साधनेतील आनंद अनुभवणारे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव गंगाधर वझे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. भार्गव वझे यांचा सत्कार करतांना सद्गुरु सत्यवान कदम (डावीकडे)

रत्नागिरी, ९ मे (वार्ता.) : गुरुकृपायोगानुसार साधना करून त्यातून आनंद अनुभवणारे श्री. भार्गव गंगाधर वझे (वय ६९ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली. ८ मे या दिवशी कोतवडे, रत्नागिरी येथील श्री. वझे यांच्या निवासस्थानी एका छोट्या कार्यक्रमात त्यांनी ही आनंदवार्ता दिली. या वेळी श्री. भार्गव वझे यांचा सत्कार सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन केला.

‘श्री. वझेकाकांनी गुरुकृपायोगानुसार भावपूर्ण आणि तळमळीने साधना केली. साधकांना काकांचा आधार वाटतो. त्यांच्याप्रमाणे गुरुकृपायोगानुसार साधना करून सर्वांनी आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी’, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी या वेळी केले.

या वेळी कुटुंबियांनी आणि साधकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

ही केवळ प.पू. गुरुदेवांचीच कृपा ! – भार्गव वझे

आध्यात्मिक पातळी घोषित झाली, ही केवळ प.पू. गुरुदेवांचीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच) कृपा होय. जीवनात साधनेला पुष्कळ महत्त्व आहे. प्रार्थनेशिवाय सर्व व्यर्थ आहे. माझा मुलगा गिरिधर इयत्ता नववीत शिकत असतांनाच त्याने साधनेला आरंभ केला. सध्या तो रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. त्यात मला आनंद आणि समाधान आहे. ‘तू कुठेही रहा; मात्र साधना सोडू नकोस’, असे मी त्याला सांगितले.

या वेळी सौ. भाग्यश्री वझे (श्री. वझेकाका यांच्या पत्नी) म्हणाल्या की, मला मागच्या आठवड्यापासूनच श्री. वझे यांच्यामध्ये पुष्कळ पालट जाणवत होता. त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे, असे मला वाटत होते.

श्री. भार्गव गंगाधर वझे यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय्य तृतीया, १०.५.२०२४) या दिवशी कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव गंगाधर वझे यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांचे बालपण, त्यांनी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर केलेली साधना अन् सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ पुढे दिल्या आहेत.

श्री. भार्गव गंगाधर वझे

श्री. भार्गव गंगाधर वझे यांना ६९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. बालपण आणि शिक्षण

‘माझा जन्म २४.४.१९५५ (अक्षय्य तृतीया) या दिवशी झाला. मी दीड वर्षाचा असतांना माझ्या आईचे निधन झाले. माझ्या काकूने माझा सांभाळ केला. वयाच्या सातव्या वर्षी माझी मुंज झाली. मी ८ वर्षांचा असतांना माझ्या वडिलांचे निधन झाले. माझे मोठे भाऊ, मी आणि काकू असे आम्ही तिघेच घरी असायचो. तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मला गोठ्यातील गायी, म्हशी आणि बैल यांचे सर्व करायला लागायचे.

मी वयाच्या ११ व्या वर्षी शिक्षणासाठी पुणे येथे गेलो. तिथून प्रवरासंगम (तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र) येथे वेदशाळेत ३ वर्षे, नंतर ६ मास त्याच संस्थेच्या वेदशाळेत शिवथरघळ येथे होतो. तिथे मला ‘थकवा येणे’, यांसारखे शारीरिक त्रास झाले, तसेच माझ्या मनाचा संघर्ष होऊ लागल्याने मी वयाच्या १५ व्या वर्षी कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील घरी आलो.

२. विशेष लिहिता-वाचता येत नसूनही नामजप केल्याने देवाच्या कृपेने अधिकमासात विष्णुसहस्रनामाचे पठण, तसेच श्रीमद्भगवद्गीता आणि शिवलीलामृत यांचे वाचन करता येणे

