाण ठेवून कर्ज मिळवण्यासाठीही सोने हा चांगला आणि सुरक्षित पर्याय वाटतो. परिणामी गुंतवणूक करायची असल्यास एकूणच पुढील असुरक्षिततेमुळे सोने हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय वाटतो. अमेरिकन डॉलरचे भाव किंवा अन्य चलनाचे भाव कधीही गडगडू शकतात; मात्र सोन्याचे भाव न गडगडता ते  वाढत जाणार आहेत, अशी तज्ञांची एक धारणा आहे. त्यामुळे लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे सोने अधिक खरेदी करत आहेत. परिणामी सोन्याचे भाव वाढत आहेत.

भारत आणि चीन यांच्यामध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. जगातील एकूण सोन्याच्या व्यापारात हा निम्मा असू शकतो एवढे त्याचे प्रमाण अधिक आहे.  यामध्ये मुख्यतः सोन्याचे दागिने आणि उर्वरित भाग सोन्याची नाणी यांचा समावेश असतो. हा व्यापारही वाढत आहे. चीनमध्ये मुख्यत: गुंतवणूकदारही पूर्वीपासून सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. परिणामी तेथून सोने खरेदी अधिक आहे.

४. सोन्याच्या भाववाढीची अन्य कारणे

चलन पद्धत जगाने स्वीकारण्यापूर्वी सोन्यानेच, सोन्याचे मूल्य सांगणार्‍या कागदपत्रानेच जगातील मोठे व्यवहार व्हायचे. चलनाचा भाग नंतर आल्यावर चलनात व्यवहार चालू झाले.

सोन्याच्या दरवाढीत अमेरिकेचाही वाटा मोठा आहे. दुसर्‍या महायुद्धात जगाच्या इतिहासात ८० टक्के सोने अमेरिकेकडे होते, असे सांगितले जाते. म्हणजे अमेरिका शस्त्रनिर्मिती करत असल्यामुळे दुसर्‍या महायुद्धात सहभागी देशांनी अमेरिकेला सोने देऊन शस्त्रे खरेदी केली आहेत. आता रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वाढला आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचे हेसुद्धा एक कारण आहे. तज्ञांनुसार आयात शुल्क, युद्धजन्य परिस्थिती आदी कारणांमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. भारत प्रतिवर्षी सरासरी ८०० टन सोने आयात करतो. स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, दुबई इत्यादी देशांतून सोन्याची आयात केली जाते.

१ एप्रिल २०१४ या दिवशी सोन्याचा भाव हा १,३०० डॉलर्स प्रतिऔस (२८.३९ ग्रॅम) होता. तेव्हा भारतात सोन्याचा भाव हा २९ सहस्र रुपये प्रतितोळा होता. हाच भाव आता १ एप्रिल २०२४ या दिवशी २,२६० डॉलर्स प्रतिऔस झाला आहे. त्यामुळे या दिवशी भारतातील सोन्याचा दर हा ६९ सहस्र  रुपये होता. डॉलरच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दहा वर्षांच्या तुलनेत सोन्याचा भाव ७४ टक्क्यांनी वाढला, तर हाच भाव भारतीय चलनाच्या तुलनेत १४० टक्क्यांनी वाढलेला आहे. सोन्याने ५३३ टक्के गेल्या २० वर्षांत परतावा दिला आहे. म्हणजे २० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्यामुळे ५३३ टक्के व्याज दिले आहे.

५. सोन्याचे उत्खनन

सोन्याच्या खाणींमध्ये जगात पहिल्या तीनमध्ये चीन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहेत. येथे मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते. तेथून जगभर पुरवठा होतो. या खालोखाल अमेरिका, कॅनडा आणि घाना यांचा क्रमांक लागतो. सोन्याचे उत्पादन (सोन्याच्या खाणीतून होणारे) वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये ३ सहस्र ३०० मेट्रिक टन प्रतिवर्ष होते. तेच न्यून होऊन २०२० आणि २०२१ मध्ये ३ सहस्र मेट्रिक टन एवढे अल्प झाले. वर्ष २०१० मधील वाढत्या मागणीनुसार सोने उत्खननाचे प्रमाण वर्ष २०१६ पासून विशेष वाढलेले नाही. याचे कारण म्हणजे सहज उपलब्ध होणारे सोने उत्खनन करण्यात आले आहे. आता सोन्याच्या खाणीमध्ये अधिक खोल जाऊन उत्खनन करावे लागत आहे, ज्याला वेळ लागतो.

नोटा छापून गरिबी दूर करता येईल का ?

