इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, वर्ष १९७१ देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बांगलादेश अस्तित्वात आला होता. आज देशात पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देश पुन्हा विघटनाच्या वाटेवर आहे, अशी चेतावणी कारागृहात बंदीवासात असलेल्या इम्रान खान यांनी दिली आहे. वर्ष १९७१ मध्ये देश तोडण्याला बंगाली नेता शेख मुजीबुर रहमान नाही, तर जनरल याह्या खान आणि त्यांच्या जवळचे सैन्यदलातील अधिकारी उत्तरदायी होते, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ प्रसारित करतांना लिहिले आहे की, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने ‘हमुदुर रहमान कमिशन’चा अहवाल वाचावा आणि देश तोडण्याचे खरे गद्दार जनरल याह्या खान होते कि शेख मुजीबुर रहमान हे जाणून घ्यावे.
इम्रान खान यांनी म्हटले आहे की, शेख मुजीबुर रहमान यांच्यावर देशाच्या विघटनाचा ठपका ठेवला जात आहे आणि त्यांना देशद्रोही म्हटले जात आहे; परंतु ते खरे नाही. शेख मुजीबुर रहमान यांचा देशाच्या राज्यघटनेवर विश्वास होता आणि त्यांना पाकिस्तानसोबत रहायचे होते; मात्र जनरल याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानला एकत्र ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
पाक सैन्याने बंगालींवर केले अत्याचार !
हमुदुर रहमान कमिशनच्या अहवालाचा हवाला देत इम्रान खान यांनी म्हटले आहे की, मुजीबुर रहमान हे पूर्व पाकिस्तानमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सर्वांत पसंतीचे नेते होते. त्यांना लोकशाहीनुसार त्यांचे हक्क हवे होते; परंतु जनरल याह्या खान यांनी त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी बंगालींवर अत्याचार केले आणि राज्यघटना, नियम-कायदे यांच्याकडे दुर्लक्ष करून काम केले. पाकिस्तानी सैन्यदलाने ‘ऑपरेशन सर्च लाईट’ चालवून बंगाली विचारवंत आणि राजकीय विरोधक यांना क्रूरपणे चिरडले. मोठ्या संख्येने अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाले आणि बंगाली महिलांवर बलात्कार झाले. त्याचा परिणाम असा झाला की, जनरल नियाझीने दोनच आठवड्यात आत्मसमर्पण केले. पाकिस्तानी सैन्याचा भारतीय सैन्यदलाकडून पराभव झाला आणि पाकिस्तानला करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले.