Russia Slams US : भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश ! – रशिया

  • रशियाचा अमेरिकेवर घणाघात !

  • गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेकडे नाही !

  • एक देश म्हणून अमेरिका भारताचा आदर करीत नाही !

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा

मॉस्को (रशिया) –  भारतातील सार्वत्रिक निवडणुका उधळून लावणे, हा अमेरिकेचा उद्देश आहे, असा गंभीर आरोप रशियाने अमेरिकेच्या विरोधात केला आहे. अमेरिकेला फटकारत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की, अमेरिका भारतावर सातत्याने खोटे आरोप करीत आहे. त्याला भारताची राष्ट्रीय मानसिकता आणि इतिहास कळत नाही. त्यामुळे अमेरिका धार्मिक स्वातंत्र्याविषयी बिनबुडाचे आरोप करत असते.

झाखारोवा पुढे म्हणाल्या की,

१. अमेरिका खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटामध्ये भारताचा हात असल्याचे बिनबुडाचे आरोप करीत आहे. पन्नू नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकांचा सहभाग असल्याविषयी कोणतीही विश्‍वसनीय माहिती किंवा पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. पुराव्याअभावी या विषयावरील (भारतविरोधी) अंदाज अस्वीकार्य आहे !

२. वॉशिंग्टनची कारवाई म्हणजे भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये ढवळाढवळ आहे. एक देश म्हणून अमेरिका भारताचा आदर करत नाही.

३. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडींमध्ये वॉशिंग्टनपेक्षा अधिक दडपशाहीची कल्पना करणे कठीण आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया काही नवीन नाहीत. मित्रत्वाचे ढोंग करून स्वत:चा स्वार्थ साध्य करण्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जाऊ शकते, हेच यातून लक्षात येते !