माझे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते; पण मला विशेष लिहिता-वाचता येत नव्हते. मी वयाच्या १७ व्या वर्षी पंचांग बघायला शिकलो. त्या वेळी अधिक मासाचे महत्त्व माझ्या लक्षात आले आणि मी अधिकमासात नक्त (केवळ एकदा रात्री जेवणे) चालू केले, तसेच मी विष्णुसहस्रनामाचे पठण आणि श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन करू लागलो. अधिकमासातील शेवटचे ७ दिवस माझे पाय पुष्कळ दुखत होते. त्या वेळी माझे चुलत काका मला म्हणाले, ‘‘उपोषण (नक्त) सोडून दे, नाहीतर तुला मरण येईल’’; परंतु माझ्या चुलत काकूने मला धीर दिल्यामुळे मी माझे उपोषण पूर्ण केले. त्यानंतर मी पहाटे ५ वाजता मोठ्या अक्षरांतील ‘शिवलीलामृत’ वाचायला आरंभ केला. मला पहिल्यांदा शिवलीलामृत वाचायला १६ – १७ घंटे लागले. आता मी शिवकृपेने देवनागरी लिपीतील मराठी लिखाण आणि काही संस्कृत सूक्ते पटापट वाचतो. हे सगळे नामस्मरणामुळे शक्य झाले. वेळ मिळाला की, मी लगेच माळ घेऊन नामजपाला बसत असे.

३. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ

जानेवारी १९९७ मध्ये साधकांच्या माध्यमातून माझा सनातन संस्थेशी परिचय झाला. मी संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या साप्ताहिक सत्संगांना जाऊ लागलो आणि सत्संगात सांगितल्याप्रमाणे साधना करू लागलो.

४. सनातनच्या ग्रंथात ‘शिव्या दिल्यावर नामजप व्यय होतो’, असे वाचल्यावर शिव्या देणे बंद करणे आणि त्यानंतर आलेली अनुभूती

साधनेत येण्यापूर्वी मी बागेतील काजूबिया चोरणार्‍यांना शिव्या देत असे. चोरी न होण्यासाठी मी ‘बागेत पहारा करायला गडी ठेवणे’, यासारखा कितीही काटेकोरपणे बंदोबस्त केला, तरीही काजूबिया चोरीस जात असत. मी प्रतिदिन १५ ते २० माळा नामजप करत असे. सनातनच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथात दिले आहे, ‘एक शिवी दिली, तर ३० माळा नामजप व्यय होतो.’ ते वाचून मी निग्रहपूर्वक शिव्या देणे बंद केले. मी सत्संग आणि सत्सेवा सांभाळून उर्वरित वेळेत काजूबिया आणण्यासाठी बागेत जाऊ लागलो. तेव्हापासून आजपर्यंत मी कोणतेही प्रयत्न न करता काजूबियांची चोरी होणे बंद झाले आणि मला बागेतील सगळ्या काजूबिया मिळू लागल्या.

५. साधनेविषयी आलेला विकल्प आणि त्यानंतर गुरुकृपेने विकल्प दूर झाल्याची आलेली प्रचीती !

५ अ. एका सेवेबद्दल गुरुदेवांनी कौतुक न केल्याने मनात विकल्प येऊन सेवा न करण्याचे ठरवणे : वर्ष १९९८ मध्ये श्रीक्षेत्र पावस, श्रीक्षेत्र गणपतीपुळे आणि रत्नागिरी येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सभा झाल्या. मी गणपतीपुळे येथील सभेमध्ये दायित्व घेऊन सेवा केली होती. त्यातून मला भरपूर आनंद मिळाला. त्या वेळी गुरुदेवांनी कोतवडे येथील एका साधिकेचे कौतुक केले होते. गुरुदेव माझ्याविषयी काहीच बोलले नाहीत; म्हणून माझ्या मनात विकल्प येऊन मला निराशा आली. त्या वेळी ‘यापुढे अधिक धावपळीची सेवा करायची नाही’, असे मी ठरवले.

५ आ. साधकांचा संपर्क तुटल्याने पश्चात्ताप होऊन गुरूंना प्रार्थना करणे आणि त्यानंतर गुरुकृपेने सेवा चालू होणे : त्यानंतर माझ्या संपर्कात असणारे साधकही माझ्याकडे येणे बंद झाले. त्यामुळे मला चैन पडेना. मी रडकुंडीस आलो. मला पश्चात्ताप झाला. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राजवळ बसून आर्ततेने प्रार्थना केली, ‘मला क्षमा करा आणि परत साधनेत घ्या.’ त्याच दिवशी माझ्या पुतण्याचा मित्र आमच्या घरी आला. मी त्याला ‘कुलदेवतेचे नामस्मरण कर. त्याचा लाभ होतो’, असे सांगून साधना सांगितली. त्यानंतर साधक माझ्याकडे येऊ लागले आणि मी साधना अन् सेवा करू लागलो.

६. पौरोहित्याच्या कामातून मिळालेल्या पैशातून गुरुकार्यासाठी अर्पण करणे आणि त्यातून आनंद मिळणे

जानेवारी १९९८ मध्ये मी रत्नागिरी येथील एका साधिकेकडे गेलो होतो. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमचे नामस्मरण चांगले होत आहे, तसेच सेवाही चांगली चालू आहे. यापुढे तुम्ही सत्साठी त्याग करू शकता.’’ तेव्हा मला पौरोहित्याची कामे मिळत नसल्याने पैसे मिळत नसत, तरीही ‘साधना म्हणून आपण त्याग करूया’, असे मी ठरवले. दुसर्‍या दिवशी गावातील एकाने मला अभिषेक करण्यासाठी बोलवले आणि २१ रुपये दिले. त्यांतील सव्वापाच रुपये मी गुरुकार्यासाठी अर्पण केले. त्यानंतर मला पौरोहित्याची कामे मिळत गेली. मला मिळालेल्या पैशांतील २५ टक्के भाग मी अर्पण करत असे. अनुमाने वर्ष २०२१ पासून मला गुरुवारी मिळणारे सर्व पैसे मी अर्पण करू लागलो. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळत आहे.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आजपर्यंत मी साधनेचा आनंद अनुभवत आहे. हे सर्व लिखाण प.पू. गुरुदेवांनी लिहून घेतल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. भार्गव गंगाधर वझे (वय ६९ वर्षे), कोतवडे, जिल्हा रत्नागिरी. (२०.४.२०२४)

कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव वझे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि झालेले पालट !

श्री. महेश्वर भार्गव वझे

१. श्री. महेश्वर वझे (श्री. भार्गव वझे यांचा ज्येष्ठ पुत्र), कोतवडे, जिल्हा रत्नागिरी.

१ अ. नामजप आणि सेवा करणे : ‘ती. बाबा प्रतिदिन सकाळी काही घंटे बसून नामजप करतात. ते झोकून देऊन घरची कामे किंवा जमेल तशी सेवा करतात, उदा. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे.

१ आ. जाणवलेले पालट

१. आता बाबा परिस्थिती स्वीकारतात.
२. त्यांची चिडचिड पूर्वीपेक्षा न्यून झाली आहे.’

श्री. गिरिधर भार्गव वझे

२. श्री. गिरिधर भार्गव वझे (श्री. भार्गव वझे यांचा कनिष्ठ मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. नकारात्मक स्थितीतील मुलाप्रती भावनाप्रधान न होता त्याला साधनेचा योग्य दृष्टीकोन देणे : ‘वर्ष २००६ आणि २००८ मध्ये माझ्या मनाची नकारात्मक स्थिती असतांना मी ती. बाबांना साधना थांबवून घरी येण्याविषयी विचारत असे. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘साधनेतील अडचणींविषयी तू तेथील दायित्व असणार्‍या साधकांचे मार्गदर्शन घे. तू स्वतःच्या मनाने आश्रमजीवन सोडू नकोस’’ त्यामुळे माझ्या मनावर अडचणीच्या वेळी दायित्व असणार्‍या साधकांना विचारून निर्णय घेण्याचा किंवा कृती करण्याचा संस्कार झाला.

२ आ. पूर्णवेळ साधक असलेल्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा नसणे

