महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाची पंचगंगा नदीच्या घाटावर अग्नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्यक्षिके !

बोटीच्या साहाय्याने अग्नीशमन विभागाच्या प्रात्यक्षिकांची पहाणी करतांना प्रशासक के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर – संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली. या प्रसंगी प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहीत धरून महापालिका उपाययोजना आणि नियोजन करत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनसामुग्रीच्या सर्व यंत्रणांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक होर्डींग्जवर, तसेच धोकादायक इमारतींवर कारवाई चालू आहे.’’ या प्रसंगी अग्नीशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून ‘लाईफ जॅकेट’, दोर, तसेच अन्य वस्तूंच्या साहाय्याने कसे वाचवले जाते ? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्नीशमन अधिकारी मनीष रणभिसे, अग्नीशमन विभागाकडील जवान आदी उपस्थित होते.