भारतीय चलन, म्हणजे नोटा आणि नाणी छापण्यासाठी आपल्याकडे टांकसाळी उपलब्ध आहेत. त्यामध्ये नोटांची छपाई करून नोटा आणि नाणी आपल्याला उपलब्ध होतात. काही जणांचे म्हणणे असते की, भरपूर नोटा छापूया आणि त्या वाटूया म्हणजे भारतातील गरिबी दूर होईल ! असे खरेच होऊ शकते का ? नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकार कसा घेते ? मुख्य म्हणजे कशाचे तरी मूल्य म्हणून त्या प्रमाणात नोटा छापल्या जातात. येथे सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात नोटा छापाव्या लागतात. ही पद्धत फार जुनी असली, तरी त्यावर आता त्या त्या देशाचे सरकार तेवढे अवलंबूनही रहात नाहीत. आता सरकार निर्णय घेऊ शकते; मात्र अभ्यास करून निर्णय घेतला जातो.

अधिक नोटा छापल्यास काय होईल ? याचे उत्तम उदाहरण म्हणून झिंबाब्वेचे घेता येईल. तेथे महागाई अधिक झाल्यामुळे व्यय भागवण्यासाठी, वित्त पुरवठ्यासाठी भरपूर नोटा छापण्यात आल्या. यामुळे आधीच उत्पादन क्षमता घसरली होती. परिणामी झिंबाब्वेची अर्थव्यवस्था आणखीनच घसरली. लोकांनी पाव विकत घेण्यासाठी पोतीभर नोटा आणाव्या लागत होत्या. वस्तू खरेदी करण्यासाठी नोटांचे ढीग रचावे लागत होते, म्हणजे नोटा भरपूर आणि वस्तू न्यून असे झाले. त्यामुळे महागाई शिगेला पोचली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

कुणाला वाटले आणि कितीही नोटांची छपाई केली, असे होऊ शकत नाही. अशा वेळी सोन्याचा विचार होतो.

– श्री. यज्ञेश सावंत (२२.५.२०२४)

६. सोन्याचे भाव पडतील का ?

सोन्याविषयीच्या चर्चेत एक सूत्र म्हणजे सोन्याचे भाव पडतील का ? काही तज्ञांच्या मते सोन्याचे भाव सहजा पडणार नाहीत. थोडाफार फरक येऊ शकतो; मात्र विशेष परिणाम होणार नाही. हे झाले सध्या केवळ युद्धाच्या संभाव्य संकटाच्या वेळी. युद्ध चालू असतांना मागील २ महायुद्धांच्या अनुभवांनुसार शस्त्र खरेदीसाठी देश पैशांनंतर देशातील सोने वापरत असल्यामुळे पुन्हा काहीच  देशांकडे सोन्याचा साठा होण्याची शक्यता आहे. तिसरे जागतिक महायुद्ध अतिशय भीषण असेल, असे संतांनी सांगितले आहे. त्यामुळे सोने गोळा केलेले देश तरी रहातील का ? अशी शंका आहे. एकेकाळी सोन्याचा ८० टक्के भाग एकवटलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था आता दोलायमान झाली आहे. महागाई तेथेही वाढलीच आहे. सर्वच देशांची अर्थव्यवस्था युद्धामुळे उद्ध्वस्त झाल्यास सोन्याचे मोठे मूल्य तरी काम करणार का ? किंवा सोने पडेल त्या मूल्यात देऊन राष्ट्रासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करून घ्यावी लागेल. देशांतर्गत विचार केल्यास व्यक्तीला काही खरेदी-विक्रीसाठी हाती सोने असल्यास तेवढेच मूल्याच्या वस्तू विकत मिळतील, याची काहीच हमी कुणी देऊ शकत नाही. म्हणजे युद्धानंतर किंवा युद्ध काळात सोन्याचे मूल्य आपोआप अल्प होऊ शकणार आहे. असे झाल्यास चलनाऐवजी पूर्वी ‘बार्टर सिस्टीम’ प्रमाणे काही तरी देऊन काही वस्तू घेणे एवढेच त्याचे मूल्य होऊ शकेल कि काय अशी शंका आहे.

भविष्यात सोन्याच्या भावाविषयी निश्चित कुणीच आता सांगू शकणार नाही. आज मात्र सुरक्षा ठेव म्हणून सोन्याकडे वाढता कल गेल्यामुळे भाव मात्र आणखी वाढणार आहेत, हे निश्चित !

श्री गुरुचरणार्पर्णमस्तु।

–  श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल (२२.५.२०२४)