१. एकदा बाबांनी मला सांगितले, ‘‘प्रतिवर्षी श्रीगणेशचतुर्थीच्या दिवशी पौरोहित्यासाठी साहाय्य करायला न्यूनतम १ – २ दिवस घरी ये. तू पूर्णवेळ साधना करत असल्याने उर्वरित वर्षभर घरी आला नाहीस, तरी अडचण नाही.’’ यानुसार मी गणेशोत्सवात किंवा अन्य कामानिमित्त घरी गेल्यावर अद्यापही आई-बाबा माझ्याकडून ‘एक मुलगा’ म्हणून कधीच आर्थिक साहाय्याची अपेक्षा करत नाहीत. गणेशोत्सवात पौरोहित्य करतांना मला मिळालेले पैसे मी त्यांना दिले, तरी ते पैसे स्वीकारत नाहीत. ते मला सांगतात, ‘‘यांतील काही रक्कम तू गुरुचरणी अर्पण कर आणि उर्वरित रक्कम तुला वर्षभर पूर्णवेळ साधना करतांना आवश्यकतेनुसार खर्चासाठी तुझ्या नावे अधिकोषात ठेव !’’
२. काही वर्षांपूर्वी ती. बाबांनी माझ्या विवाहाच्या अनुषंगाने मला मोकळेपणाने सांगितले, ‘‘तुला विवाह करायचा कि केवळ पूर्णवेळ साधनाच करायची आहे ?’, हा निर्णय तूच घे ! तुला दोन्हींपैकी कशासाठीही माझे काही साहाय्य लागले, तर अवश्य सांग.’’ नंतर आजपर्यंत कधीही बाबांनी मला विवाह करण्याविषयी आग्रह केला नाही. काही साधक आणि समाजातील सनातनचे हितचिंतक यांनी माझ्यासाठी स्थळे (मुली) सुचवल्यास बाबा त्यांना सांगत, ‘‘गिरिधरला विवाह न करता साधना करायची आहे, तरीही तुमची इच्छा असल्यास तुम्हीच त्याला विवाहाविषयी विचारू शकता.’’

२ इ. कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील अनेक साधकांचे आधारस्तंभ असणे

१. बाबा वयाच्या ६९ व्या वर्षीही दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यास साधकांना कधी अडचण असतांना किंवा अन्य प्रसंगीही सर्वच सेवा तळमळीने करतात. ते तेथील सर्वच साधकांना साधनेसाठी आवश्यकतेनुसार सर्वतोपरी साहाय्य करतात.
२. अनेक वर्षांपासून कोतवडे येथील साधकांचे कुटुंबीय ‘वझेकाका (बाबा) आहेत’, या विचाराने तरुण साधक-साधिकांना निश्चिंतपणे सनातनच्या सत्संग किंवा सत्सेवा यांसाठी पाठवतात.
३. बाबांच्या तळमळीमुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे आणि परिसरातील अनेक जण अनेक वर्षांपासून सनातन संस्थेशी जोडलेले आहेत. गुरुपौर्णिमा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव असा कोणताही कार्यक्रम असो, बाबा साधकांच्या समवेत गेल्यावर सनातनचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते निश्चिंतपणे यथाशक्ती अर्पण करतात.

बाबा या सर्व गोष्टींचे कर्तेपण कृतज्ञताभावे गुरुचरणी अर्पण करतात.

२ ई. ती. बाबांमध्ये जाणवलेले पालट

१. पूर्वी कौटुंबिक प्रसंग किंवा स्थानिक देवालयांमधील अस्वच्छता यांसारखी परिस्थिती स्वीकारतांना बाबांची चिडचिड होत असे आणि ती व्यक्तही होत असे. आता ते परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात.
२. बाबांना संपर्क केल्यावर पूर्वी ते मला कुटुंबियांच्या स्वभावदोषांचे प्रसंग सांगून अस्वस्थ होत असत. गेल्या २ – ३ मासांपासून ते असे प्रसंग सांगत नाहीत.
३. आता बाबा प्रतिदिन पहाटे उठून ब्राह्ममुहूर्तावर देवघरात बसून १५ माळा नामजप करतात. ‘आता त्यांची नामजप करण्याची तळमळ वाढत आहे’, असे मला वाटते.’

सौ. मीनाक्षी महेश्वर वझे

३. सौ. मीनाक्षी महेश्वर वझे (श्री. भार्गव वझे यांची सून), कोतवडे, जिल्हा रत्नागिरी.

३ अ. सातत्य आणि उत्साह : ‘बाबांचे वय ६९ वर्षे असूनही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा असतो. ते पहाटे ४ वाजता उठतात. त्यानंतर ते ‘नामजप करणे, देवघराजवळ स्वच्छता करून रांगोळी काढणे, तुळशीवृंदावन पाण्याने धुऊन तिथे रांगोळी काढणे, गायीला चारा देणे, गोठा झाडणे, देवपूजेसाठी फुले काढणे’ इत्यादी सेवा न थकता करतात.
३ आ. जाणवलेला पालट : पूर्वी बाबांच्या कुटुंबियांकडून अपेक्षा असायच्या; पण आता ते आमच्याशी अपेक्षाविरहित वागण्याचा प्रयत्न करतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.४.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक